Monday, March 8, 2010

साउंड इफेक्ट

भरून वाहणारा रस्ता एका भरगच्च चौकात येऊन मिळतो. सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप. समोरचा दिवा पिवळा असेपर्यंत वाहनांची सिग्नल ओलांडण्याची धडपड सुरु. दिवा लाल झाल्यानंतर काही करकचून मारलेल्या ब्रेक्सचा आवाज. आता एकामागोमाग एक गाड्यांच्या रांगा लागण्यास सुरुवात. त्यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून अस्ताव्यस्तपणे घुसण्यासाठी दुचाकींचे कसोशीचे प्रयत्न. लाल दिव्यावरच्या टायमरमध्ये एकशे पन्नास सेकंदांचा उलटप्रवास. त्याचवेळी डावीकडील सिग्नल सुटल्याचे संकेत. मी डोळे बंद करून घेतो आणि कानावर पडणारे आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो.
सर्वप्रथम डावीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज कानात भरतो. इतर काहीच ऐकू येऊ नये एवढा कर्कश्श! अपवाद फक्त त्यासोबत ऐकू येणाऱ्या विविध वाहनांच्या स्टार्टर्सचा. (यापैकी कुठला हॉर्न कोणत्या वाहनाचा आहे हे ओळखण्याचाही प्रयत्न केला पण त्याविषयीचे वर्णन येथे अप्रस्तुत.) प्रत्येक हॉर्नमध्ये एकप्रकारचा उग्र, आक्रमक सूर.काही सेकंद हा आवाज तसाच ऐकू येतो. मग हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाते. आता त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर इतर आवाज ऐकू येतात. गाडीवर सिग्नलवरील मुले मारत असलेल्या थपडा, फळविक्रेत्यांच्या आरोळ्या, शेजारच्या बाईकवर बसलेल्या मुलामुलींचे खिदळणे(केवळ खिदळण्यावरून मी त्यांच्यातील नातेसंबंध नाही सांगू शकणार!). काही अर्धवट वाक्ये...
"साब, दो रुपया साब."
"फक्त तीस रुपये किलो, फक्त..."
" तीन दिनसे कुछ नही खाया साब."
"टपोरी द्राक्षे, ताजी गोड द्राक्षे फक्त..."
मग काही सेकंदात हॉर्न्सच्या आवाजाची पार्श्वभूमी गायब होते. केवळ एखादी मोटारसायकल सुसाट जात असल्याचा आवाज. मग पुन्हा करकचून ब्रेक. पोलिसांची शिट्टी. एखाददुसरा क्षण निरव शांतता. मग पुन्हा हॉर्न्सचा आवाज भवतालावर वरचढ. पुन्हा त्याचे काही सेकंदांनी निवळणे, पुन्हा आधीचीच अर्धवट वाक्ये. त्यात काही नवीन वाक्यांची भर.
" तरी तुला मी सांगत होते,ती ब्ल्यू केप्रीच चांगली होती."
"ए***, अरे डावीकडे वळ ना! उगाच जागा का अडवतोय??"
आरोळ्यामध्येही एकमेकांशी स्पर्धा. वाढत जाणारे आवाज. पुन्हा शिट्टी. मात्र यावेळी क्षणभरही निरव शांतता नाही. आधीच्या हॉर्न्समध्येच उजवीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज मिसळतो. पुन्हा तेच आवर्तन! आता माझ्या आजूबाजूलाही अस्वस्थता वाढलेली. गाड्यांचे स्टार्टर्स मारल्याचे आणि बाईक 'रेज' केल्याचे आवाज. त्यातच आरोळ्याचे,खिदळण्याचे, थपडांचे, भिकेचे आवाज मिसळतात. वेगाने वाढत जातात. गोंगाट!! एका ठरावीक क्षणी केवळ आवाज कानावर पडत राहतात परंतु त्यातून अर्थबोध होत नाही. मेंदूच्या enconding-decoding क्षमतेपलीकडे ध्वनीचा वेग व तीव्रता पोहोचते. बधिरता!!!
मी शांतपणे डोळे उघडतो. गाडीच्या काचा बंद करून घेतो. येणारे आवाज आता खूप दुरून येत असल्यासारखे वाटतात. रेडिओ सुरु करतो. आर.जे. च्या आवाजातील उत्साह ओसंडून वाहणारा! पाठोपाठ एक मंद सुरावट ऐकू येते. सर्वकाही विसरायला लावणारी. बाहेरच्या जगापासून अलिप्त, अधांतरी असल्याचा भास होतो. बरे वाटते. टायमरवर शेवटचे काही सेकंद दिसू लागतात. मी गिअर टाकून सरसावून स्टेअरिंग पकडतो.तयार राहतो. पाच...चार...तीन...दोन...एक...