Sunday, December 15, 2013

जीभेवरील ‘हुकूमत’


इथून डावीकडे वळायचे की उजवीकडे, या संभ्रमात मी डावीकडे वळतो. इथे आलं की नेहमी असं होतं. एकतर इथल्या गल्ल्या चिंचोळ्या, गर्दीने सदैव भरलेल्या. त्यात एकाही पाटीकडे बघून काही वाचता येत नसते. कोणी मराठी पाट्यांसाठी कितीही आरडाओरड, तोडफोड केली, तरी इथल्या मोहल्ल्यांना मराठीच काय, पण उर्दू वगळता अन्य कोणत्याही भाषेत पाट्या लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. ...आणि या अशा मोहल्ल्यामध्ये मी धड नावही वाचता न येणारे नेहमीचे हॉटेल शोधत हिंडत असतो.
गल्ल्यांतून फिरताना जिथे सेक्युलॅरिझमची पुसटशी खूणही जाणवत नसते, तिथे मी स्वतःला आपण सेक्युलर असल्याचे समजावत असतो. जवळपास प्रत्येक घरावर हिरवे झेंडे फडकताना पाहूनही एरवी भगवे झेंडे फडकताना आपण कुठे पाहतो?, असली काहीतरी स्वतःची समजूत घालतो. आज समजा दंगल वगैरेसारखा काही अनुचित प्रकार घडलाच, तर येथून बाहेर पडण्यासाठी कोणाला फोन... या असल्या भित्रट योजनाही काहीवेळा मनात येऊन जातात. तरीही मागे न फिरता शूरपणे मी त्या हॉटेलचा शोध सुरूच ठेवतो. कारण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण तिथल्या बिर्याणीला मुकलो, हे प्राक्तन सहन होणारे नसते. जवळपास प्रत्येकवेळी याच क्रमाने हे घडूनही भीतीही थांबत नाही आणि माझे जाणेही!
मजल, दरमजल करत त्या हॉटेलात पोहोचतो. माझ्या येण्याची कोणीही दखल घेत नाही. माझ्या शौर्याचा सगळा आव वाया घालवत मोहल्ल्यापासून इथल्या खुर्च्यांपर्यंत कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलेले नसते. मी एखादे रिकामे टेबल शोधतो. वर्षानुवर्षे मिळणारे तेच पदार्थ आणि जवळपास त्याच किमती पाहण्यासाठी मेन्यूकार्ड मागण्यात काही अर्थच नसतो. एक बिर्यानी असे सांगितल्यावर वर्षानुवर्षे न बदललेला वेटरही फक्त छोटेका की बडेकाएवढा एकच प्रश्न विचारतो. त्याला चारचारदा छोटे का, असे सांगूनही याने आता चुकून (किंवा मुद्दामहून) बडे का आणली तर...असले विचार करण्यात मी पुरेसा वेळ घालवतो.
आजूबाजूची उर्दू आणि उर्दुमिश्रित हिंदी बडबड फारशी कळत नसतेच. म्युझिक प्लेअरवरच्या कर्कश्य कव्वाल्यांच्या आवाजामुळे समोरच्या टीव्हीवर नुसतीच मूक चित्रं हलताना दिसतात. आजुबाजूच्या टेबलांभोवतीच्या घोळक्यांमध्ये एकटाच आलेला बहुदा मी एकमेव असतो. सतत डोके खुपसण्यासारखा मोबाईलही माझ्याकडे नसल्याने मग पलीकडे सुग्रास वास येणाऱ्या रसोईखान्यामध्ये चाचा काय करत असतील, याचे आडाखे बांधू लागतो.
असाच एकटा बसलेला असताना एकदा मी या रसोईखान्यामध्ये डोकावलो होतो. हॉटेलचा एकूण अव्यवस्थितपणा आणि घाईगर्दी यांच्याशी संपूर्णतः विसंगत वाटणारा एक पांढरा गृहस्थ (पिकलेला, रंगाने नितळ गोरा, कपडे पांढरे, दाढीही पांढरी) शुभ्र पांढऱ्या कपड्यामध्ये तांदूळ गाळत होता. सोवळ्याच्या पुजाऱ्यासारखे दीप्तिमान भाव चेहऱ्यावर वागवत आसपासच्या भवतालाशी तिळमात्र संबंध नसल्यासारख्या त्याच्या हालचाली होत्या. त्याच्यावर कोणी काउंटरवरचा बॉस खेकसणार नव्हता, त्याच्यापुढे ऑर्डरचा तगादा लावून उभे असणारे वेटर नव्हते. त्याला ना दुसऱ्या हॉटेलमधून चांगली 'ऑफर' मिळवायची नव्हती, ना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चायनीज पदार्थ बनवायचे होते. एका मोठ्या पातेल्यामध्ये बदामफुले, दालचिनी, लवंगा, तमालपत्रे आदी अस्सल मसाल्याच्या पदार्थांची आहुती पडली होती. केशर, दूध पेरून तो ज्याप्रमाणे बिर्याणीचे