Sunday, August 4, 2019

भारतीय क्रिकेटचा ‘सख्त लौंडा’



युवराजसिंगबद्दल फक्त क्रिकेटपटू म्हणून लिहिणे/विचार करणे शक्यच नाही. निदान माझ्या पिढीला तरी… त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून त्याच्या मैदानापुरत्या कामगिरीचे दाखले पुढील मजकुरात शक्यतो आढळणार नाहीत. (ज्यांना फक्त युवराजच्या एकापेक्षा एक खेळींच्या स्मरणरंजनात रमायचंय, त्यांनी थेट लेखाच्या शेवटी दिलेले बुलेट पॉइंट्स पाहावेत. मनावर कोरल्या गेलेल्या युवराजच्या कामगिरीची यादी तिथे आहे. यापेक्षा इतरांची यादी वेगळी किंवा अधिक सविस्तरही असू शकते. शिवाय या सगळ्या गोष्टी यू-ट्यूब, अन्य ठिकाणी सापडतीलच. तेव्हा त्याविषयी वाचण्याऐवजी त्या प्रत्यक्षच का अनुभवू नयेत??)
आमच्यासाठी युवराज एक सेंटिमेंट आहे. त्याचप्रमाणे, त्याची कारकीर्द हे भारतीय क्रिकेटच्या व्यावसायिकीकरणाच्या प्रवासाचे समांतर रूपक आहे. सर्वांत विशेष म्हणजे result oriented competitive cricket च्या pioneer पैकी (निकालकेंद्री स्पर्धात्मक क्रिकेटचा प्रणेता) एक असलेल्या युवराजची निवृत्ती ही एक वर्तुळ पूर्ण होण्याची प्रक्रिया आहे. ही केवळ वर्णनपर विधाने नसून पुढील लेखात त्यांचेच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असेल. क्लिअर? आता तुम्ही इथपर्यंत वाचत आलाच आहात, तर गोष्टीला सुरुवात करूया.

