Tuesday, August 17, 2010

स्पर्शब्रह्म

उन्हाळा. वैतागवाणा. त्यात एक मृत्युवार्ता. मित्राच्या आजोबांची. त्याच्या घराबाहेर गर्दी. टळटळीत उन्हात ताटकळत जो-तो शववाहिकेच्या प्रतीक्षेत. शववाहिका येताच गडबड सुरु. शववाहिकेसोबत आम्हीही स्मशानभूमीकडे रवाना.
तिथे पोहोचताच संबंधित लोक कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतलेले. पार्थिव सोपवून शववाहिका मार्गस्थ. पुन्हा प्रतीक्षा. थांबलेल्या सर्वांच्या चेहेऱ्यावर साधारणतः ' कधी एकदा मोकळे होतोय?', असे भाव. काही अंतरावरून चितेच्या जळण्याचा आवाज. एकूण भवतालावर शोकमय गांभीर्य पसरलेले.
एकाएकी वातावरणात अनपेक्षित बदल. अंधारून. सोसाट्याचा वारा,गडगडाट, मातीचा दरवळ इत्यादी पूर्वसूचना एखाद-दीड मिनिटात आटपून पाऊस बरसण्याच्या बेतात. तारांबळ. पार्थिवाजवळ असणारे आम्ही चौघे-पाचजण पार्थिवासाठी आडोशाची जागा शोधण्यास प्रयत्नशील. तरीही पहिला थेंब वाटेत गाठतोच! मागोमाग दुसरा-तिसरा... त्यांचा स्पर्श हवाहवासा. स्थळ-काळ विसरून चिंब भिजावेसे वाटायला लावणारा. धुंद. पण कर्तव्यदक्षता आडवी! अनुचित चुटपूट, हुरहूर, हिरमोड इत्यादी! अखेर पार्थिवासह आम्ही आडोशाला. पार्थिवावरील विस्कटलेले कापड व्यवस्थित करताना अभावितपणे नजर त्या थंड देहाच्या कपाळावरील पावसाच्या काही थेंबांवर. त्यांच्या स्पर्शाची कोणतीच अनुभूती त्या अचेतन देहावर उमटलेली नाही. आपण जिवंत असल्याची जाणीव माझ्या कपाळावरून ओघळत्या थेंबासोबत तीव्रतेने स्पर्शून जाणारी. स्पृश्यतेच्या आकलनास नवा अर्थ प्राप्त.
सरतेशेवटी मर्तिकास सुरुवात. आता बाहेर पाऊस आडवा-तिडवा कोसळतोय आणि समोर चितेवर देह जळतोय. त्या अग्नीची धग स्पर्शावाटे जाणवत्येय. पावसामुळे गारठलेल्या शरीराला उबेने लपेटू पाहत्येय...चेतनामय...

