Wednesday, July 23, 2014

शंभर मी – अप्रिय प्रश्नांची सुबक मांडणी

जन्माला येण्याबाबत आपल्या काही अपेक्षा असू शकतात का?
जोडीदारासंबंधीच्या आपल्या अपेक्षा नक्की कशा पद्धतीच्या आहेत?
आपण तत्वनिष्ठ आहोत का?
आपले भाषेचे आकलन नेमके कितपत आहे?
आपल्याला कसा मृत्यू यावा/नको असे आपल्याला वाटते?
जगण्याविषयीच्या खोलीचा विचार आपण आहे का?

जगण्या-वागण्यातील परस्परविरोध, विसंगती, दांभिकता वगैरे अधोरेखित करण्यास पुरेसे ठरावेत असे हे व यांसारखे काही प्रश्न. त्यामुळे, आयुष्यात या मूलभूत प्रश्नांची दडपणूक सगळ्यांनाच सोयीची असते. पण, श्याम मनोहर यांना आपल्या लेखनातून हे प्रश्न उकरून काढायचेत, (न आवडणारे प्रश्न विचारण्याबद्दल तर मनोहरांच्या लेखनाची ख्यातीच आहे. आठवा – इतकी काय आपण स्वभावाला किंमत देतो?’ – यकृत (बहुतेक), किंवा मला भाषेतील किती शब्द येतात?’ - कळ) ते स्वतःला विचारायला भाग पाडायचेय, त्यावरच्या उत्तरांची शहानिशा करायचीय आणि खोट्या उत्तरांना उघडे पाडून त्यांच्यावर उपरोधिक हसायचेय. मग उत्तरे शोधताना होणारे कन्फ्युजन, स्वतःची उत्तरेच बरोबर ठरवण्यासाठी सामाजिक घडामोडींचा आधार घेत केलेले फसवे समर्थन, सत्य नाकारण्याची धडपड, बेगडी वर्तन हे सर्व ओघाने आलेच. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या नाट्यशाखेने सादर केलेला श्याम मनोहर यांच्या शंभर मी या कादंबरीतील निवडक भागांवर आधारीत याच नावाचा दीर्घांक म्हणजे अशाच काही प्रश्नांचा लेखाजोखा आहे.

शंभर मीहा दीर्घांक म्हणजे कादंबरीतील निवडक उताऱ्यांचे रंगमंचीकरण आहे. प्रत्येक प्रवेश स्वतंत्र असल्याने दीर्घांकाला बांधीव रचना नाही. पात्रांना (अपवाद वगळता) व्यक्तिरेखांचे मुखवटे नाहीत. दीर्घांकाची सुरुवात जन्माला येण्यापूर्वींच्या जीवांना पडलेल्या प्रश्नांच्या प्रवेशातून होते. जीवांना प्रश्न पडण्याच्या फँटसीमधून मी कोणत्या धर्मात, देशात जन्माला येईन, माझे करियर काय असेल, माझी कौंटुबिक पार्श्वभूमी, सामाजिक परिस्थिती काय असेल, याबाबतची रिअॅलिटी मांडण्यात आली आहे. त्यानंतरच्या प्रवेशांमध्ये जोडीदाराविषयी अपेक्षा ठेवताना केवळ बाह्यरूपाचा केलेला विचार, अनुरूप मुलगी शोधताना देशोदेशीचा विचार करूनही संख्यात्मकदृष्ट्या समाधान न होणे, तत्त्व जपणाऱ्या माणसाचे काल्पनिक होत जाणे, समाजाचा कंटाळा येण्याचे प्रसंग, समाज म्हणजे नक्की कोण हा प्रश्न, भाषा अवगत नसल्याने आर्थिक श्रीमंती असूनही भाषेची चैन करण्यात येणाऱ्या मर्यादा, मृत्यूची मीमांसा इत्यादी प्रश्नांचा तिरकस उलगडा होत जातो. दीर्घांकाचा शेवट हा जगण्याविषयीची खोली तपासण्याच्या आवाहनातून होतो. मृत्यूच्या प्रवेशानंतर खोलीच्या प्रवेशाच्या मांडणीतून दीर्घांकाचा शेवट करण्यात दिग्दर्शकाने स्वतःचे स्टेटमेंट केले आहे.
