Wednesday, July 15, 2020

हमारे बाद महफिल में….

‘चांद पर कदम रखनेवाला पहला इन्सान कौन था?’, भरलेल्या वर्गात वीरू सहस्रबुद्धे प्रश्न विचारतात.
‘नील आर्मस्ट्राँग, सर!’, वर्ग एकसुरात उत्तरतो. 
‘येस, नील आर्मस्ट्राँग. वी ऑल नो इट. मगर दुसरा कौन था?’
आता वर्ग क्षणभर शांत होतो. ही शांतता भेदत सहस्रबुद्धे आपलं तत्त्वज्ञान ऐकवतात.
डोंट वेस्ट युअर टाइम. इट्स नॉट इम्पॉर्टंट. नोबडी रिमेंबर्स अ मॅन व्हू एव्हर केम सेकंड!

थ्री इडियट्सच्या या सीनमधला प्रश्न बदलून जर ‘भारताला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिला कर्णधार कोण?’ असे विचारले, तर कपिल देव हे उत्तर प्रत्येकालाच आठवेल. पण ‘दुसरा कर्णधार कोण?’चे उत्तर जर महेंद्रसिंह धोनी असे आले, तर ते चूक आहे. कारण, महेंद्रसिंह धोनीने २००७ मध्ये टी-२० चा वर्ल्ड कप उंचावण्याच्या सात वर्षे आधीच महंमद कैफने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये ही किमया साध्य करून दाखवली होती. खरेतर, कैफच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच अंडर-१९ चे विश्वविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. परंतु, १३ जुलै, २००२ ला कैफने जे करून दाखवले, त्यासमोर त्याची आधीची आणि नंतरची सगळीच कारकीर्द पुसली गेली. आपल्याच एका यशामुळे स्वत:च्या अन्य कामगिरीवर नकळत झालेला असा अन्याय क्वचितच कोणाला सहन करावा लागला असेल.
महंमद कैफने अजूनही वयाची चाळिशी ओलांडली नाहीय. पण, तरीही भारताकडून त्याने शेवटचा सामना खेळण्याला तब्बल चौदा वर्षे उलटून गेलीयत. २०१७ मध्ये, अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर ११ वर्षांनी कैफने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. म्हणजेच, कैफ ऐन २६ व्या वर्षी भारतीय संघाबाहेर गेला आणि परत कधीच आला नाही. हे खरंच घडलंय? आणि यावर कधीच चर्चा नाही झाली? कैफ खरंच एवढा सामान्य खेळाडू होता का? आणि जर होता, तर इतक्या काळानंतरही आठवणीत कसा आहे? (वैयक्तिक नाही, तर सामुहिक आठवणीत. मागच्या वर्षी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यू-ट्यूब शोमधील कैफच्या मुलाखतीला मिळालेले १७ लाख हिट्स, याचे निदर्शक आहे.)
मग आता सांगा, की जेमतेम चार-पाच वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, मोजकीच शतके/अर्धशतके (२/१७), संस्मरणीय खेळ्या, एकहाती सामना जिंकून दिल्याचे प्रसंगही थोडेच, कर्णधार/उपकर्णधार किंवा तत्सम कोणत्याही पॉवर पोझिशनपासून कोसो दूर, एखाद्याच वर्ल्ड कपमध्ये सहभाग असलेले, असे किती खेळाडू आपल्याला पंधरा वर्षांनंतरही लक्षात आहेत? आणि नुसते लक्षात नाहीत, तर आपल्याला त्यांच्या आठवणीत रमायला आवडते? मग या यादीत जर आघाडीच्या आणि अनडिस्प्युटेबल नावांपैकी एक महंमद कैफचे असेल, तर कोई तो बात होगी बंदे मे?
