Tuesday, June 8, 2021

...तो कप्तान अझर आहे!

'बऱ्याच दिवसांत क्रिकेट खेळलो नाही रे... या रविवारचा काय प्लॅन आहेजमायचं का खेळायला?... तो हा कुठे आहेत्यालाही बोलावून बघ आपल्या ह्याला तू विचारशील की मी विचारू?... अमूक तो पण आहे ना रे सध्या इथेच?... सगळ्यांना गोळा करूमजा येईल…’

महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे बरेचसे सामने बघताना मला बॅकएंडला उपरोक्त चर्चा रंगल्याचा भास होतो. संघातील कोणत्याही खेळाडूची कुचेष्टा करण्याचा येथे अजिबात हेतू नाही. या संघातील अनेकांची गुणवत्ता वादातीत होती. पण तरीही पराभव पचवायचे आणि विजयासाठी संयम बाळगायचे इतके बाळकडू या संघाने लहानपणापासून पाजलेत ना... की बस्स! त्यामुळेच असेल कदाचित, पण जेव्हा हा संघ जिंकायचा त्या दिवशी कॉमेंट्रेटरच्या इंडिया वन दि मॅच’ या चार शब्दांचे मोल सॅलरी हॅज बिन क्रेडिटेड’ या शब्दांइतकेच असायचे. ८ जून १९९९ हा अशाच दिवसांपैकी एक.

त्या दिवशी भारताने ९९ च्या वर्ल्ड कपमधील सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानला धूळ चारली होती. अझरच्या नेतृत्वाखालील भारताने मिळवलेला बहुदा हा अखेरचा संस्मरणीय विजय. आणि तोही कुठल्या वेळीतर कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले असताना आणि तिथे अद्याप भारताचे बॅकफूटवरून फ्रंटफूटवर येण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असताना. एरवी तसा निराशाजनकच गेलेल्या या वर्ल्ड कपमधून एव्हाना भारताची एक्झिट जवळपास निश्चित झाली होती. साखळी फेरीत झिम्बाब्वेकडून पराभवाची नामुष्की ओढावलेल्या भारतीय संघाला सुपर सिक्समधील उर्वरित दोन्ही सामनेही गमवावे लागले होते. परंतु, त्या दिवशीच्या भारताच्या विजयाने वर्ल्ड कपमधील बाकीचे शल्य बरेचसे कमी केले. अपुन एकइच मारा...च्या थाटात संघ सन्मानाने स्पर्धेतून बाहेर पडला. काहीही लॉजिक नसताना आता कारगिलमध्येही भारताचाच तिरंगा फडकणार, हा विश्वास त्या विजयाने पुन्हा रुजवला.        

संख्येने खूप नसले, तरी अझरच्या टीमने असे साजरे करण्याजोगे काही मौल्यवान क्षण दिले आहेत. अझर हा आम्ही पाहिलेला भारताचा पहिला कर्णधार. अगदी क्रिकेट कळायच्या आधीपासून शाळेतल्या जी. के.च्या फळ्यावर भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्यासह भारताचा कर्णधार म्हणून महंमद अझरुद्दीनचे नाव वाचले होते. सचिनचे अल्पकालीन नेतृत्व आणि जडेजाच्या बदली कर्णधारपदाचा अपवाद वगळता आमच्यासमोर तरी अझर हा अखेरपर्यंत कर्णधार म्हणूनच वावरला. येथे फोकस अझरच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धावर आहे. कपिल देवसह त्याच्या संघातील दिलीप वेंगसरकर, के. श्रीकांत, रवी शास्त्री आदी बऱ्यापैकी खेळाडू तोपर्यंत निवृत्त झाले होते. उरला होता अझर आणि सोबतीला अनप्रेडिक्टेबल खेळाडूंचा भरणा असणारा भारतीय संघ.

