Saturday, May 21, 2016

गणिताचा चित्रकार



क्षयरोग झाल्याने रामानुजन रुग्णशय्येवर आहेत. बाजूला गणितज्ज्ञ हार्डी बसलेत. रामानुजन म्हणतात, ‘तुम्ही मला नेहमी विचारायचात ना, माझ्या प्रमेयांच्या सिद्धता माझ्याकडे नाहीत, तर मला ती प्रमेय सुचतात कशी? काल रात्री या रुग्णालयात मला त्याचे उत्तर सापडले.’
सातत्याने सिद्धतांचा पाठपुरावा करणारे हार्डी काळजीपूर्वक ऐकू लागतात.
रामानुजन पुढे म्हणतात, ‘रोज रात्री देवी माझ्याकडे येते आणि माझ्या जिभेवर ही प्रमेय ठेवून जाते!’
.....

‘श्रीनिवास रामानुजन यांना गणित आवडायचे’, एवढी एकच बाब त्यांच्यापासून अंतर राखण्यासाठी पुरेशी नाही का? त्यातून ते ‘ग्रेट’ होते, यावर अगोदरच शिक्कामोर्तब झाले असल्यामुळे पुढचे सगळे प्रश्नच संपतात. म्हणजे, रामानुजन यांचे नाव निघाले की ‘हां, ते महान गणिती...’ म्हटले की आपण जनरल नॉलेजच्या फेऱ्यातून सुटलो आणि रामानुजन पुन्हा एकदा फोटोफ्रेममध्ये बंदिस्त झाले.
दि मॅन व्हू न्यू इन्फिनिटी (The man who knew infinity) हा चित्रपट रामानुजन यांना या फ्रेममधून खेचून बाहेर काढतो आणि आपल्यामध्ये मिसळवतो. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या जीवनकाळामध्ये हा ग्रेटनेस अगदी अभावानेच अनुभवता आला, हे सुद्धा चित्रपट अधोरेखित करतो. हा ग्रेटपणा सिद्ध करण्यासाठी त्यांनी मोजलेली किंमत मात्र अमाप होती. रॉबर्ट कॅनिगेल यांच्या याच नावाच्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे. १९१४ ते १९२० या सहा वर्षांच्या काळात चित्रपट घडतो. म्हणजे रामानुजन यांच्या जीवनातील सव्वीस ते बत्तीस वर्षे.
गाठिशी पदवी नसल्याने रामानुजन यांना मद्रासमध्ये नोकरी मिळत नाहीये आणि आपण अंकांचे किमयागार आहोत, हे त्यांनी ओरडून सांगूनही कोणाला पटत नाहीये. दारिद्र्यामुळे ते पत्नी व आईपासून दूर, मद्रासला एका मंदिरात राहात आहेत आणि कागदाच्या तुटवड्यामुळे मंदिराच्या दगडांवरच त्यांनी आपली समीकरणे गिरवलेली आहेत. सुरुवातीच्या या काही फ्रेम्समधून रामानुजन यांचे खडतर आयुष्य समोर येते.
यापुढील प्रत्येक टप्प्यावर हा संघर्ष वाढतच जातो आणि तो केवळ आर्थिक राहात नाही. नोकरी मिळाल्यानंतर पहिला संघर्ष होतो रूढीपरंपरांशी. तत्कालीन भारतीय रेल्वेमधील अभियंते सर फ्रान्सिस स्प्रिंग यांच्या शिफारशीमुळे रामानुजन यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडहून बोलावणे आले आहे. पण ब्राह्मण असल्याने त्यांना समुद्र ओलांडण्याची परवानगी नाही. गणिताच्या ओढीने रामानुजन एक दिवस स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापून टाकतात आणि समुद्र ओलांडून लंडनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल होतात.