थर लावत होता, की नुसते पाहूनही वर्षानुवर्षे चव जिभेवर तरळावी. काहीतरी दिव्य घडत असल्यासारखा माझी नजरबंदी झाली होती. माझ्या नजरेत निस्सिम आदराचे भाव उमटले असावेत. कारण एकाक्षणी त्याने माझ्याकडे पाहिले आणि एक-दोन क्षणांनंतर रसोईखान्यात डोकावण्याचा भोचकपणा केल्याबद्दल जळजळीत विखारी कटाक्ष टाकण्याऐवजी माझ्या आदराचा स्वीकार केल्याचे स्मितहास्य त्याच्या दाढीवर उमटले. मी स्वतःहूनच त्याचे चाचा हे नाव ठरवून टाकले. त्यानंतर हे चाचा कधी दिसले नाहीत. परंतु, आजही समोर जेव्हा ही साग्रसंगीत बिर्याणी येते, तेव्हा नजरेआड त्यासाठी झालेल्या विधीपूर्वक सोपस्कारांच्या विचाराने मान लवते.
...आणि त्यानंतर, पहिला घास घेतल्यावर जे होतं, त्याला 'अनुभूती' असे म्हणतात. ती फक्त भूक नसते. ती केवळ चव राहत नाही. एखादा अतिशय रुचकर पदार्थ खातोय या भावनेपलीकडे नेऊन एका पवित्र खाद्यपरंपरेचे पाईक होण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, या कृतज्ञतेपर्यंतचा तो प्रवास असतो. मनातल्या शंका, भीती, पोट भरत असल्याची जाणीव इत्यादी सर्व आपोआप विरत जाते आणि हा जगण्याचा परमोच्च बिंदू असून यापेक्षा आयुष्यात चांगले काही घडणे शक्य नाही, असे वाटून मी शक्य तितक्या सावकाशपणे जीभेवर ठेवताच विरघळणाऱ्या त्या बिर्याणीच्या अधीन होतो.
काही काळ या अवस्थेत जातो, त्याचवेळी माझ्या आनंदविलिनतेवर सूड उगवण्यासाठी भारतीय संघाला हॉकीत पाकिस्तानकडून हरायचे असते. एरवी हॉकी माने?”, असे विचारणाऱ्या तेथील काही जणांना टीव्हीवर पाकिस्तान जिंकतोय, हे पाहून चेव चढत असतो.
ये नापाक लोक हमारा मुकाबला नही कर सकते. हजार सालतक हुकूमत की है, हमने इनपे और इऩ्शाल्ला आगे भी करेंगे. आझादी क्या मिली, हम अपनेही मुल्क मे मायनॉरिटी हो गये... यांसारखे चित्कार फुलत असतात.
बरं झालं, आपल्याला उर्दू येत नाही. नाहीतर, काय काय ऐकावं लागलं असतं’, असा विचार करून मी सोडून देतो. तेवढ्यात...
हुकूमत तो हमारी आजभी है, मियाँ!”
राजेशाही थाटात मोठ्याने उच्चारलेले हे शब्द त्वेषाने पेटलेल्या नजरा वेधून घेतात. तो आवाज चाचांचा असतो. रसोईखान्याबाहेर ते कोणताही आचारी चारचौघांत दिसेल, इतके सामान्य दिसतात. कर्म केल्यानंतर अलिप्त झालेले कर्मयोगी असेच दिसत असावेत. त्यांच्या वाक्याचा अर्थ न समजून अचानक शांतता पसरते. त्यांना प्रत्युत्तर द्यावे, की प्रश्न विचारावा, या द्विधेत सापडलेल्या ठरावीक चेहेऱ्यांकडे नीट पाहत ते स्मितहास्यासहित जवळ येतात.
आप जानते हैं किसी शख्स को, जिन्होने एकबार यहां की दावत कबूल की, और दोबारा आना भूलगयें?”
समोरचे मौनच अपेक्षित उत्तर देते. पुन्हा शांतता. निर्णयक वाक्यापूर्वी पॉझ घेतल्यासारखी...
जनाब, हुकूमत सिर्फ तख्तों पे बैठे नही की जाती!”
ज्याच्यावर कधीही येऊन कोणीही राज्य करून जावे, आणि कोण राज्य करतेय हेही कळू नये, असा हॉटेलमधील एक किरकोळ खानसामा क्षणात आपली सल्तनत दाखवतो. परिणामांचा विचार न करता स्वतःच्याही परवानगीशिवाय मला विजयी हसू फुटते. आसपासच्या दाद देणाऱ्या हास्यांमध्ये मिसळते. तेच स्मित कायम ठेवत आल्यापावली चाचा हुकूमत गाजवण्यासाठी पुन्हा रसोईखान्याकडे रवाना होतात.
ऐसे लोग हमे कभी जितने नही देंगे!” दबक्या आवाजात मान्य न होणारा 'पराभव' फुत्कारतो.
.
.
.
उर्दू शिकले पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळी इथे येताना एवढी शोधाशोध करावी लागणार नाही, हॉटेलबाहेर पडतापडता मला वाटून जाते.

