Wednesday, June 12, 2019

तो दिवस...

नववीचं वर्ष. शाळेचा पहिला दिवस. खरंतर, प्रत्येक वर्षी दोन महिन्यानंतर शाळेत जाताना मनात संमिश्र भावना असतात. एकीकडे, इतकी मोठी सुटी संपली (आणि फारसं काहीच विशेष संस्मरणीय घडलं नाही) ही रुखरूख आणि दुसरीकडे नवी इयत्ता, नवं साहित्य, मित्रांची पुनर्भेट, ओळखीचे चेहेरे, दंगामस्तीचं हक्काचं ठिकाण हे सर्व मिळाल्याचा आनंद यांच्या लंबकावर आपण कुठेतरी झुलत असतो. या वर्षीचा लंबक मात्र आनंदाकडे जरा जास्त झुकलेला होता.
फायनली, बालवाडीची दोन आणि नंतरची आठ वर्षं चड्डीत घालवल्यानंतर आता आम्हाला अधिकृतपणे फुल पँट वापरायची परवानगी मिळाली होती. म्हणजे आम्ही आता सीनियर्समध्ये गणले जातो, हे शाळेने ऑफिशियली मान्य केलं होतं. गुणपत्रकही वाढून 750 गुणांचं झालं होतं (त्याने मिळणाऱ्या गुणांत फार काही फरक पडणार नसला, तरी!). गणित, विज्ञान हे विषय विभागले गेले होते आणि इतिहास, नागरिकशास्त्र-भूगोलसोबत अर्थशास्त्र नावाचा नवा भिडू आला होता. (तो तिथपासून थेट बी-कॉमपर्य़ंत ऑप्शनलाच होता, हा भाग वेगळा.) दहावीच्या तयारीचं वर्ष म्हणून स्वतःला उगाचच जबाबदार समजण्याचं एक कारण दुनियेनं उपलब्ध करून दिलं होतं आणि असं काही आयतं मिळाल्यावर आम्ही सोडतोय, होय!!
त्या दिवशीची प्रार्थना संपली आणि कधी एकदा नव्या वर्गात जाऊन सुट्टीतल्या साध्यासुध्या गोष्टी वाढवून-चढवून इतरांवर फुशारकी मारतोय, याच्या तयारीत आम्ही असतानाच भागवत सर माइकवर आले. भागवत सर हे शाळेतलं भारदस्त नाव होतं. एकदम नाम ही काफी है कॅटेगरी! आज हे लिहिताना त्याचं अध्यापन कौशल्य, विषय समजावण्याची हातोटी, व्यासंग इत्यादी गोष्टींवर कितीही ओळी खर्च करता येतील, पण त्या वेळी त्यांचा धाक आणि त्याला कारणीभूत असलेलं त्यांचं प्रहारशास्त्र हे आमच्यासाठी बाकी सर्वांपेक्षा वरचढ होतं. त्यावेळी माइकवरून त्यांनी एखाद्याचं नुसतं नाव जरी घेतलं असतं, तरी त्याच्यावर नवी पँट बदलण्याची वेळ आली असती.
त्या दिवशीचा त्यांचा नूर मात्र वेगळा होता. त्या आधी त्यांनी कधी माइकवर येऊन अख्ख्या शाळेला संबोधित केल्याचं आठवत नाही. त्यामुळे काहीतरी विशेष घोषणा आहे, हे पक्कं होतं. ते माइकवर आले आणि दहा-वीस सेकंद काही बोललेच नाहीत. कोणीही न सांगता शाळाभर पिन-ड्रॉप सायलेन्स मूर्तिमंत प्रकटला होता. त्यांच्याच खाकरण्याने ती शांतता भंगली आणि त्यापुढे शक्य तितक्या तटस्थपणे जड धीरगंभीर आवाजात त्यांनी ते शब्द उच्चारले...

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमक्त्व म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं…”

तो दिवस होता, 12 जून 2000.

तोपर्यंत पुलंच्या साहित्यापैकी मी फक्त सातवीला असलेला त्यांचा अभ्यास- एक छंद हा धडा वाचला होता. घरी त्यांच्या कॅसेट्स असल्याने कथाकथनकार, सादरकर्ते म्हणून त्यांची ओळख होती, ते ऐकताना हसलोही होतो; पण, साक्षात भागवत सरांचा आवाज कातर बनवण्याइतकं या माणसानं काय केलंय, याची काही कल्पना नव्हती. त्यापुढे दहा-पंधरा मिनिटं भागवत सर पुलंविषयी बोलले. त्यांचं व्यक्तिमत्व, साहित्य, त्यांचं अन्य क्षेत्रातलं योगदान, एका अर्थाने ते शोकसभेचं भाषण होतं. सर अद्याप धक्क्यातून पूर्णपणे सावरले नसल्याचं बोलताना जाणवलं. बोलत आमच्याशी असले, तरी कुठेतरी स्वतः मोकळे होत असावेत. त्यानंतर आदरांजलीसाठी एक मिनिट स्तब्धता पाळत होतो, तेव्हाच पुलं हा कोणीतरी लै भारी माणूस असणार, इतकं मनावर ठसलं होतं.
वर्गात परतल्यानंतर काहीच आधी ठरवल्याप्रमाणे झालं नाही. कोणीच घोळके केले नाहीत, कोणीच फुशारक्या मारल्या नाहीत. मघाची शांतता प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली असावी बहुदा. शाळेचा पहिला दिवस जाऊ नये, तसा गेला. घरी आल्यानंतरही वडिलधाऱ्यांमध्ये तोच विषय होता. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमीचं शीर्षक होतं, ‘शारदाकंठातील कौस्तुभमणी निखळला’! हे सगळं काय चाललंय, ते कळण्याचं वय नव्हतं असं नाही, फक्त आम्ही तितके जिज्ञासू नव्हतो. त्यानंतर, दोन वर्षांनी अकरावीत मी पुलंच पहिलं पुस्तक वाचलं. मग एकापाठोपाठ एक जवळपास सगळी वाचली, व्हिडिओ, नाटकांची पारायणं केली. पुलं आपलेसे झाले, तेव्हा वाटलं की बरं झालं त्यादिवशी ते कोण हे माहित नव्हतं. नाहीतर, रडलोच असतो भागवत सरांचं भाषण ऐकताना...
पुढच्या 12 जूनला वीस वर्षं होतील या घटनेला. पुलंचं हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. आजही हा दिवस उजाडला की मला पुलंची पुस्तकं, त्यातले किस्से, कोट्या, त्यांच्या सादरीकरणातील जागा, भावविभ्रम या सगळ्यांआधी आठवते ती 12 जूनची नितांत कोरी शांतता आणि त्यावर उमटलेले भागवत सरांचे शब्द. पुलं कळण्याच्या खूप आधीच जणू सरांनी आपण काय गमावलेय, याची जाणीव त्या पोकळ शांततेतून करून दिली होती.


दर 12 जूनला ही पोकळी अशीच व्यापून राहील...