श्याम मनोहरांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य हे स्वयंसिद्ध असते. म्हणजे या वाक्यांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पार्श्वभूमी, संदर्भ वगैरेंची गरज भासत नाही. या वाक्यांमध्ये उपजत नाट्यगुण आहेत. त्याचप्रमाणे ही वाक्ये कोणीही उच्चारू शकेल, इतक्या स्वाभाविक प्रवृत्तीतून जन्माला येतात. दीर्घांकाचा विचार करताना दिग्दर्शकासाठी ही जमेची बाजू आहे. कारण ही वाक्ये जशीच्या तशी रंगमंचावर सादर होऊ शकतात. त्याचे वेगळे नाट्यरूपांतर वगैरे करावे लागत नाही. (किंवहुना तसे ते करता येत नाही.) पण हे शस्त्र दुधारी आहे. त्यामुळे सोबत येणाऱ्या काही मर्यादांचा विचारही दिग्दर्शकाला करावा लागतो. मुख्य म्हणजे ही वाक्ये ही स्वतःच्या विचारातून आली असल्याने त्यांचे संवाद होऊ शकत नाहीत. त्यामुळे रंगमंचावरील पात्रांना ती स्वगताच्या स्वरूपातच सादर करावी लागतात. दुसरे म्हणजे रंगमंचावर वावरणारे प्रत्येक पात्र हे स्वगत बोलणार असल्याने सादरीकरणाच्या शक्यतांना ही चौकट घालून घ्यावी लागते. त्यामुळे दीर्घांकाला विशिष्ट फॉर्म, रूढ चढ-उतार, सुरुवात-मध्य-शेवट मिळत नाही.
दिग्दर्शक रोहित पाटील याने सादरीकरणाचे हे आव्हान बऱ्याचअंशी यशस्वीपणे पेलले आहे. कादंबरीतील विविध उताऱ्यांची निवड करताना सादरीकरणामध्ये विशिष्ट लय साधली जाईल, याचे भान बाळगण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रयोग काही लघुनाट्यांचे एकत्रित सादरीकरण न वाटता दीर्घाकांचा अपेक्षित परिणाम साधण्यात यशस्वी होतो. यासाठी दिग्दर्शकाने काही ठिकाणी रंगमंचीय अवकाशाबरोबरच प्रोजेक्शनचीही मदत घेतली आहे. तथापि, केवळ विविध प्रवेशांची नावे झळकावण्याखेरीज प्रोजेक्शनचा फारसा वापर झालेला दिसत नाही. किंबहुना प्रोजेक्शनच्या पडद्याने रंगमंचाचा बराचसा भाग व्यापल्यामुळे पात्रांच्या काँपोझिशन्सवर मर्यादा येत असल्यासारखे वाटत होते.
अशाप्रकारच्या प्रयोगामध्ये कलाकारांवरील जबाबदारी वाढते. कारण, व्यक्तिरेखेचा ग्राफ, इतर कलाकारांसोबत रंगणारा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ इत्यादींवर अवलंबून राहता येत नाही आणि वाक्ये गोळीबंद असल्याने पंच निसटणार नाही, याची सातत्याने काळजी घ्यावी लागते. सहभागी सर्व कलाकारांनी उर्जा आणि आत्मविश्वासाने ही जबाबदारी सांभाळल्याचे दिसत होते. विशेष उल्लेख करावा लागेल तो शरयू कुलकर्णी, केदार कुलकर्णी आणि नीरजा अग्निहोत्री यांचा. या तिघांच्या वाट्याला आलेले प्रवेश त्यांनी एकहाती निभावून नेले. (जन्म मिळण्यापूर्वीच्या जीवाच्या प्रसंगात अभिनेत्यांनी 'लाउड' न होण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.)