4 comments:

  1. Wah Ladsaheb, Shevatacha Parichhed vachtana aksharsha angavar kata aala....
    Suruvatila vatale hote ki ekhadya khavayycha aavadnara padarth milavanyasathichi tadfad ani ti milalyanantar truptatechi ti "Recation" ya bhovatich lekh aahe ki kay...Pan shevat agadi khol aahe....
    Chhan keep it up...!!!

    ReplyDelete
  2. संकेत, तू खराखुरा नाटकवाला आहेस, हे तुझ्या लेखनावरून कळतं. चित्र डोळ्यांसमोर उभं करण्याची ताकद तुझ्या लेखनात आहे. आतापर्यंत मी तुझं लेखन कधी वाचलं नव्हतं. पण ते खूप विचारी, वेगळं काहीतरी मांडणारं आणि छान असेल, अशी जी कल्पना मी केली होती, ती योग्य होती, हे मला आज कळलं. तुझं बाकीचं लेखनही वाचायचा मोह मला आवरला नाही. त्यामुळे ते सगळं वाचूनच ही प्रतिक्रिया देतो आहे. अभिप्राय म्हणजे प्रशंसा नव्हे, अशी विनंतीवजा सूचना तू केली आहेस; पण ती सूचना म्हणजे लोकांना खरी प्रतिक्रिया देण्यामधला अडथळा ठरेल. त्यामुळे तुझ्या सूचनेचं उल्लंघन करून, मनाला जे खरोखर जाणवलं ते लिहिलं आहे. तू लिहिण्याचा आळस केलास तर चांगल्या लेखनाला अनेकांना मुकावं लागेल.

    ReplyDelete
  3. It is not that I have read this post for the first time today…I have read it thrice (by the way it wasn’t because of my meager grasp on Marathi, but because I felt like reading it repetitively) and will continue reading all your posts because as you once said (two years ago) your posts are partly facts and partly fiction, blend of which is incredible! For the facts part, I will appreciate your keen and varied observation skills and for the fiction part, your commandment over the language(s). Your posts are subtle yet intense. Like many, even I don’t wish to be deprived of some rich writings. Please continue writing, with simplicity intact! :)

    ReplyDelete
  4. प्रत्येक नव्या लेखनासोबत एकतरी नवा वाचक जोडला जावा, ही अपेक्षा काही अगदीच अवाजवी नाही. नव्या पोस्टवर आलेले तीनही अभिप्राय हे ब्लॉगवर प्रथमच कमेंट करणाऱ्यांचे आहेत, एक नवा सदस्यही ब्लॉगशी जोडला गेला यावरून मी याबाबत किती सुदैवी आहे, याची कल्पना येते. तुम्हा तिघांच्याही प्रतिक्रिया वाचताना प्रामाणिक वाटतात. तिघांनीही मला ‘लिहित राहा’ असा आग्रह केला आहे. आणखी काय पाहीजे?
    ...तुम्हाला नुसते 'धन्यवाद' देऊन थोडीच भागणार आहे!!

    ReplyDelete