Monday, April 25, 2011

गंध-बंध!


तुला विसरलोच होतो असे नाही, पण आज सहज एक नवीन पुस्तक उघडताना तुझी आठवण मनाला गंधून गेली. गंधांमध्येही आपल्याला कुठल्याकुठे वाहून नेण्याची क्षमता असते नाही? त्या नव्या पुस्तकाच्या वासाने एका क्षणात मला आठ वर्षापूर्वीच्या त्या कॉलेजमधल्या लायब्ररीत नेऊन उभे केले.
वर्षाच्या सुरुवातीला लायब्ररीतल्या त्या टेबलावर पुस्तकांचा श्वास भरून वास घेताना तुला पहिल्यांदा पहिले होते. पुस्तकांचे बाईंडिंग करताना लावलेल्या खळाचा वास पुस्तकाला येतो, हा माझा शास्त्रीय समज तुझ्याकडे पाहून खोटा वाटत होता. जणू तुझ्यासामोरच्या पुस्तकांचा वासही त्यांच्या आशय-विषयानुसार बदलत असावा! पुढे तुझ्याशी ओळख वाढल्यानंतर तुझ्या गंधांच्या विश्वात नकळत मलाही प्रवेश मिळाला आणि त्यावेळी उलगडत गेलेल्या गांधावृत्तींनी आजपर्यंत माझ्या नॉस्टेल्जियाला नवा,ताजा,प्रफुल्लित गंध बहाल केलाय!!!
पावसाळ्यात भिजणाऱ्या मातीपासून ते तळणाऱ्या भजीपर्यंतचे वास तोपर्यंत परिचयाचे होते. पण कुडकुडत्या थंडीत दव-शिंपडल्या पहाटे जळणाऱ्या उबदार शेकोटीचा आणि रखरखीत उन्हात वाऱ्यासोबत भिरभिरत्या दिशाहीन पाचोळ्याचा वास मी तुझ्यासोबत पहिल्यांदा घेतला. टिपिकल प्रेमवीरासारखा तुझ्या केसांच्या वासात हरवून जाण्याइतका तुझ्याजवळ कधी आलोच नाही मी. तुझा स्पर्शही रंध्र विसरलीयेत आता. पण तुझ्याशी शेअर केलेला प्रत्येक गंध मात्र मी आजही घेऊ शकतो. अगदी ती वस्तू जवळ नसतानाही. इतका तो आठवणींच्या कुपीत ताजा आहे.
त्यातले काही किस्से तर आज अगदी विकृत वाटतायत. फिनेलचा ताजा वास घेण्यासाठी आपण दोघे एकदा ठरवून सकाळी हॉस्पिटलमधून फिरलो होतो, आणि पेट्रोलचा वास घेण्यासाठी ते उडून जात असतानाही गाडीची टाकी उघडी ठेवून बसलो होतो....हं... crazy!
पण त्यातली उत्कटता मात्र अस्सल खरी होती. उदबत्ती पेटवून ती अख्खी जळेपर्यंत तिच्यासमोर आपल्याला भक्तिभावाने वास घेत बसलेलं पाहून देव त्या उदबत्तीपेक्षाही जास्त जळाला असेल. चित्रकलेचे प्रगाढ पांडित्य माहित असूनही केवळ रंगांचा वास घेण्यासाठी कॅनव्हासवर उभे-आडवे, तिरपे कसेही फटकारे मारणारे आपण, रंगांनाही नवा अनुभव देऊन गेलो असू, खात्री आहे मला...आपल्या लहानपणी मिळणारी सेंटेड पेन्स ठरावीक सुवासांऐवजी आपल्याला हव्या त्या वासांमध्ये मिळाली असती तर...अशी मजेशीर कल्पनाही केलेली आठवत्येय!
...आणि या तर सर्व भौतिकदृष्ट्या गंधमय गोष्टी! पण सकृतदर्शनी वासांशी थेट संबंध नसलेल्या गोष्टींमधील गंधांचे अस्तित्व अनुभवायलाही मी तुझ्यासोबत शिकत गेलो. आजही कोल्हापूरची आठवण झाली, की वास येऊ लागतो मला त्या शहराचा! तिथला कोणताही गंध एकेरी ओळखता येऊ नये, इतका सर्व-गंधमिश्रित!तुला तुझ्या घराजवळच्या दमट समुद्राचा, अंधाऱ्या झोपडीत कौलांतील झरोक्यातून झिरपणाऱ्या प्रकाशाचा, दिवसातून दोनदाच गावाला येणाऱ्या एसटीचा यायचा तसाच! बाबा आठवलेच कधी, तर त्यांच्या हातातल्या सिगरेटसोबतच आठवतात. ...आणि त्या सिगरेटचा उग्र वास तिच्या धुरासकट मला त्या आठवणींत गुरफटून टाकतो. तुझी कुठली दूरची कुठली आज्जी तुला तिच्या जपमाळेच्या वासासाहित आठवायची नं!!
............................................................................................
.............................................
"गंधांनाही स्वभाव असतात!" तुझं आवडतं वाक्य! काही गंध कालपरत्वे विरळ होत उडून जातात, काही मंद दरवळत राहतात...तशी अत्तर, सेंट, डीओसारख्या मटेरीएलिस्टिक गोष्टींची देवाणघेवाण कधी केली नाही आपण. कधी गरज किंवा उणीवच नाही भासली. अख्ख्या कॉलेजने चिडवूनही कधी गुलाब नाही द्यावासा वाटला तुला. हां, पण काही सुवासित फुले द्यायची होती शेवटच्या भेटीवेळी...तू जपून ठेवली असतीस ती...सुकून गेल्यानंतरही...त्यांच्या सुवासांसह....मी जपलेल्या या गंधांच्या आठवणींसारखी...आणि मला नव्या पुस्तकांत सापडतेस, तसा कधी जुन्या वहीत ठेवलेल्या त्या शुष्क फुलांमध्ये सापडलोही असतो तुला मी...
....पण तेवढी द्यायची राहून गेली!!
एखाद्या गोष्टीचा गंध नसणे म्हणजे काय, हे आत्ता कळतंय मला....

8 comments:

  1. LADA ... are Zakkas jamala ahe ani mazya situationla Suit pan hota ahe!!! MAST ... Khup awadla... :D

    ReplyDelete
  2. आयुष्यात क्रेझीनेस जागा ठेवावाच आणि फुलं द्यायला कधीच उशीर झालेला नसतो Do think on it....बाकी छान
    - स्नेहल बनसोडे.

    ReplyDelete
  3. दुसरं जरा विषयांतर-ते 'लाडा' अगदी 'भावा'च्या चालीवर आलंय, कोल्हापूरचाय का सौरभ ? -स्नेहल .

    ReplyDelete
  4. छान वाटलं. महत्वाचं म्हणजे आमच्याही अशा आठवणी चाळवल्या. चांगल्या लेखनाचं वैशिष्ट हेच असतं ना!

    ReplyDelete
  5. आहा... सुंदर उतरलीये ही पोस्ट... त्यातल्या सगळ्या रंग- गन्धान्साहित...

    ReplyDelete
  6. सर्वांच्या प्रोत्साहक प्रतिक्रियांबद्दल ऋणी आहे. धन्यवाद.
    स्नेहल, सौरभ कोल्हापूरचाच आहे. अचूक ओळखलेत..आणि e-mail ID बदलला आहे का?

    ReplyDelete
  7. नाही इ - मेल आय डी बदललेला नाही...पण तुझ्या ब्लॉगवर मला माझ्या आय डी सह कॉमेंटच टाकता येत नाहीए - स्नेहल.

    ReplyDelete