प्रयोगासाठी वापरलेले नेपथ्य प्रतीकात्मक आहे आणि काही ठिकाणी साउंड इफेक्ट्सद्वारे नेपथ्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. दीर्घांकाच्या जातकुळीला हे नेपथ्य पूरक आहे. तीच बाब शीतल पाटील यांच्या वेशभूषेची. अखेरच्या प्रवेशात समोरासमोर येताना खोलीच्या वेशभूषेसाठी काळ्या आणि माणसाच्या वेशभूषेसाठी पांढऱ्या रंगाचा त्यांनी केलेला वापर परिणामकारक आहे. प्रकाशयोजना आणि संगीताच्या पातळीवर मात्र प्रयोग कमकुवत वाटतो. रंगमंचाच्या मागच्या भागातील पात्रांच्या चेहऱ्यापुरताही प्रकाश अपुरा पडत असेल आणि पुढच्या भागातील पात्रांच्या 'आय शॅडो' दिसत असतील, तर त्याबाबत गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. संगीताचा वापरही अधिक कल्पकतेने, वैविध्यपूर्ण आणि ठाशीवपणे करता येईल.
मनोहर यांच्या नाटकांप्रमाणेच त्यांचे अन्य लेखनही रंगकर्मींना वारंवार खुणावत आले आहे. त्यांच्या लेखनातील प्रयोगक्षमतेशी रंगमंचावर खेळून पाहण्याचा प्रयत्न देवल क्लबने यापूर्वी कळ कादंबरीवर आधारीत अंधारात मठ्ठ काळा बैलया दीर्घांकामधून केला होता. शंभर मी हा याच वाटेवरील पुढचा टप्पा ठरू पाहतोय.
(फोटो सौजन्य - केदार कुलकर्णी)

Monday, June 30, 2014

व्हिज्युअल्स

 सूर्य मावळल्यानंतरचा काही काळ भवतालावर दाटून राहिलेला संधिप्रकाश आता हळुहळू विरत चाललाय. कंप्युटर शटडाऊन करताना रंग उडत जाणाऱ्या वॉलपेपरप्रमाणे आकाशाच्या कॅनव्हासने निळ्यावरून राखाडी आणि राखाडीवरून डार्कनेसच्या दिशेने प्रवास सुरू केलाय. ढगांच्या गडद झालेल्या आउटलाइन्स त्या डार्कनेसमध्ये हरवून जाण्याच्या तयारीत....आणि या डार्कनेसच्या बॅकड्रॉपखाली एक शहर आकार घेतंय. संपूर्णतः कृत्रिम प्रकाशांनी उजळून निघतंय...
प्रकाशाचे नानाविध स्रोत, इटेंन्सिटीज. रंगांच्या अगणित शेड्स, टेक्श्चर्स. एखाद्या उंच मनोऱ्यावरून पाहिल्यास म्यूट केलेल्या टी.व्ही.सारख्या दिसणाऱ्या प्रकाशमान मूक हालचाली... आणि त्या हालचालींना नेपथ्य पुरवणारी काही ठिकाणे.
रस्ते. प्रकाशाने गजबजलेले. स्ट्रीटलाइट्सच्या पिवळ्या, हायमास्टच्या पांढऱ्या, सिग्नल्सच्या तिरंगी, कार्सच्या भगभगीत आणि टू-व्हिलर्सच्या शोधक प्रकाशाने. अंधाऱ्या बसस्टॉपवर तिष्ठणारी अनोळखी गर्दी बसमध्ये कोंबल्याकोंबल्या एक्सपोज करणारे दिवे. सामान्य दृष्टीच्या कितीतरी उंचावर लटकावूनही हवे तिथे नेमके लक्ष वेधणारे होर्डिंग्जचे हॅलोजन्स. दुकानांच्या पाट्यांवरील कोपऱ्यातल्या मराठी नावाला दुर्लक्षून विविधरंगी इंग्लिश अक्षरे झळकावणारे निऑन साइन्स. दिवे. टपऱ्यांवरील मिणमिणते, रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवाल्याचे भाजीपुरते आणि रस्त्यावरून हिंडणाऱ्या मोबाइल्सचे चेहेऱ्यापुरते. चौकात एका बाजूला अंग चोरून उभारलेल्या काळ्या पुतळ्यावरील पांढरे डाग अधोरेखित करणारे. फ्लायओव्हरला दिपवणारे. खोक्यातले कपडेही खपवणारे. रस्त्याच्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यातील प्रतिबिंबांमध्ये उमटणारे आभासी.