महंमद कैफ आवडत नाही, असे सांगणारा माणूस मला अजून भेटायचाय (खरंच असा कोणी भेटला, तर तो माणूस कितपत आवडेल, हा प्रश्नच आहे.) आणि हे काही फक्त त्याच्या नॅटवेस्ट फायनलमधल्या कामगिरीपुरतं मर्यादित नाहीय. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार करता कैफ एक बऱ्यापैकी फलंदाज होता, अफलातून क्षेत्ररक्षक होता, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संघभावनेने (टीम स्पिरीट) नखशिखान्त पुरेपूर भरलेला होता. मैदानावरचा त्याचा उत्साहाने सळसळणारा चैतन्यपूर्ण वावर, दुसऱ्याचा रनर म्हणून खेळपट्टीवर येतानाही फलंदाजीसाठीच येत असल्यासारखा पवित्रा, स्लेजिंग, वाद आदी नकारात्मक गोष्टींना कुठेही थारा नसणारी क्रिकेटचा निखळ आनंद घेण्याची उर्जा, सतत ‘चिअरिंग मोड’मध्ये राहण्याची वृत्ती हे सगळं इतकं जिवंत, ताजं आणि विलोभनीय होतं की कैफबद्दल अनेकांच्या मनात चिरंतन आपुलकीने घर केलंय.
सा कैफचा भारतीय संघातील प्रवेशही मागच्या दारानेच झाला होता. युवा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला कसोटी संघामध्ये स्थान मिळाले होते खरे, पण एकाच कसोटीनंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर, २००३ च्या वर्ल्ड कपसाठी वर्षभर आधीपासून सौरव गांगुली आणि जॉन राइट यांची संघबांधणीची तयारी सुरू झाली आणि त्यामध्ये राहुल द्रविडकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी आली. परिणामी, एका फलंदाजाची जागा रिकामी झाली आणि कैफचा वन-डे संघात चंचुप्रवेश झाला, हे स्वतः त्यानेच सांगितलंय. कैफच्या आधी आणि कैफनंतरही भारतीय संघामध्ये सातव्या क्रमांकासाठी कधीच स्पॅशालिस्ट फलंदाजाचा विचार झाला नाही. परंतु, १३ जुलै, २००२ रोजी नॅटवेस्टच्या अंतिम सामन्यातील कैफच्या त्या ७५ चेंडूंमधील नाबाद ८७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाबाबत जे अनेक नवे मापदंड निर्माण झाले, त्यापैकी कैफचे संघातील अढळ स्थान हासुद्धा एक होता.
यानंतरची काही वर्षे कैफ भारतीय संघात अक्षरशः बागडला. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस येण्याची लवचिकता, स्लॉग ओव्हर्समध्ये फटकेबाजी आणि निर्णायक क्षणी मोठी खेळी करण्याची क्षमता, वेगवान रनिंग बिटवीन दि विकेट्स, चपळतेला मूर्तिमंत करणारे क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो, युवराजच्या साथीने त्याने ऑफ-साइडला तयार केलेली तटबंदी, यांआधारे त्याने फिल्डर-ऑलराउंडरचे मिळवलेले बिरूद, १०० टक्के योगदान देण्याचा निग्रह या सगळ्याचा अमीट ठसा अनेकांच्या नॉस्टॅल्जियावर आहे. बिचाऱ्या हेमांग बदानीला आजही लोक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात याच्या डोक्यावरून उडी मारून कैफने शोएब मलिकचा अचाट झेल घेतला होता, म्हणून ओळखतात. आता बोला!

महेंद्रसिंह धोनी संघात आल्यानंतर भारताला नियमित यष्टिरक्षक मिळाल्याने फलंदाजाचा एक स्पॉटही कमी झाला. कैफ भारतीय संघात आला, तेव्हा तो इतका काळ टिकेल, याची जशी कोणी कल्पना केली नव्हती, तसे २००६ मध्ये त्याला वगळण्यात आले, तेव्हा तो आता परत कधीच इंडियन जर्सीत दिसणार नाही, असेही कोणाला वाटले नव्हते. संघातील प्रवेशाप्रमाणे कैफची एक्झिटही वैशिष्टपूर्ण होती. कैफने कधीही संघात आत-बाहेर केलेले नाही. २००२ ते २००६ या सलग पाच वर्षांत तो अनुक्रमे ३२, २७, २२, २२, २२ सामने खेळलाय आणि त्यानंतर एकही नाही. अगदी दिनेश मोंगियालाही २००७ मध्ये एकदा संधी मिळाली, पण कैफसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले, ते कायमचेच.
