चित्रपटाची सुरुवातीची फ्रेम आहे एका रॉक कॉन्सर्टची. ते दृश्य संपताच दहा वर्षानंतर त्या रॉक बँडमधला एकजण पुण्याच्या एका टेकडीवरून सूर्योदयाचा फोटो काढताना दिसतो. या आणि यानंतरच्या अवघ्या काही सीन्समध्येच श्राव्य आणि दृक अर्थांनी हा चित्रपट आपल्याला ‘ऑन-बोर्ड’ घेतो आणि असाच अधिकाधिक involve करून घेत पुढे जातो. रॉकस्टार होण्याचं स्वप्नं काही कारणास्तव अधुरं राहिलेला राहुल (राहुल देशपांडे) आणि एकट्या राहणाऱ्या आज्जीला आपल्यासोबत कॅनडाला घेऊन जाण्याकरिता काही दिवस भारतात आलेली कीर्ती (पल्लवी परांजपे) या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखांचा प्रवास ही कथा मांडते. लेखक-दिग्दर्शक सुहास देसले (सहलेखक मयुरेश वाघ) कथेवर काटेकोर पकडीचा अट्टहास न बाळगता ती सैलसर हाताळतात. पात्रांना नैसर्गिकरीत्या वागू देतात, त्यांना बंदिस्त न करता फॉलो करतात आणि परिणामी प्रसंगांची सहजता जपतात. बहुधा त्यामुळेच, आजही तो ताजा, टवटवीत वाटतो. एखाद्या निवांतवेळी गप्पा मारताना, “अरे त्या याची काय खबरबात रे हल्ली?” असं विचारल्यावर समोरच्यानं ऐसपैस सांगायला सुरुवात करावी आणि आपण मागे रेलून ऐकत राहावं, तसा हा चित्रपट तब्येतीत उलगडत जातो.
तरलता हे अमलताशचं सर्वांत ठळक वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. वेशभूषांच्या रंगसंगतींपासून ते प्रकाशयोजनेपर्यंत सर्वत्र या तरलतेचं भान आढळतं. म्हणूनच, राहुल आणि कीर्तीमध्ये प्रेमबंध निर्माण होत असल्याचं दाखवण्यासाठी चित्रपट ‘आउट ऑफ दि वे’ जाऊन काही करत नाही. त्या दोघांमधले संवाद flirtatious होत नाहीत, तर वागण्यातला मोकळेपणा वाढतो. एकमेकांसोबतच्या सहवासातील सुरक्षितता दिसते. (ही जवळीक टिपणाऱ्या शॉट्सचं मोंताज हे चित्रपटाच्या सर्वांत सुंदर दृश्यांपैकी एक आहे.) राहुल देशपांडे आणि पल्लवी परांजपे या दोघांनीही त्यांचा भूमिका समरसून निभावल्या आहेत. राहुल आणि कीर्तीप्रमाणेच कथेतील राहुलची बहीण दीप्ती (दीप्ती माटे), भाची डिंपल (त्रिशा कुंटे), मित्र, कीर्तीची आज्जी (प्रतिभा पाध्ये) या व्यक्तिरेखांबाबतही दिग्दर्शक आणि अभिनेते-अभिनेत्रींनी ही स्वाभाविकता जपली आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्तिरेखा ‘ओव्हर दि टॉप’ न होता कथेचा भाग बनून मिसळते.
संगीत हा या कथेतील जवळपास सर्व पात्रांना एकमेकांशी जोडणारा समाईक दुवा आहे. अगदी वाद्य दुरुस्तीच्या प्रक्रिया, ट्युनिंगपासून ते jamming sessions पर्यंत संगीत सर्वत्र व्यापून राहिलं आहे. Soft rock, भावगीतं आणि उपशास्त्रीय अशा विविध genresना या चित्रपटाच्या संगीतामध्ये सामावून घेण्यात आलं आहे. संगीत दिग्दर्शक भूषण माटे, पार्श्वसंगीतकार अमोल धाडफळे आणि राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, दीप्ती माटे या गायक-गायिकांनी या चित्रपटाच्या ‘ज्युक-बॉक्स’ला साद्यंत संग्राह्य बनवलंय.