प्रार्थनास्थळे. दीपोत्कारी. रंगांची रेलचेल. दगडांपासून वैविध्य (किंवा भेदभाव?). शुभ्र संगमरवराचे वर्चस्व. देवळांच्या इंटेरियरमध्ये, मशिदींच्या इंटिरियर व एक्सटिरियरमध्ये. गुरुद्वाऱ्याच्या फ्लोअरिंगपासून तख्तापर्यंत. इटालियन मार्बलच्या कोंदणात ग्रामदैवते. त्याखालोखाल ग्रीन मार्बल. मग ग्रॅनाइट, काळा आणि लाल. त्याशिवाय लाल चिऱ्यांमधले सिनेगॉग. पिवळ्या लाइमस्टोनमधील नाजूक जैन मंदिरे. कभिन्न कातळात घडवलेली देवळे. मशिदीच्या भोवताली वेढलेला हिरवा. चर्चमधून डोकावणारा पिवळसर. अग्यारीचा शुभ्र. भगव्या उपरण्यांच्या काठांचा सोनेरी. ताम्हणांचा तांबूस, अंगाऱ्याचा राखाडी. एकाचवेळी लवणाऱ्या टोप्यांचा सफेद, वेढून टाकणाऱ्या धुपाऱ्यांचा धूरकट. मझारवर पांघरल्या जाणाऱ्या चद्दरींच्या कडांचा गुलाबी. ख्रिस्तासमोरील बाकड्यांचा तपकिरी. मथ्था टेकणाऱ्या पगड्या, दुपट्ट्यांचे नानारंगी. रंग एकरूपतेत मिसळलेले. मिटलेल्या डोळ्यांचे, जोडलेल्या हातांचे, पुटपुटणाऱ्या ओठांचे, आर्जवी स्वरांचे, नतमस्तक भावाचे. दानपेटीत न टाकता वाचवलेल्या नोटा बाहेरील भिकाऱ्यांच्या वाडग्यात ठेवणाऱ्या दानतीचे.
बदनाम गल्ल्यांतला रंगेबिरंगी शूकऽऽशूऽऽकाट. दिखता है वो बिकता हैच्या सूत्रावर आधारलेला रंगांचा बाजार. भडक ब्लाउज. मोठ्ठाल्या डिझाइन्सच्या साड्या. चेहेऱ्यावरचे डोळे आणि ओठ हे एलिमेंट मेक-अपनी हायलाइट केलेले. डल बॅकग्राउंड्स. मोडकळीस आलेल्या सायकली. भेसूर खोल्या. अंधाराची आस असणारा अपुरा, अपराधी प्रकाश. मळकट, मेणचट चादरी, अभ्रे. पोपडे उडालेल्या बेरंग भिंतींवर पानांच्या पिचकाऱ्यांचे सुकलेले शिंतोडे. रंग हरवलेले. सामुहिक हशांमधून, रोखठोक व्यवहारांमधून. तुटक संवादांमधून. रस्त्यांवर भेलकांडणाऱ्या अर्धवट पिकलेल्या दाढीच्या खुंटांमधून. एकमेव खुंटीला टांगलेल्या सर्व कपड्यांमधून. तांबरलेल्या खिडक्यांच्या गजांमधून. गिऱ्हाइक बसल्यावर उपड्या केल्या जाणाऱ्या देवांच्या फोटोंमधून. हासडल्या जाणाऱ्या शिव्यांमधून. दिल्या-घेतल्या जाणाऱ्या पैशांमधून. वाहणाऱ्या गटारांमधून, माड्यांवर कधीही किणकिणत फिरणाऱ्या चहाच्या ट्रेंमधून, प्रत्यक्ष क्रियेवेळीही टक्क उघड्या असणाऱ्या डोळ्यांमधून आणि बंद दारांच्या माथ्यावर कुंकवाप्रमाणे ठळकणाऱ्या लाल दिव्यांमधूनही!