भारताने टी-२०चे विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर वन-डे संघाचे नेतृत्वही धोनीकडे आले. संघाने पुन्हा एकदा कूस बदलली. या संघाची यंग ब्रिगेड वेगळी होती. त्याचा फटका सीनियर्सबरोबरच मिड-लेव्हलच्या खेळाडूंनाही बसला. गांगुली, कुंबळे निवृत्त झाले होते. धोनीच्या तरुण रक्ताबाबतच्या (presumably आपल्यापेक्षा ज्युनियर खेळाडूंसाठीच्या) अतिआग्रहामुळे साक्षात द्रविडलाच वन-डे संघातील स्थान गमवावे लागले, तिथे कैफची काय कैफियत? या सर्व काळात कैफ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. रणजी क्रिकेटच्या ८६ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशने मिळवलेले एकमेव विजेतेपद हे २००६ मध्ये कैफच्या नेतृत्वाखाली मिळवले आहे. त्यानंतर, २००८ आणि २००९ या लागोपाठ दोन वर्षी उत्तर प्रदेशने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि या कामगिरीचीही पुनरावृत्ती उत्तर प्रदेशला तेव्हापासून आजपर्यंत करता आलेली नाही. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या लिलावात कैफ हा राजस्थान रॉयल्सचा सर्वांत महागडा खेळाडू होता. असे असतानाही कैफने एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. टी-२० क्रिकेटसारख्या त्याच्यातील अॅथलेटिसिझमला मुबलक वाव देणाऱ्या प्रकारासाठी कैफचा कधीच विचार का झाला नसेल? रॉबिन उथप्पापासून ते दिनेश कार्तिकपर्यंत अनेकांना पुनःपुन्हा संधी देणाऱ्या निवड समितीला एकदाही कैफवर विश्वास टाकावासा का वाटला नसेल? आज विचार करताना जाणवतं, की कैफ अपयशी नव्हता, सुमार तर अजिबातच नव्हता, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. राँग टाइम,  अॅट दि राँग प्लेस.
भारतात क्रिकेटसोबत येणारी फ्रिंज बिनिफिट्स कैफला कधीही मिळालेली नाहीत. तो ब्रँड अॅबेसिडर असलेले एकही उत्पादन स्मरणात नाही. त्याची एकट्याची ना कधी कुठली जाहिरात होती, ना तो कधी रिअॅलिटी शोमध्ये दिसला. आणि तरीही तो कडवट बनलेला नाही. त्याच्याकडून कधीही ‘माझ्यावर अन्याय झाला’, ‘मी ग्रुपिझमचा बळी ठरलो’ इत्यादी विधाने आली नाहीत. स्वतः कैफ वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत, २००० साली माझी संघात निवड करण्यात आली, तेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नव्हतो, असं प्रांजळपणे कबूल करतो. आपल्या कामगिरीची आठवण ठेवणाऱ्या क्रिकेटप्रेमींना तुमची स्मृती चांगली असल्याचे सांगतो. अगदी ग्रेग चॅपेलवर बोलणेही हा माणूस टाळत असेल, तर त्याची नम्रता आणखी काय वर्णावी?
कैफच्या संघाबाहेर जाण्याला एक व्यक्तिगत दुखरी किनारही आहे. कैफचा भारतीय संघातील प्रवास आणि आमचे कोल्हापुरातील कॉलेज जीवन समांतर होते. कैफने लॉर्ड्सवर मर्दुमकी गाजवली, तेव्हा आम्ही अकरावीत प्रवेश घेऊन अवघे तेरा दिवस लोटले होते. पुढची चार-पाच वर्षे अगाध रिकामटेकडेपणाची होती. डे-नाइट मॅचसाठी घरी अड्डे जमवून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चेसाठी घोळके करण्याइतपत वेळ आमचा गुलाम होता. अगदी झिम्बाब्वे, केनिया संघांतील खेळाडूही कामगिरीसकट तोंडपाठ होते, तर भारतीय खेळाडूंबाबत तर विचारायलाच नको. आणि तत्कालीन भारतीय संघाने आपल्या कामगिरीने आमच्या या रिकामटेकडेपणाला चार चाँद लावले. आज सचिन, द्रविड, गांगुलीपासून ते अगदी लक्ष्मीपती बालाजीच्या नावानेही तमाम ९०‘ज कीड्स हळवी होतात, त्याचे एक कारण यातही दडलेले आहे. त्या वर्षांतील आमचे अनुभवविश्व समृद्ध करण्यात, आठवणी लख्ख सोनेरी ठेवण्यात त्या काळातील भारतीय संघाचा महत्त्वाचा वाटा आहे आणि कैफ हा त्या संघाचा अविभाज्य घटक होता. 