Monday, March 8, 2010

साउंड इफेक्ट

भरून वाहणारा रस्ता एका भरगच्च चौकात येऊन मिळतो. सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप. समोरचा दिवा पिवळा असेपर्यंत वाहनांची सिग्नल ओलांडण्याची धडपड सुरु. दिवा लाल झाल्यानंतर काही करकचून मारलेल्या ब्रेक्सचा आवाज. आता एकामागोमाग एक गाड्यांच्या रांगा लागण्यास सुरुवात. त्यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून अस्ताव्यस्तपणे घुसण्यासाठी दुचाकींचे कसोशीचे प्रयत्न. लाल दिव्यावरच्या टायमरमध्ये एकशे पन्नास सेकंदांचा उलटप्रवास. त्याचवेळी डावीकडील सिग्नल सुटल्याचे संकेत. मी डोळे बंद करून घेतो आणि कानावर पडणारे आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो.
सर्वप्रथम डावीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज कानात भरतो. इतर काहीच ऐकू येऊ नये एवढा कर्कश्श! अपवाद फक्त त्यासोबत ऐकू येणाऱ्या विविध वाहनांच्या स्टार्टर्सचा. (यापैकी कुठला हॉर्न कोणत्या वाहनाचा आहे हे ओळखण्याचाही प्रयत्न केला पण त्याविषयीचे वर्णन येथे अप्रस्तुत.) प्रत्येक हॉर्नमध्ये एकप्रकारचा उग्र, आक्रमक सूर.काही सेकंद हा आवाज तसाच ऐकू येतो. मग हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाते. आता त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर इतर आवाज ऐकू येतात. गाडीवर सिग्नलवरील मुले मारत असलेल्या थपडा, फळविक्रेत्यांच्या आरोळ्या, शेजारच्या बाईकवर बसलेल्या मुलामुलींचे खिदळणे(केवळ खिदळण्यावरून मी त्यांच्यातील नातेसंबंध नाही सांगू शकणार!). काही अर्धवट वाक्ये...
"साब, दो रुपया साब."
"फक्त तीस रुपये किलो, फक्त..."
" तीन दिनसे कुछ नही खाया साब."
"टपोरी द्राक्षे, ताजी गोड द्राक्षे फक्त..."
मग काही सेकंदात हॉर्न्सच्या आवाजाची पार्श्वभूमी गायब होते. केवळ एखादी मोटारसायकल सुसाट जात असल्याचा आवाज. मग पुन्हा करकचून ब्रेक. पोलिसांची शिट्टी. एखाददुसरा क्षण निरव शांतता. मग पुन्हा हॉर्न्सचा आवाज भवतालावर वरचढ. पुन्हा त्याचे काही सेकंदांनी निवळणे, पुन्हा आधीचीच अर्धवट वाक्ये. त्यात काही नवीन वाक्यांची भर.
" तरी तुला मी सांगत होते,ती ब्ल्यू केप्रीच चांगली होती."
"ए***, अरे डावीकडे वळ ना! उगाच जागा का अडवतोय??"
आरोळ्यामध्येही एकमेकांशी स्पर्धा. वाढत जाणारे आवाज. पुन्हा शिट्टी. मात्र यावेळी क्षणभरही निरव शांतता नाही. आधीच्या हॉर्न्समध्येच उजवीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज मिसळतो. पुन्हा तेच आवर्तन! आता माझ्या आजूबाजूलाही अस्वस्थता वाढलेली. गाड्यांचे स्टार्टर्स मारल्याचे आणि बाईक 'रेज' केल्याचे आवाज. त्यातच आरोळ्याचे,खिदळण्याचे, थपडांचे, भिकेचे आवाज मिसळतात. वेगाने वाढत जातात. गोंगाट!! एका ठरावीक क्षणी केवळ आवाज कानावर पडत राहतात परंतु त्यातून अर्थबोध होत नाही. मेंदूच्या enconding-decoding क्षमतेपलीकडे ध्वनीचा वेग व तीव्रता पोहोचते. बधिरता!!!
मी शांतपणे डोळे उघडतो. गाडीच्या काचा बंद करून घेतो. येणारे आवाज आता खूप दुरून येत असल्यासारखे वाटतात. रेडिओ सुरु करतो. आर.जे. च्या आवाजातील उत्साह ओसंडून वाहणारा! पाठोपाठ एक मंद सुरावट ऐकू येते. सर्वकाही विसरायला लावणारी. बाहेरच्या जगापासून अलिप्त, अधांतरी असल्याचा भास होतो. बरे वाटते. टायमरवर शेवटचे काही सेकंद दिसू लागतात. मी गिअर टाकून सरसावून स्टेअरिंग पकडतो.तयार राहतो. पाच...चार...तीन...दोन...एक...

Tuesday, February 16, 2010

काही सांगावेसे...

नमस्कार. खरेतर ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी १४ तारखेलाच प्रसिद्ध करायची होती.( 'व्हेलेन्ताईन डे'चे औचित्य साधून नव्हे!) परंतु पुण्यात १३ तारखेला झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मन थोडे विचलित होते.( काय करणार? इतक्या दहशतवादी घटनांनंतरही आम्ही अजून सराईत झालेलो नाही. अजूनही मन विचलित होते. लवकर उपाय शोधला पाहिजे!) म्हणून लेखनास विलंब होतोय.
१४ तारखेला ब्लॉग सुरु करून २ महिने झाले. बऱ्याच काळानंतर लेखन केले. त्यातून माध्यम नवीन! त्यामुळे सुरुवातीला मी निश्चिंत नक्कीच नव्हतो. ३ पोस्ट प्रसिद्ध केल्या. काही ड्राफ्ट म्हणून तशाच पडून आहेत. काही प्रयोग करून पहिले. ( क्रियापदाविना लेखन) काही नव्या गोष्टीही लक्षात येत गेल्या.( मनात साचलेल्या प्रत्येक गोष्टीला वाट मोकळी करून देण्यासाठी ब्लॉग हे माध्यम नाही इ.) याकाळात खूप जणांनी ब्लॉग वाचला असल्याचे सांगितले. काही परिचित- अपरिचितांनी आवर्जून प्रतिक्रिया नोंदवल्या, सूचना केल्या. त्यासार्वांचे मनःपूर्वक आभार. त्यामुळेच एक आत्मविश्वास जाणवतोय, एक नवीन प्रयोग करण्यासाठी!
वर्षभरापूर्वी एका मैत्रिणीने विचारले होते, "आयुष्यात sensibility महत्वाची sensitivity?" मी नेहमीप्रमाणेच त्याहीवेळी काहीतरी nonsense उत्तर दिले पण त्या गोष्टीचा मी तेंव्हापासून विचार करू लागलो. काही काळापूर्वी माझ्या लक्षात आले की आपण विचार तर खूप करतोय (माझ्यापरीने खूप हं!) पण मुलभूत सेन्सेस जे आपल्याला सांगू पाहताहेत ते अर्धवटच लक्षात घेतोय. म्हणजे एखादी गोष्ट सवयीची झाली म्हणजे त्यातील मानसिक गुंतवणूक कमी होत जाते किंवा एका प्रकारची गणिते सोडवता येऊ लागली की ती तितक्या दक्षपणे सोडविली जात नाहीत तसे! हे लक्षात आल्यावर मी अनेक गोष्टींचा विचार या सेन्सेसच्या अंगाने करून पहिला आणि मला फार वेगळी अनुभूती मिळाली. अशाच पाच मुलभूत सेन्सेसनी जाणवलेल्या आणि त्यासंदर्भाने विचार करून लिहिलेल्या लेखांची मालिका पुढील पोस्टपासून सुरु करण्याचा प्रयोग करत आहे. भेटू.
( टीप- १. प्रयोग असल्याने तो फसण्याची शक्यता अधिक.
२. या लेखंचे वातावरण आणि स्वरूप मुक्त असल्याने भाषिक भ्रष्टाचार होऊ शकतो.)