बाप रेअगदी सौम्यपणे मांडायचे झाले, तरी काय एक-एक लोकोत्तर नमुने होते या संघात. कधीतरीच खेळायला येणारे आशिष कपूर, राहुल संघवी, सदागोपन रमेश वगैरे तर सोडूनच देऊ. पण, नियमित खेळाडूंच्या बाबतीतही अझरचा रवैया एखाद्या कनवाळू बॉसप्रमाणे (खरेच असे कोणी असतील तर!) होता. खेळाडूंना त्यांच्या मानद नोकरीच्या ठिकाणी नसेल, इतकी जॉब सिक्युरिटी अझरच्या टीममध्ये होती. त्यामुळेच, सुनील जोशी एखाद्या वेळी ६ धावांत ५ विकेट घेऊन पुढचे कित्येक सामने त्या पुण्याईवर संघात राहू शकायचा. सौरव गांगुलीने वन-डेत सलामीवीर म्हणून पहिले अर्धशतक झळकावताना १०४ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या होत्या, होय वन-डेमध्येचराहुल द्रविड तर १९९९ च्या वर्ल्ड कपपर्यंत वन-डे संघातील कसोटीपटू म्हणूनच ओळखला जात होता. लक्ष्मणच्याही सुरुवातीच्या अपयशांची आकडेवारी काही कमी नव्हती. कुंबळेचा चेंडू ऑफ किंवा लेग कुठेच वळत नसल्याने त्याला मिडल स्पिनर म्हटलं जायचं. आणि हे तर फक्त कामगिरीवर बोट ठेवता येण्यासारखे सभ्य खेळाडू होते. बाकी, हरभजन सिंगने वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण करताच ऐन मैदानावर थेट रिकी पाँटिंगशी पंगा घेतला होता. सिद्धू वरचेवर कोणानाकोणाशी तरी भांडतच असायचा. जडेजा, कांबळी हे कित्येकदा नवनवीन गॉगल्स आणि हेअरस्टाइल्समुळेच चर्चेत असायचे. श्रीनाथ फिल्ड सेटिंगवरून बऱ्याचदा कर्णधारावरच डाफरायचा. आणि या सगळ्यांना सांभाळून घेत अझर आपल्या जुनाट टोपीसह मैदानावर थंड उभा असायचा. केवळ सहज म्हणून वरीलपैकी कुठल्याही कृतीला विद्यमान भारतीय कर्णधाराची प्रतिक्रिया इमॅजिन करून पाहा, म्हणजे अझरच्या शांतपणाची महती पटेल.

खेळाडू म्हणून तर अझरच्या गुणवत्तेची नव्याने चर्चा करणंही फिजूल आहे. जे त्याच्याकडे होतं, ते फक्त त्याच्याकडेच होतं. त्याच्यासारखी दुसरी मनगटं, त्याचे फ्लिक्स, लेग ग्लान्स, ऑन ड्राइव्ह आणि थ्रो शोधणे म्हणजे अमरिष पुरीचा आवाज, महंमद रफीचा स्वर आणि पुलं किंवा चॅप्लिनच्या विनोदाला पर्याय शोधण्यासारखं आहे. संघ अडचणीत असताना धावून येणाऱ्या अझरने वर उल्लेख केलेल्या सामन्यातही ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. कसोटी व वन-डेतील वेगवान शतकांंसह (अनुक्रमे ७४ व ६२ चेंडू) बरेच विक्रमही नावावर होते, तरीही भारतीय बॅटिंग लिजंड्सबद्दल बोलताना क्वचितच कोणी अझरचे नाव घेत असेल. अझरनेही स्वतःहून कधी तसा महान फलंदाज असल्याचा आव आणला नाही. शतकानंतरही तो जणू अनिच्छेनेच बॅट उंचवायचा. याउप्पर, अझर आणि सचिनमध्ये त्या काळात सुप्त स्पर्धा असल्याची चर्चाही रंगत असे. १९९६ च्या वर्ल्ड कपनंतर सचिनकडे कर्णधारपद आल्यावर या चर्चेला आणखीच जोर चढला. सचिनचे त्यावेळचे वय बघता तो अझरला मागे टाकणार आहे, हे सांगण्यासाठी क्रिकेटतज्ज्ञाची आवश्यकता नव्हती. तरीही कर्णधारपदी परतल्यानंतर अझरने प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे त्याला कुठेही आडकाठी केली नाहीसध्या फॉर्मात असताना रोहित शर्माला ज्याप्रकारे दर दोन-तीन सामन्यांआड विश्रांती देण्यात येते, त्याच्याशी तुलना केल्यास मला काय म्हणायचेय, हे तुम्हाला समजेल.        