२००७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताची नासधूस झाली, तेव्हा आम्ही फायनल इयरची परीक्षा देत होतो. त्यानंतरच्या काही महिन्यांतच कोल्हापूर सुटले. सोबत अड्डे सुटले, रिकामा वेळ सुटला. त्या पुढची दोन-चार वर्षे क्रिकेट जाताजाता, मिळेल तसे, मिळेल तिथे, मिळेल तेवढे बघण्यात गेली. (अगदी २०११ चा संपूर्ण वर्ल्ड कपही मी डेस्कवर बातम्या करत करत बघितलाय.) आयुष्य जरा स्थिरस्थावर होऊन पुन्हा अड्डे जमवण्याचे मनसुबे आखतो, तर तोपर्यंत क्रिकेटचा, भारतीय संघाचा चेहरामोहराच बदलून गेला होता. काही खेळाडू नजरेआड झाले, काही ओळखीचे चेहरे अनोळखी भासू लागले. धोनीने हेलिकॉप्टर शॉट सोडून जबाबदार कर्णधाराचा मुखवटा चढवला. सेहवाग, गंभीर, युवराज, झहीर, हरभजन यांचे महत्त्व कधीही नव्हते, इतके कमी झाले. हा संघ कॉम्पिटेटिव्ह होता, प्रोफेशनली खेळत होता, जिंकतही होता, पण त्याच्या यांत्रिकीकरणाने आमचा कनेक्ट हिरावून घेतला. ‘You can’t deliver results, thinking emotionally!’ हे वाक्य नव्या भारतीय संघाने इतक्या क्रूरपणे शिकवलं, की आम्ही क्रिकेटसोबतच्या रोमँटिसिझमला पारखे झालो. कैफचा मैदानावरील सदाहसतमुख निरागस चेहरा हे आमच्या त्या हरवलेल्या रोमँटिसिझमचे प्रतीक आहे.  
कैफ हा आपला तो मित्र आहे, जो लहानपणी आपण खेळायला बोलावल्यावर कधीही अभ्यासाचे किंवा आई-बाबा सोडत नसल्याचे कारण सांगत नाही. जो परीक्षेच्या वेळी स्वत:ची पर्वा न करता आपल्याला एक्स्ट्रा पेन देऊन मोकळा होतो. कॉलेजच्या ग्रुपमध्ये ठरणाऱ्या कुठल्याही प्लॅनसाठी त्याची कधीच ना नसते. त्याच्याकडे कधीही आपणहून काँट्रिब्युशन मागण्याची वेळ येत नाही. अशाने आपल्याला मात्र त्याच्या submissiveness ला गृहित धरण्याची सवय लागते आणि त्याची त्याबद्दल कधी साधी तक्रारही नसते. कालांतराने प्रत्येकजण आपापल्या करियर, आयुष्यात गुंतल्यानंतर ग्रुप विखुरण्यासाठी कितीसा वेळ लागतो? मग कधीतरी वीकेंड्सच्या पार्ट्यांपुरचे भेटणे होते. अशावेळीही हा मित्र आपल्या प्रेफर्न्स लीस्टमध्ये मागे पडत जातो. काही काळाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याइतके आणि स्टेटस लाइक करण्याइतकेच संबंध उरतात.