Tuesday, January 5, 2010

नवी निरक्षरता

(कसे अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या अग्रलेखाचे शीर्षक वाटतेय ना!)
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या पोलीस उपायुक्तांशी भेट झाली. ( तुरुंगात नव्हे,सदिच्छा भेट!) त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे चालली असताना एकीकडे टिपणे घेणेही सुरु होते. माझ्याशेजारी बसलेली अमेरिकन सहकारीही त्यांच्याशी संवाद साधत होती, परंतु नोट्स मत्र घेत नव्हती. तेथून बाहेर पडताना मला म्हणाली, "तुझ्या नोट्स नंतर मला दे." 'उपायुक्त इंग्लिशमध्ये बोलत असूनही हिने नोट्स का बरे घेतल्या नसतील?' नंतर मी दिलेल्या नोट्स तिने भराभर कॉम्प्युटरवर टाईप करून घेतल्या तेंव्हा मात्र मला हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवेना.
"Actully, मला लिहायला थोडे अवघड जाते. मी लिहायला 4th मध्ये असतानाच शिकले. पण मी चार वर्षांची असल्यापासून कॉम्पुटर वापरते. त्यामुळे मला सगळे लिखाण कॉम्पुटरवरच करणे सोयीचे आहे." -तिचे उत्तर. (Actullyला समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही.) माझ्या डोक्यात विचार सुरु झाला.
मी पहिल्यांदा पाचवीत असताना कॉम्प्युटर हाताळला आणि इतक्या वर्षांनी माझे कॉम्प्युटरचे ज्ञान पाहता मी सध्या सहावीत शिकत असल्याचा अनेकांचा समज होईल. आपल्या देशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या चार टक्क्यांमध्ये माझा समावेश होत असेल तर इतर ९६% मुलांचे काय?
मला वाटले, हा एक चांगल्या लेखाचा विषय आहे. मी त्यादृष्टीने अभ्यास सुरु केला. पुढील काही दिवसात अमेरिकेतील शिक्षणपद्धती,त्या पद्धतीमधील संगणकाचा वापर, त्यासंदर्भात आपली शिक्षणव्यवस्था, साक्षरता अभियान, आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये संगणकज्ञानाचा वापर यांविषयी माहिती जमविली.
भारतात २०१५ पर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्माण होतील. हे रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संगणकज्ञान व कौशल्य असलेल्यांची संख्या, मनुष्याचा कौशल्यास्तर(human skill index)वाढवण्यातील संगणकाची उपयुक्तता व गरज, काय काय गोष्टी पडताळल्या!
साक्षरता अभियानाचा संपूर्ण डोलारा हा अजूनही अपवाद वगळता खडू, फळा इत्यादी साधनांवर अवलंबून आहे आणि देशाच्या राष्ट्रीय ठोक उत्पन्नातील(GDP) सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा असून त्यामध्ये संगणकाशी संबंधित सेवा आघाडीवर आहेत. हे सर्व विचारात घेता 'देश साक्षर बनवण्याच्या प्रयत्नात आपण एक नवी निरक्षरता निर्माण करत आहोत', अशा निष्कर्षाप्रत आलो.
परवा कॉलेजच्या कॉम्पुटर रूममध्ये मराठी टायपिंगशी झगडत बसलो होतो. तेंव्हा पूर्ण शिक्षण महानगरात झालेली शेजारील मैत्रीण वेगाने इंग्रजी टायपिंग करताना म्हणाली, "मला हल्ली कागदावर लिहिताना काही सुचतच नाही. कॉम्पुटरवर टाईप करून नंतर कागदावर उतरवावे लागते!" (महाविद्यालयातील संगणककक्षात टंकलेखन वगैरे लिहिवेना.)
अरेरे! उगाचच अमेरिकेतून माहिती मिळवण्यासाठी एवढा धडपडलो! लेख लिहिण्याचा मनसुबाही त्याक्षणी बारगळला!