तेथे शाकाहारी जेवण मिळवण्याची धडपड, बुट घातल्याने पायांना होणारा त्रास इत्यादींशी जुळवून घेत असतानाच कारकिर्दीतला सर्वांत मोठा संघर्ष त्यांच्यापुढे उभा राहतो. रामानुजन यांच्याकडे स्वतःच्या प्रमेयांनी भरलेल्या दोन वह्या आहेत. मात्र, या प्रमेयांच्या शास्त्रशुद्ध सिद्धता त्यांच्याकडे नाहीत. कोणतेही गणित ते सहज सोडवू शकतात. मात्र, उत्तरापर्यंत पोहोचण्याची सर्वमान्य शास्त्राधारित मांडणी त्यांना अवगत नाही. याच टप्प्यावर प्रोफेसर हार्डी रामानुजन यांना भेटतात. ब्रिटनमधील वास्तव्य मर्यादित असल्याने तत्पूर्वी आपली प्रमेय प्रकाशित व्हावीत, याबाबत रामानुजन आग्रही आहेत आणि त्यांनी ही प्रमेय सिद्ध करून दाखवल्याशिवाय व इतरांनी त्या सिद्धतेला मान्यता दिल्याशिवाय ती प्रकाशित करता येणार नाहीत, याबाबत हार्डी ठाम आहेत. निरीश्वरवादी, कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव मागणारे, तर्काच्या कसोट्यांवर पारखून घेणारे हार्डी आणि भारतातून आपल्या देवांच्या मूर्तीच काय, पण त्या धुण्यासाठी तेथील पाणीही घेऊन आलेले सश्रद्ध रामानुजन यांच्यामध्ये वैयक्तिक स्तरावर, तसेच दोन ‘स्कूल’ म्हणून सुरू असलेला संघर्ष हा चित्रपटाचा मुख्य ट्रॅक म्हणता येईल.
हा संघर्ष दाखवतानाच दिग्दर्शक मॅथ्यू ब्राउन टिनिटी कॉलेजमध्येही डोकावतो. विज्ञान क्षेत्रावर असलेले ट्रिनिटी कॉलेजचे गारूड (aura), आयझॅक न्यूटनला ज्याखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तो वृक्ष, केवळ प्राध्यापक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनाच चालण्याची परवानगी असलेली हिरवळ, जिथे न्यूटनची वही काचेच्या फ्रेममध्ये जपून ठेवण्यात आली आहे ते वाचनालय (हार्डी यांनी रामानुजनना सिद्धतेचे, शास्त्रीयदृष्ट्या प्रमाण असण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निखालस सुंदर प्रसंग या वाचनालयात चित्रित करण्यात आला आहे. कोणताही शास्त्रज्ञ, संशोधक का धडपडत असतो, इतिहासामध्ये अजरामर होण्यामागची त्याची प्रेरणा काय असते याविषयी या प्रसंगामध्ये हार्डी यांच्यातोंडी असलेले संवाद हा चित्रपटातील ‘हाय पॉइंट्स’पैकी एक आहे.) आदी गोष्टी दिग्दर्शक टिपतो, तसेच तेथील एकाहून एक तऱ्हेवाइक प्राध्यापक, सहृदय स्वभावाचे लिटिलवूड, मार्मिक बोलणारे बर्टांड रसेल (जगाला श्रेष्ठ तत्त्वचिंतक, नोबेलविजेते साहित्यिक म्हणून ज्ञात असलेले डॉ. रसेल हे ट्रिनिटीमध्ये गणिताचे प्राध्यापकही होते.), दारावर ‘टकटक’ झाल्यास  ‘Enter at your own risk’ म्हणणारे मॅकमोहन यांच्यावरूनही दिग्दर्शक मिश्किल नजर फिरवतो.
काळ पहिल्या महायुद्धाचा आहे. अख्खं ब्रिटन महायुद्धाच्या सावटाखाली वावरत असून वस्तुंचा, वैद्यकीय सेवांचा तुटवडा जणवत आहे. सैनिकांचा उन्माद वाढला आहे आणि राष्ट्रभक्तीच्या अस्मिता टोकदार झाल्या आहेत. याचा फटका एकदा रामानुजन यांनाही सहन करावा लागतो. त्यातच एक ‘ब्राउन’ माणूस आपल्यापेक्षा गणितात पारंगत आहे, हे सहन करणे श्वेतवर्णियांना कठीण जाते आणि रामानुजन यांना ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप नाकारली जाते.