अझरच्या संघाबाबत केवळ खेळाडूंच्या तऱ्हा हाच एकमेव इश्यू नव्हता. विशेषतः वन-डेमध्ये क्रिकेटच्या प्रोफॅशनॅलिझमची नवी आव्हानेही इच्छा असो वा नसो, संघावर येऊन आदळत होती. केवळ गुणवान खेळाडू संघात असणे आता पुरेसे ठरणार नव्हते. त्यासाठी योग्य खेळाडूंची मोट बांधून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेणे, प्रत्येकाची संघातील भूमिका निश्चित करणे, बेंच स्ट्रेंंथ बळकट करणे, व्यूहरचनात्मक नियोजनाला अंमलबजावणीची जोड देणे (स्ट्रेटेजिक प्लॅनिंग-एक्झिक्युशन चेन) आदी गोष्टी निर्णायक ठरणार होत्या. त्या काळी अर्जुन रंणतुगाला त्या जमल्या, मग स्टीव्ह वॉला जमल्या. कालांतराने गांगुलीनेही याच गोष्टी जमवून यश खेचून आणले. अझर मात्र आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत हा कोड क्रॅक करू शकला नाही, हे मान्य करावेच लागेल.

भारतात सिनेमा आणि क्रिकेट हे समाजमनावर सर्वदूर परिणाम करणारे दोन 'सी' मानले जातात. यांपैकी सिनेमाला अनेकदा समाजाचा आरसा असण्याचे श्रेय देण्यात येते. तथापि, थोडे बारकाईने पाहिल्यास क्रिकेटमध्येही त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीची प्रतिबिंबे उमटलेली दिसतील. त्या अर्थाने अझरच्या टीमचा प्रवास हा भारतातील ग्लोबलायझेशनच्या पहिल्या दशकास समांतर होता. प्रायव्हेट चॅनेल ब्रॉडकास्टिंग, मल्टिनॅशनल ब्रँड स्पॉन्सरशिप आदी ठळक खुणांपलीकडे खरवडल्यास याचे अर्थ उलगडू लागतात. मग, भारतीय संघात ठेहराव, निग्रह नव्हताविजयाची भूक व सवय नव्हती आदी लक्षणे तत्कालीन समाजालाही लागू होतात का, हे जिज्ञासूंनी चाचपडून पाहावे. अगदी, भारतीय संघ नयन मोंगियाला सलामीला धाडण्यापासून श्रीनाथला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस पाठवण्यापर्यंत प्रत्येक सामन्यात बॅटिंग ऑर्डर बदलत होता, त्याचवेळी देशातही जवळपास प्रत्येक वर्षी सरकार बदलत होते, यात साधर्म्य किती आणि योगायोग किती, हे सुद्धा ज्याचे त्याने स्वतःपाशी ठरवावे. प्रगती तर होतेय, पण तिचे करायचे काय हे कळत नाहीय, या सामाजिक अवस्थेतच गांगुली आणि धोनीने सचिनचा संघासाठी जसा योग्य वापर करून घेतला, तसा अझरला का करता आला नसेल?’ या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.

तर, या सर्व बाबी जमेत धरूनही अझरच्या संघात खिळवून ठेवण्यासारखे काहीतरी होते. पर्याय नव्हता, या स्वाभाविक उत्तरापलीकडचे काहीतरी. कारण, तसे तर आज जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराजची गोलंदाजी बघण्यास सरावलेल्यांना दोड्डा गणेश व अॅबी कुरुविलाकडून विकेटची अपेक्षा करण्यातील दुर्दम्य आशावाद समजावून सांगणे म्हणजे नळाखाली हात धरताच सेन्सरने पाणी येण्याची सवय असलेल्यांना सार्वजनिक हातपंपावरून कळशा भरून आणण्याचा नॉस्टॅल्जिया कथन करण्यासारखे आहे. मात्र, खेळाडूंच्या खेळण्या-वागण्यामध्ये फिल्टर्स, अदृश्य भिंती नसणे ही या संघाची सर्वांत मोठी जमेची बाजू होती. हे आपल्यापैकीच कोणीतरी खेळत असल्याची भावना सर्वसाधारण होती. स्लेजिंग ही तोपर्यंत गेमिंग स्ट्रॅटेजी म्हणून वापरली जात नव्हती. खेळाडू खरोखरच प्रतिस्पर्ध्यांवर चिडायचे आणि अशावेळी खेळाडूंना शांत करून खेळाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आपली आहे, याचे भान अझरसह त्या काळातील बहुतांश कर्णधारांनी बाळगले. खेळाच्या मनसोक्ततेपुढे जिंकण्याची ईर्षा दुय्यम होती. आपल्या कामगिरीचा आनंद (आणि आश्चर्य) खेळाडूंनाही प्रेक्षकांइतकाच होता. संघ स्पर्धा करण्यात उन्नीस-बीस असेलही, पण करमणूक करण्यात शत-प्रतिशत होता!