पुढे असेच एकदा आपण नव्या ग्रुपसोबत रेस्टॉरंट किंवा लाउंजमध्ये गेलो असता, योगायोगाने हा एकटाच एका टेबलावर बसलेला दिसतो. नजरानजर झाल्यावर जुन्याच मित्रत्वाने येऊन भेटतो, आत्मीयतेने बोलतो. आपले इतक्या वर्षांचे दुर्लक्ष त्याच्या गावीही नसते. आपण नव्या ग्रुपमध्ये रमलो असताना कधीतरी स्वतःचे बिल देऊन निघूनही जातो. घरी आल्यावर आपल्याला मात्र त्याचे तसे एकटे बसणे अस्वस्थ करत राहाते. आपण कधीच याला साधा मेसेज का केला नसेल, आपणहून भेटलो का नसू, याचा गिल्ट आपली पाठ सोडत नाही आणि भेटून मजा आली, पुन्हा भेटू. गुड नाइट!’ हा त्याचा मेसेज आपल्या इनबॉक्समध्ये खिजवत राहतो...

कोल्हापुरातील एका प्रसिद्ध चहाच्या हॉटेलमध्ये पूर्वी सदैव जुनी सुश्राव्य गाणी वाजत असायची. या हॉटेलच्या काउंटरमागे आजही संगीतकार मदन मोहन यांची फोटो फ्रेम असून त्याखाली पंक्ती आहेत, 

‘हमारे बाद महफिल मे अफसाने बयाँ होंगे,
बहारें हमें ढूंढेंगी, न जाने हम कहां होंगे!

…भविष्यात मी जर कधी चहाचे दुकान टाकले,  तर तिथे एका स्क्रीनवर सदैव जुन्या सामन्यांचे प्रक्षेपण सुरू असेल आणि हा शेर फक्त आणि फक्त कैफच्या फोटो फ्रेमसाठी राखीव असेल!

(छायाचित्र सौजन्य - वृत्तसंस्था)

Wednesday, February 19, 2020

‘इम्तियाझ’ आज कल…


कोलकात्यामध्ये हरलीनच्या घरासमोरील बाकड्यावर ऐटीत बसून खास तिने करून आणलेलाब्लॅक टीचवीने पिणारा वीर आठवतोय? सॅनफ्रान्सिस्कोच्या फुटपाथवर गुंडांकडून मार खाल्यानंतर आपलं खरं मीरावर प्रेम असल्याची जाणीव होऊन एकटाच हसत-रडत सुटणारा जय? किंवा जयने अखेरीस प्रपोज केल्यावर इतके दिवस आत दाबून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारी मीरा? इम्तियाझच्या मनावर कोरल्या गेलेल्या फ्रेम्सपैकी या काही...
31 जुलै, 2009 च्या दिवशी तास बुडवून, सात-आठ जणांना गोळा करून पावसाच्या रिपरिपीमध्ये चिखल-खड्ड्यांतून वाट काढत आणि अॅडव्हान्स बुकिंगसाठी एक तास आधी जाऊन तसाच भिजलेल्या रेनकोटमध्ये राहुल टॉकिजला लव्ह आज कल’चा फर्स्ट डे मॅटेनी शो पाहिला होता, तोपर्यंत इम्तियाझ अली स्टाइल ऑफ फिल्ममेकिंग हा ब्रँड म्हणून प्रस्थापित व्हायचा होता. त्याने त्याआधी फक्त दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि दोन्ही लव्हस्टोरीज् एकमेकांपेक्षा खूप भिन्न असूनही आपला असा फॅनबेस तयार करण्यात हे चित्रपट यशस्वी झाले होते. त्यातला जब वी मेटतर व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरल्यामुळे इम्तियाझ ए-लिस्टर्स’मध्ये पोहोचला होता. अर्थातच त्या लव्ह आज कलवर जब वी मेटच्या अपेक्षांचे ओझे होते आणि इम्तियाझने ते यशस्वीरीत्या हाताळले होते. चित्रपट पाहिल्यानंतर जब वी मेटच्या तुलनेत लव्ह आज कल’ला डावा ठरवणाऱ्यांनाही नेमक्या टिकेवर बोट ठेवता आले नव्हते. चित्रपट थक्क किंवा प्रभावित करणारा नसला, तरी आवडूनसा गेला होता.
त्यानंतर, इम्तियाझ चकित करत गेला. सरप्रायझेस देत गेला, प्रत्येक चित्रपटातून स्वतःची स्टाइल अधोरेखित करत गेला आणि त्याचवेळी नवनवे प्रयोग करून त्यांना आपल्या स्टाइलमध्ये सामावून घेत गेला. (त्याचा जब हॅरी मेट सेजलमी पाहिला नसल्यामुळे हे निरीक्षण  बाकीच्या सहा चित्रपटांपुरते आहे.)