चित्रपटशास्त्रामध्ये ‘मिझाँ-सेन्’ (mise-en-scene) ही संकल्पना वारंवार चर्चिली जाते. कथा जिथे घडते ते अवकाश व त्यामध्ये अंतर्भूत सर्वकाही, असा तिचा ढोबळ अर्थ आहे. मात्र, या व्याख्येचं प्रात्यक्षिक अमलताशमध्ये पाहायला मिळतं. ऋषिकेश तांबे यांच्या कॅमेऱ्यानं टिपलेलं पुणं हे आजवर चित्रपटात दिसलेलं सर्वांत रिलेटेबल पुणं आहे. टेकड्यांवरून दिसणारे सूर्योदय-सूर्यास्त, सकाळ-सकाळी झाडल्यानंतरचे स्वच्छ रस्ते, मधल्या पॅसेजमध्ये टेबलं टाकून चालणारी हॉटेलं, तिथले काउंटरवरच मांडी घालून उकळता चहा ग्लासांत ओतणारे मालक, दोन इमारतींच्या खाचीमध्ये शिल्लक राहिलेले वाडे, मंडईतले भाजीवाले, पांढुरक्या पीठगिरण्या, कुस्तीच्या आखाड्यातील तिरपे प्रकाशझरोके, पदपथ उद्यानांमधील मातीच्या वाटा, रात्री उशीराचे मोकळे रस्ते, बोचरी थंडी हे सगळं आजुबाजूला वावरणारं विश्व आहे आणि हा चित्रपट अक्षरशः त्या भवतालात विरघळलाय.
इतकं सौंदर्य लेऊन हा चित्रपट शेवटापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण त्रयस्थ राहत नाही. आपण पात्रांना जज न करता समजून घेतो. त्यांचे सहप्रवासी बनतो. अमलताशमध्ये नाट्यमय कलाटण्या नाहीत, धक्कातंत्राचा अवलंब नाही, चटकदार संवाद नाहीत, कोणी साधं वरच्या पट्टीत बोलतही नाही. चित्रपट आपल्याला प्रभावित, थक्क करायच्या ‘मोड’मध्ये जात नाही. तरीही एक सघन, संवेदनशील अनुभूती देण्यात अमलताश कमालीचा यशस्वी ठरतो. चित्रपट काही ठिकाणी तोकडा जरूर आहे. काही ताणेबाणे विणण्यात तो जास्त रेंगाळतो, राहुलच्या आर्थिक स्थितीबाबत तो संदिग्धता व विसंगती बाळगतो. काही संवादांमधील कृत्रिमता, एखाद-दुसऱ्या प्रसंगांत कलाकारांचा नवखेपणा, शेंगदाण्याचा खूपच रिपिटिटिव्ह विनोद आदी त्रुटी जमेत धरल्या, तरी त्यामुळे अनुभव उणावत नाही. अमलताशचं शांत सानिध्य अबाधित राहतं.
पर्सनली, एकाच आठवड्यात अगोदर ‘लापता लेडीज्’ आणि त्यापाठोपाठ ‘अमलताश’ थिएटरमध्ये बघताना प्रेक्षक म्हणून दुर्मिळ विजयाची भावना होती. सर्वत्र भव्य-दिव्यचा सोस वाढत असताना, आक्रस्ताळेपणा नॉर्मल समजला जात असताना, सर्वांत टिपेचा सूर खरा मानला जाताना, मिळकतीच्या आकड्यांवर गुणवत्ता जोखली जात असताना, ‘आपल्याला पाहावेसे वाटणारे सिनेमे बनणारच नाहीत का आता?’ या प्रश्नाचे उत्तर फारसे आश्वासक नसताना, ‘अमलताश’सारखा निर्मम सूर कोणीतरी आळवतंय, संयतपणे मनापासून काहीतरी सांगतंय, हे पाहणं हृद्य आहे. आपल्याशी वेव्हलेंथ जुळणारं कोणीतरी, कुठेतरी नवी सृजननिर्मिती करत असल्याचा दिलासा आहे, तोवर आयुष्य सुंदर आहे!!
(चित्रपटाच्या तंत्रज्ञांची नावं IMDb वरून घेतली आहेत. त्यामध्ये काही चुका असल्यास क्षमस्व.)
खूप तरल....
ReplyDeleteऋणी आहे.🙏
Deleteखूप छान लिहिले आहेस संकेत. 'अमलताश' हा चित्रपट आल्याची कल्पना पण नव्हती. आता मात्र मी शोधून पाहीन.
ReplyDelete