भारतीय संघाचे तोपर्यंत टीम इंडिया’, ‘मेन इन ब्ल्यू आदी नावांनी ब्रँड रिपोझिशनिंग व्हायचे होते. पूर्णपणे कमर्शियलाईज होण्यापूर्वीचा हा अखेरचा भारतीय संघ. संघातील प्रत्येक खेळाडू हा ब्रँड बनून त्याला मॅनेज करण्यासाठी पीआर, ग्रुमिंग एक्सपर्ट्स, कंडिशनिंग कोच इत्यादी प्रभृतींची फौज उभी राहण्यापूर्वीचाही अखेरचा संघ. त्याचप्रमाणे, On the receiver’s end, पानटपरीवर अनोळखी पंधरावीस जणांमध्ये जागा पटकावून आठ इंची टीव्हीकडे निरखून पाहणारे प्रेक्षकही अखेरचे याच संघाला लाभले. रस्त्यावरून जाताजाता इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांतील टीव्हींमध्ये काचेबाहेरून डोकावून जाणे, दूरवरून ऐकू येणाऱ्या जल्लोष किंवा सुस्काऱ्यांवरून चौकार-षटकार किंवा विकेटचा अंदाज बांधणे, पराभवानंतर संघाचे काय चुकले यावर सोबतच्या अनोळखी प्रेक्षकांशी एकमत होणे ही प्लुरॅलिटी व मल्टीकल्चरीझम नंतरच्या संघांच्या वाट्याला आला नाही. आधी एसएमएसवर स्कोअर अपडेट येऊ लागल्या, मग मॅच रेकॉर्ड करून सवडीनुसार बघण्याची सोय झाली, आता तर लाइव्ह स्ट्रिमिंगने क्रिकेट बघण्याचा अनुभवच एकवचनी करून टाकला. कर एकटाच किती जल्लोष करतोस ते बघूया!  

मॅच-फिक्सिंगच्या आरोपाने मात्र हे सगळं एका दिवसात विस्कटलं गेलं. सैरभैर झालं. बिग फन’च्याा कार्डांमध्ये श्रीमंती मोजणार्या सातवी-आठवीच्या मुलाला तुझे क्रिकेटिंग हिरो देशद्रोही असल्याचं सांगितलं गेलं. त्याची शहानिशा करण्याचे ते वय नव्हते. नंतरही ती केली गेली नाही. अल्पावधीतच गांगुलीने नव्या शतकातील भारतीय संघाची नवी स्वप्ने दाखवली. रममाण होण्याजोगी. मग आम्ही तीच आमच्या क्रिकेटप्रेमाची सुरुवात मानली. तसेही आधीच्या संघातले सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन या संघातही आलेच होते. जोडीला युवराज, सेहवाग, झहीर, कैफही आले. अझरच्या संघाच्या सिलेक्टिव्ह आठवणींतून खुद्द अझरच अलगद वगळला गेला. गांगुली-द्रविडची श्रीलंकेविरुद्धची 318 धावांची भागीदारी तर आठवते, पण त्यांना तिथपर्यंत येण्यासाठी पाठिंबा देणारा अझर नाही... 2012 मध्ये हायकोर्टाने अझरला फिक्सिंगच्या सर्व आरोपांतून मुक्त केले, तोपर्यंत आमच्यासाठी तो खूपच दूरस्थ झाला होता. त्याचे थोडेफार शैलीदार फटके वगळता काही म्हणजे काही आठवणींत उरले नव्हते.  