…तर गोष्ट सुरू होते, साधारणपणे नव्वदच्या मध्यातून. १९९६ च्या वर्ल्ड कपने वन-डे क्रिकेटचे सर्वांत मोठे मार्केट आशियामध्ये, त्यातही भारतीय उपखंडामध्ये असण्यावर शिक्कामोर्तब केले. प्रेक्षकसंख्या तर भारतात नेहमीपासूनच होती. त्यात आता दोन मार्केट फोर्सेसची भर पडली. पहिले म्हणजे ग्लोबलायझेशननंतर मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपला ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होत्या आणि ब्रँड पोझिशनिंगसाठी क्रिकेट आणि सिनेमा यांपेक्षा चांगली आयुधे त्यांना मिळालीच नसती. विल्स वर्ल्ड कप, टायटन कप, कोकाकोला कप, सहारा कप, सिंगर कप ही त्या काळातील स्पर्धांची नुसती नावे आठवली, तरी हा मुद्दा लक्षात येईल. दुसरा फोर्स होता, ब्रॉडकास्टिंग नेटवर्कचा. कारण, याच अलीकडे-पलीकडे भारतात प्रायव्हेट ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्सचे जाळे विस्तारत होते. स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन हे चॅनेल ब्रॉडकास्टिंगच्या बाजारपेठेत दाखल झाले होते आणि येणाऱ्या काळात त्यामध्ये भरच पडणार होती. डीडीवर बातम्यांची वेळ झाली, की सामन्याचे प्रक्षेपण थांबणे आता टीव्ही प्रेक्षकांना सहन करावे लागणार नव्हते. अशावेळी  जाहिरातींना ग्राहक जमवण्यासाठी माध्यमे हवी होती आणि माध्यमांना नफा कमावण्यासाठी जाहिरातदार. एकूण क्रिकेटच्या प्रसार आणि विस्तारासाठी पोषक वातावरण.
ही संधी ज्यांनी हेरली, त्यांमध्ये जगमोहन दालमिया आणि राजसिंग डुंगरपूर या दोन नावांचा उल्लेख प्रकर्षाने करायला हवा. बीसीसीआयमध्ये विविध पदे भूषवलेले दालमिया हे १९९७ ते २००० या कालावधीत आयसीसीचे अध्यक्ष होते आणि त्याचदरम्यान, १९९६ ते १९९९ मध्ये डुंगरपूर बीसीसीआयचे अध्यक्ष होते. हळुहळू क्रिकेटला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. भारतीय संघाचे परदेश दौरे, मायदेशातील दुरंगी मालिका, तिरंगी स्पर्धा, देशातील आंतरराष्ट्रीय स्टेडियम आदींची संख्या वाढू लागली. हे सर्व सुरू असताना केंद्रस्थानी असणारा भारतीय संघ फुसका असून चालणार नव्हते. त्याचवेळी, संघनिवडीसाठी महानगरांवर अवलंबून राहता येणार नसल्याची जाणीवही तीव्र बनत होती. देशाअंतर्गत वाढत्या क्रिकेट स्पर्धा, रणजी स्पर्धेतील वाढते संघ आणि भारतीय संघात देबाशिष मोहंतीसारख्या ओडिशाच्या खेळाडूला मिळालेले स्थान या सर्वांतून ही जाणीव प्रतिबिंबित होत गेली.
सगळं काही ठरल्याप्रमाणे घडतच होतं की मॅच फिक्सिंगची माशी शिंकली. काय झालं, कसं झालं याच्या खोलात इथे नको जायला, पण त्याचा भारतीय क्रिकेटवर झालेला परिणाम अनेकार्थांनी दूरगामी ठरला. घाईघाईत सचिन पुन्हा कर्णधारपदी आला. परंतु, काही महिन्यांतच पायउतार झाला. आता तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नव्हती. मैदानावरील आणि मैदानाबाहेरीलही स्टेक्स पणाला लागले होते. सचिनने नेतृत्व सोडल्यानंतर ते सोपवता येईल, असा सीनियर खेळाडूच संघात उरला नव्हता. या व यांसारख्या अनेक कारणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील अवघे तीन-चार वर्षांचे वय असणाऱ्या सौरव गांगुलीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली.
गांगुली कर्णधार झाल्यानंतर काही महिन्यांतच भारतीय संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक म्हणून जॉन राइट रुजू झाले. गांगुली-राइट जोडीने आता एकेका आव्हानाला सामोरे जाण्यास सुरुवात केली. सर्वांत मोठे आव्हान होते भारतीय क्रिकेटने गमावलेला प्रेक्षकांचा विश्वास पुन्हा मिळवून देण्याचे आणि तो मिळण्याचा राजमार्ग होता मैदानात खणखणीत कामगिरी करून दाखवण्याचा. त्यासाठी पुन्हा संघाचा डोलारा नव्याने उभारावा लागणार होता.
मग, २००३ च्या वर्ल्ड कपचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून गांभीर्याने संघबांधणी सुरू झाली. संघातील प्रत्येक जागेसाठी निश्चित भूमिका ठरवण्यात आली आणि त्यादृष्टीने खेळाडूंचा शोध घेतला गेला. सर्वांत गंभीर प्रश्न होता मधल्या फळीचा. कारण, महंमद अझरुद्दीन व अजय जडेजा हे मधल्या फळीतील दोन खंदे खेळाडू फिक्सिंगमुळे बाहेर गेले होते, तर उशीरा संधी मिळालेला रॉबिन सिंग निवृत्तीकडे झुकला होता. ‘बेंच स्ट्रेंथ’ वगैरे प्रकार अस्तित्त्वातच नव्हता. अशावेळी सुमार कामगिरीमुळे संघातून डच्चू मिळालेल्यांना परत संधी देण्यापेक्षा गांगुलीने नेटाने नव्या खेळाडूंचा शोध सुरू केला.
हां… नमनाला इतकं बादलीभर तेल पडल्यानंतर ‘एंट्री’ होते युवराज सिंगची. जानेवारी, २००० मध्ये भारताच्या युवा संघाने महंमद कैफच्या नेतृत्वाखाली पहिलेवहिले अंडर-१९ वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले, तेव्हा १८ वर्षीय युवराज या स्पर्धेचा मालिकावीर होता. (आजतागायत अंडर-१९ आणि सीनियर वर्ल्ड कपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा युवराज हा एकमेव क्रिकेटपटू आहे.) याच वर्षी, ऑक्टोबरमध्ये नैरोबीत झालेल्या आयसीसी नॉकआउट (हीच स्पर्धा आता चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून ओळखली जाते) स्पर्धेद्वारे युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केनियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात युवराजला फलंदाजीच मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवराजने ८० चेंडूंमध्ये ८४ धावा फटकावल्या आणि the rest is history!