पॉश मॉटेल्समधील चकचकीत स्टुडिओ सूट. हव्या त्या मालासाठी बुकींग आवश्यक. एस्कॉर्ट्स या उच्चभ्रू उपाधीला शोभेलसा डामडौल. जगभरातील वंश उपलब्ध. रंग चढवलेले. पोर्शमध्ये फवारणाऱ्या कारंजांवर. एस्केलेटर्स आणि पारदर्शक कॅप्सूल लिफ्ट्सवर. लॉबीतून पास होताना बघूनही न बघितल्यासारखे करणाऱ्या नजरांवर. इलेक्ट्रो-मॅग्नेटिक कार्ड इन्सर्ट केल्यानंतर उघडणाऱ्या दरवाजांवर. ग्लेझिंग बॅकलेस कॉर्सेटला मॅचिंग स्टिलेटोजवर. पर्समधून सतत काढल्या जाणाऱ्या मेक-अप किटवर. प्रयत्नपूर्वक उच्चारल्या जाणाऱ्या परदेशी अँक्सेंटच्या इंग्लिशवर. बर्फाने भरलेल्या बादलीत लपलेल्या शँपेनच्या बाटल्यांवर. स्वाइप केल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड्सवर. रिमोटने इंटेन्सिटी कंट्रोल करता येणाऱ्या सूदींग लाइट्सवर. बिछाना अपुरा पडेल इतक्या विविध आकाराच्या कुशन्सवर. शुभ्र टर्कीश बाथरोबवर. एसीच्या थंडगार हवेवर. वेळेचे बंधन नसल्याने सैलावलेल्या वातावरणावर आणि अख्ख्या काचेच्या भिंतीआडून दिसणाऱ्या चमचमत्या शहरावर.
उत्साहाला उधाण आलेल्या इमारती. डिस्कोथेक्स, मॉल्स, पब्ज, रेस्तराँ, लाउंजेस्. मॉल्सच्या बिलिंग काउंटरजवळ लागलेल्या रांगा. मूव्हेबल ट्रेमध्ये जागा पटकावण्यासाठी धडपडणाऱ्या एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या वस्तू. ऑफर्सची पॅम्प्लेट्स. बिलांच्या सुरनळ्या. माणसांना कॉम्प्लेक्स देणारे शोरुमबाहेरील स्टॅच्यू.

पब्जच्या एंट्री पॉइंटवर मनगटावर उमटवण्यात येणारे शिक्के. दोन विश्व वेगळी करणारे साउंडप्रुफ दरवाजे. काळ्या कपड्यातील निर्विकार बाउन्सर्स, थ्री-पिसमधील अदबशीर बार बॉइज. उलटे टांगलेले आरस्पानी ग्लास. उंच पायांच्या खुर्च्या. मॉकटेल्सवरची रंगेबिरंगी छत्री. लिंबाच्या चकत्या. कुठल्यातरी स्प्रेने ओतली जाणारी स्पिरिट्स. फेसाचा बुडबुडाही न येऊ देता शिताफीने ग्लासमध्ये उतरणारी बियर. पाय ठेवताच उजळणाऱ्या डान्स फ्लोअर्सच्या टाइल्स. क्षणात अंगावरून पास ऑन होणारे लेझर लाइट्स. अंधारात चमकणाऱ्या टी-शर्टच्या रेडियम प्रिंट्स. सी-थ्रू टॉप्समधून डोकावणाऱ्या स्ट्रिप्स. बिट्सवर एकाचवेळी उंचावणारे हात. न जमणाऱ्या स्टेप्स. अनावधानाने (?) घासणारी अनोळखी शरीरे. बेभान. बेफाम.