का कुणास ठाऊक, पण माझ्या मते भारताच्या सर्व वन-डे कर्णधारांना हा अनसेरेमोनियस गुडबायचा शाप आहेगांगुलीसारखा लढवय्या कर्णधार चॅपेलसोबतच्या वादानंतर कधी नेतृत्वपदावरून पायउतार झाला, हे समजलेही नाही. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने साखळी फेरीतच भारताच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पॅव्हेलियनमधील द्रविडचा हताश रडवेला चेहेरा आजही कसंनुसा करून जातो. दोन वर्ल्ड कपसह तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीला निर्णायक क्षणी धावबाद झाल्यानंतर खांदे पाडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागायला आणि त्यानंतर वर्षभर क्रिकेटपासून दूर राहून निवृत्ती जाहीर करावी लागायला नको होती. कसोटी पदार्पणात सलग तीन शतके ठोकण्याचा विक्रम रचणाऱ्या अझरने आपल्या ९९ व्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले. यामुळे पहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला असला, तरी त्याचे कसोटींचे शतक पूर्ण होऊ शकले नाही ते नाहीच.

सत्यघटना आहे, २०१३ च्या रेल्वे बजेटवेळी संसदेबाहेर व्हिजिटर्स पास हातात घेऊन चेकिंगच्या रांगेत उभा होतो. आमच्या शेजारीच उशीरा येणाऱ्या खासदारांना थेट सभागृहात प्रवेश देणारे गेट होते. एकातरी महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्याला आज उशीर व्हावा आणि तो येथून जाताना आपल्याला जवळून दिसावा, अशी इच्छा आमच्या रांगेतील बरेचजण बाळगून होते. पहिल्या एक-दोन अनोळखी चेहेऱ्यांनंतर अचानक चिरंजीवी दिसला. तेलुगू चित्रपटचाहत्यांनी रांगेतूनच हाका मारल्या, त्याचे एक-दोन संवाद म्हटले. त्याने एक नजर बघितले, हसला आणि हात हलवून निघून गेला. थोड्या वेळाने त्याच गेटपुढे अझर आला. पुढचा मागचा काही विचार न करता अर्ध्याहून अधिक जणांनी रांगेतील आपल्या जागा सोडल्या आणि थेट अझरकडे धाव घेतली. आसपास कोणी अंगरक्षक नव्हते. अझर मैदानाइतकाच इथेही शांत, अलिप्त होता. त्याने एक-दोघांशी हस्तांदोलन केले. त्याच्या पायाला स्पर्श करणाऱ्या एक दोघांना उठवले. त्याच्यामुळे रांगेतले सदस्य कमी होऊन माझा संसदप्रवेश सुकर झाला होता. तरीही अख्खा रेल्वे बजेटचा तास मी एवढी काय अझरची क्रेझ आहे?’ ते ‘आपणही जायला पाहिजे होतं का?’ या दोन टोकांवर हिंदकाळण्यात घालवला.  

आता हे लिहित असताना गल्लीत काही मुले क्रिकेट खेळत असतील. कोणीही न करता त्यांच्यातील एकजण आपोआपच कप्तान होतो. कोणाच्या घरी बॉल गेला, तर मागून आणेल. कॉलनीतल्या चिडखोर काकांना शांत करेल. कोणाची काच फुटली, तर फोडणाऱ्याला पाठिशी घालेल. प्रत्येकाला बॅटिंग मिळण्याची खातरजमा करेल, पलीकडच्या गल्लीविरुद्ध सामन्यामध्ये भांडणे होऊ देणार नाही, झाल्यास सोडवेल. कालपरत्वे, शाळा-कॉलेज-जॉब-दुसरे शहर या प्रवासात बहुतांशजणांचे गल्ली क्रिकेट सुटते. अनेकजण कॉलनी, गल्ली सोडून दुसरीकडे राहायला जातात. कोणी तर परदेशात, कोणी कुठे- कोणी कुठे... कप्तान मात्र तिथेच. आता याला हवं तर अपयश म्हणा किंवा आणखी काही... पण बाकीची मुले कधीही शहरात परतली, तर जुन्या गल्लीत येऊन त्या कप्तानाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. येताना आपल्या मुलांनाही सोबत आणून इथे गाजवलेला पराक्रम सांगतील. लेखाच्या सुरुवातीची चर्चा त्यांच्यातही रंगेल. त्यांचा आपल्या बालपणासोबतचा सांधा त्या कप्तानाने जोडून धरला आहे आणि गल्लीगणिक नावे बदलत असली, तरी तो कप्तान अझर आहे!