वन-डेसाठी भारतीय संघाचे जे कोडे सोडवण्याचा प्रयत्न गांगुली-राइट करत होते, त्या कोड्याची युवराज हा अनेकार्थांनी ‘मिसिंग लिंक’ होता. त्यामुळे, तो संघात आल्यानंतर हे कोडे उलगडण्यास सुरुवात झाली. भारताची बेभरवशी फलंदाजी पाहता पहिल्या दहा षटकात ४ विकेट गेल्यास पुढची चाळीस षटके डाव सांभाळणे आणि त्याउलट चाळीस षटकांपर्यंत विकेट हातात राहिल्यास अखेरच्या दहा षटकांत फटकेबाजी करणे या दुहेरी आव्हानाला युवराज खरा उतरला. याउप्पर युवराजच्या फटकेबाजीमुळे राहुल द्रविडवरील ‘स्ट्रोक्स प्ले’चे दडपण जाऊन तो अधिकाधिक नैसर्गिक खेळ करू शकला. त्याशिवाय, युवराजने सुरुवातीला द्रविड व कैफसोबत आणि नंतर धोनीसोबत लेफ्ट-राइट कॉम्बिनेशन दिले, ते वेगळेच!
गोलंदाजीमध्ये कुंबळे व हरभजनमुळे तिसऱ्या फिरकीपटूला भारतीय संघात स्थान नव्हते आणि विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांवर तीन वेगवान गोलंदाज वापरणे व्यवहार्य नव्हते. अशावेळी रॉबिन सिंगच्या निवृत्तीनंतर उर्वरित दहा षटके टाकायची कोणी, हा प्रश्न होताच. लागोपाठच्या दुखापतींमुळे सचिनच्या गोलंदाजीवर मर्यादा येत होत्या आणि टेनिस एल्बोनंतर तर ती जवळपास बंदच झाली. ही गरज युवराजने सेहवागसोबत भरून काढली. डावखुऱ्या क्रॉस आर्म अॅक्शनमुळे युवराजने गोलंदाजीतही बऱ्यापैकी वैविध्य आणले आणि वन-डे कारकिर्दीत १११ विकेटही मिळवल्या.
आता मुद्दा फिल्डिंगचा. योगायोगाने वर उल्लेख केलेले अझर, जडेजा आणि रॉबिन सिंग हे तिघे तत्कालीन भारतीय संघातील स‌र्वोत्तम क्षेत्ररक्षकही होते. त्यामुळे मधल्या फळीप्रमाणेच क्षेत्ररक्षक तटबंदीलाही खिंडार पडले होते. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी जे महत्त्व स्लिप फिल्डर्सचे आहे, तेच महत्त्व वन-डेत ऑफ-साइड फिल्डिंगचे आहे. पॉवर-प्लेमध्ये पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, गली या ‘catching positions’ ला संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक (जाँटी ऱ्होड्स, पॉल कॉलिंगवूड इ.) तैनात करण्यात बाकी संघ भारताच्या खूप पुढे होते. युवराजने प्रथम कैफ आणि नंतर रैनाच्या साथीने ही पिछाडी भरून काढली. झहीर, नेहरापासून ते इशांतपर्यंतच्या गोलंदाजांच्या यशात युवराजचे हे महत्त्वाचे योगदान आहे.

येणाऱ्या नव्या शतकासोबत क्रिकेट अधिक वेगवान झाले, तसा वन-डे क्रिकेटचा चेहरामोहराही बदलला. वन-डे क्रिकेट आता ‘एका दिवसाची कसोटी’ राहिले नव्हते. त्याची स्वतंत्र strategy-planning-execution ची साखळी विकसित झाली होती आणि सातत्यपूर्ण विजयासाठी ती फॉलो करणे भाग होते. भारतीय संघाला आाता पेटाळ्यावर (किंवा एसपी ग्राउंड किंवा शिवाजी पार्क) खेळायला आल्यासारखा ‘जमलं तर बघू’ अॅटिट्यूड ठेवता येणार नव्हता. संघ जिंकण्याच्याच उद्देशाने मैदानावर उतरणार होता आणि अखेरच्या चेंडूपर्यंत विजयासाठी लढणार होता. त्यासाठी लागणारा Never say die अॅटिट्यूड, फिजिओ, फिटनेस ड्रिल्स, अॅथलेटिसिझम या केवळ सुरस कल्पना नाहीत. रमेश पोवार हा अपवाद आहे व तोही फार काळ राहणार नाही. ‘भारताची फलंदाजी म्हणजे सचिनची बॅट’ हा गैरसमज आहे. सव्वातीनशे धावांपलीकडचे लक्ष्य पाच विकेट गेल्यानंतरही पार करता येऊ शकते, या व यांसारख्या अनेक गोष्टी भारतीय संघाने या काळात सिद्ध केल्या. परेश रावलनी ‘ये नया हिंदोस्तान है’ हा डायलॉग उच्चारण्याच्या १६-१७ वर्षांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानावर याची प्रचिती येऊ लागली होती आणि त्याच्या आघाडीच्या flag bearers पैकी युवराज एक होता. याच युवराजला जेव्हा ‘यो-यो’ चाचणीच्या निकषाद्वारे संघाबाहेर ठेवले जाते, तेव्हा competency च्या अट्टहासाचे वर्तुळ पूर्ण झालेले असते.  