मेणबत्त्यांना शरण आंदोलने. फलकावर लिहिलेली मोठ्या आकारातील आक्रमक अक्षरे.  एकमेकांचे हात धरून तयार केलेल्या साखळ्या. बॅरेकेड्सना आव्हान देणारे डोळे. रोजचेच झालंय म्हणून दुर्लक्ष करणारे कोपऱ्यात उभे गणवेश. साचेबद्ध आयुष्य सुबक चौकटीत बंद करून टाकणाऱ्या रेसिडेन्सिशियल अपार्टमेंट्स. दिवसभर आयुष्याला बांधलेले घड्याळ रात्रीही उतरवू न देणाऱ्या प्लाझ्मा टीव्हीच्या फ्लॅट स्क्रीन्स. फ्रिज व मायक्रोव्हेव हे दोनच लाइट्स ओळखणारे कसलेकी फ्रेंडली कूकवेअर. लहानमोठ्या खिडक्यांमधून चाललेली दिव्यांची सिंक्रोनाइज्ड उघडझाप. गॅलऱ्यांच्या कठड्यांवर वाळणाऱ्या कपड्यांसोबत वाफाळणारे कॉफीचे मग. बंद दाराच्या चौकटीवरील नाद विसरलेले विंडचाइम.
आकृत्या. परतीच्या रुळांच्या सळसळत जाणाऱ्या लोखंडी समांतर रेषा. घाई झालेल्या वाहनांच्या हेडलाइट्स, टेललाइट्सचे एकमेकांना छेदणारे लाल-पिवळे प्रकाशकिरण. अंधाराला चिरत जमिनीकडून आकाशाकडे झेपावणारे मेगा इव्हेंट्सचे दंडगोलाकृती बीमलाइट्स. पानांच्या ठेल्यांवरील लख्ख पितळी गोलाकार. झेब्रा क्रॉसिंगवर पडलेले नो मार्केटिंग जॉब्सच्या पत्रकांचे चौकोन. चण्या-फुटाण्याच्या सायकलींबरोबर घरी निघालेले कागदी शंकू. न खपलेल्या फुलांवरील चकमकीचे उतरत चाललेले चंदेरी बिंदू.
.
.
.
.
.
...मध्यरात्रीचा प्रवास आता उत्तररात्रीकडे सुरू झालाय. काही कॉर्पोरेट ऑफिसेसमधील डेस्कच्या जळत्या दिव्यांखाली अजूनही काम करणारी मने विझताहेत. कुठल्याशा हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर्सचे लाइट्स प्राणज्योतीसाठी झटताहेत. स्ट्रीटलाइटच्या आधाराने फुटपाथवर झोकांडत्या सावल्या. काही पोलिसांच्या गाडीवरील दिव्यापासून लपण्याइतक्या शुद्धीत, तर काही भरधाव गाड्यांखाली येण्याइतकेही भान न उरलेल्या बेफिकिर.
डिस्कोथेक्सच्या पार्किंगमधील कार्सच्या दिव्यांना बऱ्याच काळानंतर जाग येतेय. चौकातल्या टर्नवर फुटपाथवरील झोप हरवल्याने तारवटलेले डोळे क्षणभर उजळवून पुन्हा अंधारात ढकलले जाताहेत....
रस्त्याच्या खडबडीत टेक्श्चरवर आंदोलनाचे मऊसूद मेण वितळलेय...
नाट्यवर्तुळाच्या गरमागरम चर्चा आटोपून कट्टे नुकतेच थंडावलेत...
सिग्नलच्या शोधात उंचावलेल्या लुकलुकत्या मोबाइल टॉवर्सची चांदण्याशी स्पर्धा सुरू आहे...
संध्याकाळपासून बाहेर पडलेल्या प्रकाशाचा आता शहरावरील आसमंतामध्ये एक तवंग तयार झालाय...

तमाम प्रार्थनास्थळांच्या श्रद्धा विश्रांती घेत असताना कुठल्याशा खोपटातील एकलेसे निरांजन उद्याच्या सूर्योदयाचे तेजस्वी अंकुर निपजत तेवत राहिल्येय... अपूर्णत्वाचे पूर्णाकार शोधत... व्रतस्थ मंद ज्योतीने... तेवत राहिल्येय...