कट टू 14 फेब्रुवारी, 2020. इम्तियाझ आता स्थिरावला आहे. अगदी जब हॅरी मेट सेजलचे दारुण अपयशही त्याला हादरवू शकणार नाही, इतका. त्याचप्रमाणे, इतक्या चित्रपटांनंतर त्याच्या सरप्रायझेसचा आवाका नक्की कुठपर्यंत असू शकतो, याची बऱ्यापैकी कल्पना येऊ लागली आहे. आणखी एक गंमतशीर गोष्ट म्हणजे, इतक्या वर्षांत त्याने मोडलेल्या चौकटींचाही आता एक साचा तयार झाला आहे. त्याच्या चित्रपटातल्यासारखी वास्तविकता आणि कल्पना (रिअॅलिझम आणि फँटसी) यांच्या सीमारेषेवर उभी असणारी पात्रे, वरवरची खपली काढल्यानंतर उघडे पडणारे त्यांचे गोंधळ, इनसिक्युरिटीज्, आयडेंटिटी क्रायसिस इत्यादी सॉर्ट आउट होईपर्यंतचा प्रवास आदी एकेकाळची अपारंपरिक (unconventional) लक्षणे आता इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधूनही सर्वपरिचित झाली आहेत. त्यामुळे एकाच वेळी इम्तियाझचा ट्रेडमार्क असलेलं सगळं तो त्याच्या चित्रपटात करतो का, आणि त्यापेक्षा वेगळं काही करू बघतो का, या दोन टोकांवर इम्तियाझच्या फॅनबेसचा लंबक झुलत असतो.
नव्या लव्ह आज कलबद्दल बोलायचं झाल्यास, यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचअंशी सकारात्मक आहे. किंबहुना, इम्तियाझच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील प्रत्येकाची काही ना काही झलक या लव्ह आज कलमध्ये पाहायला मिळते. ये दूरियाँकिंवा जिंदगीसारखे चित्रपटाचा टोन सेट करणारे गाणे आहे, ‘तुमसे ही गाण्यात आदित्य काल्पनिक गीतसोबत पावसात बेभान होऊन नाचतो, तसे नृत्य आहे, ‘तमाशातील वेदप्रमाणे आपल्या उपजत व्यक्तिमत्त्वाला दाबले जाणे आहे आणि उत्कट क्षणी त्याचे विस्फोटकरीत्या बाहेर येणे आहे, रॉकस्टारच्या जनार्दनचा आत्मनाशापासून आत्मशोधापर्यंतची (Self distruction to self-discovery) वाटचाल आहे, इम्तियाझचा आवडता हिमालय आहे आणि त्याच्या सानिध्यात हायवेतल्या वीराला मिळणारी शांतताही आहे. सोबतीला रूमी आहे, इर्शाद कामीलचे गहिरे शब्द आहेत, प्रितम क्वचितच देतो, तसे ठेवणीतले संगीत आहे, अरिजितचा सोलफुल की काय म्हणतात, तसा आवाज आहे, इम्तियाझची स्वत:ची अशी दृश्यात्मकता आहे आणि तरीही

हे सर्व साकारण्यासाठी इम्तियाझने निवडलेला प्लॉट आणि फॉर्म हे दोन्ही भलतेच सरधोपट असल्याने एकूण परिणाम उणावतो. दोन काळांना एकत्र आणणारे सामायिक नेपथ्य म्हणून इम्तियाझ पुन्हा एकदा कॅफे-रेस्टॉरंट निवडतो, इथपर्यंत ठीक; पण तेथे घडणारे संवाद आणि उलगडणारे प्रसंग पाहता आधीच्या लव्ह आज-कलचा प्रभाव म्हणावा की कॉपी-पेस्टअसा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. यावेळी बदल म्हणून लव्ह आज कलपैकी आजच्या कथानकाची प्रोटॅगनिस्ट ही नायिका आहे आणि नायक तिचा लव्ह इंटरेस्टआहे. त्याचवेळी कलची कथा मात्र नायकाच्या नजरेतून उलगडते. हे दोन्ही पात्रांचे भार यशस्वीपणे पेलण्यात लेखन पातळीवर इम्तियाझ आणि अभिनय पातळीवर अनुक्रमे सारा अली खान (झोई) आणि रणदीप हुडा (रघू) कमी पडले आहेत. साराचा संपूर्ण चित्रपटभर वावर आत्मविश्वासपूर्ण असला, तरी आवाजाच्या एकसुरी प्रोजेक्शनमुळे तिच्या मर्यादा उघड होतात. याउलट रणदीपसारख्या ताकदीच्या अभिनेत्याला संहितेनेच जखडून ठेवल्यामुळे तो निवेदकाच्या स्तरावर येऊन थांबतो आणि ऋषी कपूर यांनी वीर सिंग पानेसरच्या व्यक्तिरेखेला दिलेल्या चार्मच्या जवळपासही पोहोचू शकत नाही.