आणखी एका गोष्टीसाठी युवराजला श्रेय द्यावे लागेल आणि ते म्हणजे for being real. त्याच्या फलंदाजी शैलीतील strong back lift इतकाच त्याचा मैदानावरील, तसेच मैदानाबाहेरील वावरही देखणा, आकर्षक होता. त्याने कधीही स्लेजिंग खपवून घेतले नाही, पण स्वत:हून कधी केलेही नाही. त्याचा माजही naturally authentic होता. politically correct राहणे त्याला कधी जमले नाही, म्हणूनच कर्णधारपदाच्या चर्चेतही तो कधी आला नाही. आहोत तसे व्यक्त होण्यात त्याला कधीच इमेजचा अडसर जाणवला नाही, त्यामुळेच तो खरा वाटला. कैफने नेटवेस्ट जिंकून दिल्यावर प्रत्येक भारतीयाला कैफला कडकडून मिठी मारायची होती. पण, गांगुलीने लॉर्ड्सच्या गॅलरीत शर्ट काढण्यापूर्वी मैदानावर जाऊन पहिली मिठी मारली, ती युवराजने. २००७ मध्ये फ्लिंटॉफने डिवचल्यानंतर याला धडा शिकवलाच पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटले होते, पण बिचाऱ्या ब्रॉडला सहा षटकार ठोकून तो शिकवला युवराजनेच. २ एप्रिल २०११ ला वानखेडेवर धोनीच्या सिक्सनंतर पहिला आनंदाश्रूंचा बांध फुटला, तो युवराजचा. इतकी वर्ष भारतीय संघाचा भाग असूनही कुठल्याही groupism मध्ये त्याचे नाव आले नाही. त्याला कधीही स्वत:ची ‘अफेअर’ लपवावी लागली नाहीत आणि नरेंद्र मोदींना दिलेल्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेतील spelling mistake ही त्याने तितक्याच सहजतेने स्वीकारली. निवृत्तीपूर्वी ‘फेअरवेल’ सामना नको, हे तो सांगू शकला, ते यामुळेच!
बाकी २०११ नंतर त्याचे कॅन्सरचे निदान, त्यामुळे घ्यावा लागलेला ब्रेक, तंदुरुस्त झाल्यानंतरही संघात परतण्यासाठी करावी लागलेली धडपड, २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा हक्क असूनही स्टुअर्ट बिन्नीला संघात मिळालेली संधी, त्यानंतर रणजीत आपले नाणे खणखणीत वाजवून त्याने केलेले पुनरागमन, मग गच्छंती आणि अखेर २०१९ चा वर्ल्ड कप सुरू असताना जाहीर केलेली निवृत्ती, याविषयी लिखित शब्द खर्ची घालणे निरर्थक आहे. एखाद्या आळशी दुपारी याविषयीच्या गप्पा निघाव्यात, चहाची आवर्तनं व्हावीत, हे घाव खोल जपणाऱ्या मित्रांनी यथेच्छ शिव्या हासडत मोकळे व्हावे आणि बघताबघता बाहेर अंधारून यावे, यापेक्षा या काळाचे दुसरे सार्थ रूपक काय असणार…
पर्सनली, युवराज हा काही आमचा childhood hero नव्हता. कारण, युवराज भारतीय संघात स्थिरावेपर्यंत आम्ही शाळेची वेस ओलांडली होती. त्यामुळे, युवराजसोबतचे कनेक्शन कॉलेजमधल्या त्या एका सीनियरप्रमाणे होते. नुकतंच फुटलेलं मिसरुड घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये दाखल होता, तेव्हा तुमची नवखी नजर आजुबाजूच्या वातावरणाला सरावायची असते. अशातच एका सीनियरला बघून तुम्ही भारावून जाता. तो स्पोर्ट्सपासून कल्चरल अक्टिविटीपर्यंत सगळीकडे स्टार असतो. त्याच्याविषयी रोज नवनव्या चर्चा कानावर येतात. त्याने विशेष प्रयत्न न करताच सगळ्या मुली त्याच्यावर मरत असतात. पण, तो स्वतः यापैकी कशातच गुंतलेला नसतो.
त्याची बेफिकीरी अनादर लेव्हल असते. तो ना गुड बॉय बनण्यासाठी प्रयत्न करतो, ना बॅड ड्युडचे बिरुद मिरवतो. त्याला ‘कूल’ बनण्यासाठी तर्जनीवर बाइकची किल्ली फिरवावी लागत नाही, ना दाताखाली चुइंगम चघळावे लागते. तो जसा आहे तसाच कूल असतो. तो दोस्तांचा यार असतो. त्याने ओळख दाखवली, कधी खांद्यावर सहज हात ठेवला, तरी आपल्यालेखी स्वतःचं महत्त्व वाढतं. कधीही, काहीही घडलं, तरी हा आपल्या पाठिशी उभा राहणार, असा आपल्याला विश्वास असतो. त्याच्या यशात आपणही जल्लोष करतो. त्याच्याबद्दल कुणी काहीबाही बोललं, तर आपलंही मन दुखावतं. त्याच्या सेंडऑफला आपलेही डोळे पाणावतात.
हळुहळू आपण मोठे होतो. दुनियेची अक्कल यायला लागते, तशी त्या सीनियरची प्रतिमा पुसट होऊ लागते. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर त्याचंही करियरमध्ये फारसं काही बरं चाललं नसल्याचं कानावर येत असतं. ...आणि मग अचानक अनेक वर्षांनी आपण पुन्हा त्याला भेटतो. त्याच्याकडे आता कॉलेजमधले वलय नसलं, तरी त्याचं शूर स्माइल तसंच असतं. कोणताही आव न आणता तो आहे तसा आपल्याला भेटतो. तो जो काही आहे, स्वतःच्या टर्म्सवर आहे, त्याने आपलं अपयश दुसऱ्याच्या माथी मारलेलं नाही आणि प्रगतीसाठी कोणापुढे मान तुकवलेली नाही, हे आपल्याला कळून चुकतं. काहीही झालं, तरी हा निगोशिएबल’ नाही, यावर आपला विश्वास बसतो आणि आपल्या मनातील त्याची प्रतिमा पुन्हा उजळते. त्याच्यासारख्यांमुळे आपल्यातला भाबडेपणा जिवंत राहतो आणि आपण योग्य माणसावर प्रेम केलंय, याबाबत आश्वस्त होतो.