आपलीच प्रमेय पाश्चात्य मांडणी वापरून सिद्ध करताना रामानुजन यांची चांगलीच दमछाक होते. ही प्रमेय हे चौर्य नसून आपण आत्मसात केलेले ज्ञान आहे, हे पटवण्यासाठी रामानुजन यांची धडपड आणि त्याचवेळी रामानुजनचे संशोधन मूलगामी आहे आणि त्यांनी ते चोरलेले नाही, हे माहित असूनही त्यांना सुसंगत मांडणीसाठी प्रवृत्त करणारे हार्डी या पटकथेतील दोन ‘प्रेशर पॉइंट्स’ मधील ताण वाढत जातो. पण कटुता येत नाही. दोघे एकमेकांबद्दलचा आदर कायम ठेवतात.
रामानुजन यांच्या गंभीर आजारपणाची कल्पना आल्यानंतर त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवून देण्यासाठी हार्डी प्रयत्न करतात. रॉयल सोसायटीच्या त्या सभेमध्ये रामानुजनच्या वतीने केलेल्या सादरीकरणामध्ये हार्डी म्हणतात, ‘शास्त्रज्ञ काही नवीन निर्माण करत नाही, तर हे सर्व ज्ञान सृष्टीत सुप्तावस्थेत अस्तित्त्वात आहे आणि शास्त्रज्ञ केवळ ते शोधून काढतो, असे आपण मानत असू, तर रामानुजनच्या प्रमेयांची सिद्धता मागणारे आपण कोण? त्या प्रमेयांमध्ये ज्ञान अस्तित्त्वात असेल, तर ते शोधण्याचे प्रयत्न करणे ही आपलीही जबाबदारी नाही का?’ हार्डींच्या भूमिकेतील जेरॉमी आयर्न्स यांनी आपल्या अभिनयाने हा प्रसंग उंचीवर नेऊन ठेवला आहे. ही फेलोशिप रामानुजन यांना मिळते, तेव्हा हार्डी दार उघडून त्यांना आत प्रवेश देतात आणि आतमध्ये सोसायटीचे सदस्य असलेले सर्व दिग्गज टेबल वाजवून रामानुजन यांचे स्वागत करतात, हा प्रसंगही असाच. या प्रसंगात रामानुजनच्या भूमिकेतील देव पटेलच्या चेहऱ्यावरील हावभावही स्पर्शून जाणारे आहेत.
चित्रपटातील प्रेमकथेचा भाग मात्र फारच सरधोपट आहे. म्हणजे, इकडे चेन्नईला रामानुजन यांच्या पत्नीने आणि तिकडे केंब्रिजला रामानुजन यांनी एमेकांच्या विरहात झुरायचे, पत्रे पाठवायची, ती न मिळाल्याने गैरसमज बाळगायचे, हे सगळे असेच घडले असेल असे मानले, तरीही ते दाखवताना साचेबद्ध चौकटीपलीकडे चित्रभाषेचा वापर झालेला नाही.
.....

एका दृश्यात पत्नी रामानुजन यांना विचारते, ‘तू हे अंक फरशीवर गिरवत बसलेला असतोस, ते काय आहे?
रामानुजन उत्तर देतात, ‘ती चित्रं आहेत माझी. ती मला रंग भरण्यासाठी आव्हान देतात आणि मी त्यांच्यामध्ये रंग पाहू शकतो.’
.....

या चित्रपटात त्रुटी निश्चित आहेत. काही ठिकाणी तो प्रयोगक्षमतेची संधी नाकारून ‘सेफ’ मार्ग निवडतो. हा काही सर्वांगसुंदर चरित्रपट नव्हे. मात्र, चित्रपटाच्या अखेरीस १९७६ मध्ये सापडलेली रामानुजन यांच्या प्रमेयांची वही न्यूटनच्या वहीप्रमाणेच ट्रिनिटीच्या वाचनालयात फ्रेममध्ये ठेवलेली दिसते. ज्या गणिताच्या चित्रकाराने आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात केलेली गणितरंगांची उधळण शतकभरानंतरही जिवंत आहे, त्या उधळणीच्या या व अशाच काही रंगछटा पडद्यावर अनुभवण्यासारख्या आहेत.