वीर (कार्तिक आर्यन) हे नव्या लव्ह आज कलमधील सर्वांत कॉम्प्लेक्स पात्र आहे. त्याच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे आहेतच, पण त्याचबरोबर त्याची प्रेमकथेतील भूमिका (म्हणजे त्याने घेतलेली) ही तमाशातील ताराच्या भूमिकेला साजेशी आणि अधिक व्यापक आहे. याच गुंतागुंतीमुळे या लव्ह स्टोरीला वेगळे डायनॅमिक्स प्राप्त होते. तथापि, हे पात्र इम्तियाझ बहुतांश वेळा झोई किंवा रघूच्या नजरेतून दाखवतो आणि त्याचवेळी झोईच्या पात्राला कधीच स्वत:बाहेर पडू न दिल्यामुळे वीर व तिच्यामधील कॉन्फ्लिक्ट गडद करण्याची संधी गमावतो. तीच गोष्ट १९९० च्या रघू आणि लीना (आरुषी शर्मा) या जोडीची. तुटक-तुटक प्रसंग जोडून एकत्र बांधलेली ही विसविशित कथा ना एकाही क्षणी रिलेटेबल होते, ना धड नॉस्टॅल्जिया आळवते, ना आजच्या काळाशी समरूपता दर्शवते. कार्तिकचा अभिनय वीरच्या भूमिकेत आणि टीनएजर रघूच्या भूमिकेत प्रभावी आहे. वीरवरची पकड तो शेवटपर्यंत कायम ठेवतो, मात्र रघूचा कालानुक्रम दाखवण्यासाठी देण्यात आलेल्या प्रत्येक नव्या गेट-अपगणिक त्याची कामगिरी खालावते. आरुषी शर्मा चित्रपटात फक्त आहे.

आता दुसरा प्रश्न मग, इम्तियाझ वेगळं नक्की काही करतो तरी का? याचे उत्तर मात्र नकारार्थी द्यावे लागते. खरेतर बिलिव्हेबल व्यक्तिरेखा निर्माण करणे आणि त्यांना रिलेटेबल संवाद देणे हे इम्तियाझचे बलस्थान. मै अपनी फेव्हरिट हूँ!,’ हे गीतचे वाक्य आजही कितींचे फेव्हरिट आहे... किंवा हम नॉर्मल लोग है... आम जनता, दि मँगो पीपल!,’ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ही पात्रे सर्व मानवी गुणावगुणांची सरमिसळ आहेत. ही पात्रे त्याग करताना उदात्त होत नाहीत आणि स्वार्थी वागताना अपराधीही होत नाहीत. इम्तियाझ त्यांना मानवी पातळीवर आणून identifiable बनवतो. ‘जब वी...’ मध्ये आपण मनजीतसोबत चुकीचे वागतोय, हे माहीत असूनही गीत तसे वागणे सुरू ठेवते. लव्ह आज कलमध्ये मीरा नुकताच पती झालेल्या विक्रमला ‘मी तुझी नंतर माफी मागेन, पण आता मला निघायचंय’, असे स्पष्टपणे सांगते. ही कॅरेक्टर्स एकाच वेळी अविचारी आणि समजूतदार असतात. हायवेमध्ये वीरा ‘मूल होऊन अपहरणकर्त्या भाटीच्या कुशीत शिरते. मात्र, तो जेव्हा आईच्या आठवणीने व्याकूळ होतो, तेव्हा त्याला आई बनून सांभाळूनही घेते. सोचा ना थामध्ये वीरेनला मिळवण्यासाठी आकांडतांडव करणारी कॅरेन, आपला ‘एक्स आनंदी नाही, हे लक्षात येताच स्वतःहून अदितीला कन्व्हिन्स करण्यासाठी तडक तिच्या घरी जाऊन धडकते. नवऱ्याला सोडून जयकडे निघालेली मीरा नुसत्या फोनवर त्याला सॅनफ्रान्सिस्को प्रोजेक्ट’ मिळाल्याचे कळताच माघारी फिरते.

नव्या ‘लव्ह आज कल’मध्ये मात्र इम्तियाझ पात्रांच्या या ह्युमनायझेशनमध्ये कमी पडतो. त्याची पात्र त्यांच्या ट्रेट्सविषयी बोलतात तर खरं, पण त्यानुसार वागत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या खरेपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. उदाहरणार्थ, करियर ही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानणाऱ्या आणि त्यापुढे किमान पाच वर्षे तरी प्रेमासाठीही वेळ नसणाऱ्या झोईकडे उठसूट देवळात प्रवचनाला आल्याप्रमाणे ‘हां... करा सुरू तुमची प्रेमकथा’ म्हणत रघूसमोर ऐकत बसण्याइतका वेळ कुठून आला? किंवा लीना स्वतःहून सर्व गोष्टींची कन्सेंट देत असताना रघू बाहेरख्यालीपणा का करेल? हे व यासारखे प्रश्न निर्माण होणे मनात निर्माण होणे, हेच प्रेक्षकांचे व्यक्तिरेखामध्ये न गुंतण्याचे निदर्शक असून इम्तियाझच्या स्क्रिन प्लेच्या मर्यादा अधोरेखित करणारे आहे. उदयपूरचा अपवाद वगळता इम्तियाझ या चित्रपटातील पात्रांना त्यांच्या सराउंडिंग्जशी जोडण्यातही मागे राहातो. त्यामुळे व्यक्तिरेखांना त्यांच्या बॅक स्टोरीज मिळतच नाहीत.
या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणून चित्रपटाचा अँटी-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स दोन्ही सपाट आणि उथळ राहिले आहेत. कल आणि आज या दोन्ही कथांच्या शेवटामध्ये प्रेक्षक तटस्थ आणि त्रयस्थ राहतो. त्याला इम्तियाझ इन्वॉल्व्ह करून घेऊ शकत नसेल, तर गेल्या दोन तासांपासून जंग जंग पछाडून, आपल्याला येणारे सगळे पैंतरे वापरून आणि एकूणच आपल्या जुन्या सिनेमाला नव्या आयामासह सादर करून इम्तियाझने मिळवले तरी काय ना?
पहिल्या लव्ह आज कलमध्ये जय विमानतळावर मीराला भेटायला जातो, तेव्हा तिच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मुझे पता था तुम आओगे, इतने साल बाद सरप्राइझ देना थोडा मुश्किल है!’ या नव्या लव्ह आज कलमध्ये एके ठिकाणी रणदीप हुडा म्हणतो, ‘अगर मैं ला सकता, तो ये सब कुछ दे कर भी, वो पुरानी स्टुपिडिटी वापस लाकर जी लेता!’ नव्या लव्ह आज कल नंतर इम्तियाझचे वर्णन करण्यासाठी हे दोन संवाद सार्थ आहेत. इतक्या वर्षांनंतर त्याची सरप्राइझ करण्याची अॅबिलिटी कमी होत चाललीय आणि त्याचबरोबत त्याच्यातील स्टुपिडिटीही... संहितेत आणि पडद्यावरही हे झाकण्याची चाललेली धडपड जेव्हा उघड होते... त्याहूनही  क्लेशदायक म्हणजे आतापर्यंत आपल्या चित्रपटातून झाकलेल्या गोष्टी उघड करणाऱ्या दिग्दर्शकाकडून जेव्हा हे होते... तेव्हा, रूमीसकट सगळ्या गोष्टी उताण्या पडतात आणि ‘जो बूंद से गयी, वो... ती जातेच!