धोनीवर बेतलेला अख्खा सिनेमा बघितल्यानंतर, जर माझ्याप्रमाणे तुमचाही सर्वांत (आणि कदाचित एकमेव) आवडता सीन हा युवराजच्या बास्केटबॉल कोर्टवरून चालत जाण्याचा असेल, तर पुन्हा वर जाऊन दुसऱ्या परिच्छेदाची पहिली ओळ वाचा आणि बघा पटतंय का!
I rest my case.
…..


युवराजच्या कारकिर्दीतील हाय पॉइंट्स.
-     * नैरोबीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावा.
-     *  नेट वेस्ट सीरिजच्या (२००२)  अंतिम सामन्यात ६९ धावा.
-   *  २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये घेतलेले दोन (ग्रॅमी स्मिथ, जाँटी ऱ्होड्स) अफलातून झेल.
-     २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन बाद झाल्यानंतर पाकिस्तानविरुद्धचे अर्धशतक.
-     २००४ च्या पाकिस्तानातील कसोटी क्रिकेट मालिकेतील शतक.
-     ऑस्ट्रेलियातील व्ही. बी. सीरिजमध्ये (२००४) ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेल्या १३९ धावा.
-     २००६ च्या पाकिस्तानातील वन-डे मालिकेत धोनीसोबत धावांचा यशस्वी पाठलाग.
-     टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले सहा षटकार.
-     टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० चेंडूंमध्ये ७० धावा.
-   * २००९ मध्ये भारताच्या ‘टी-२०’तील सर्वांत मोठ्या यशस्वी पाठलागात २५ चेंडूंत नाबाद ६० धावा.
-     २०११ च्या वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वच कामगिरी.
-  २०१७ च्या सुरुवातीस इंग्लंडविरुद्धच्या वन-डेमध्ये १५० धावा. धोनीसोबतची अडीचशतकी भागीदारी.
-     * २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमधले पाकिस्तानविरुद्धचे अर्धशतक. 





6 comments: