Thursday, January 4, 2018

‘मामुलीपणा’चा असामान्य चित्रप्रवास

महाराष्ट्र टाइम्समधीलमाझा आवाजया चालू घडामोडींविषयी निवडक वाचकांची मते देणाऱ्या सदरासाठी मी काही वर्षांपूर्वी एका मैत्रिणीला फोन केला होता. ज्यावर काहीही मत दिले तरी वाद उद्भवण्याचा तीळमात्र संभव नाही, असाफेसबुकची नवी एन्क्रिप्शन पॉलिसी आणि सरकारचे नियमवगैरे विषय होता. आणि त्यावरही मत द्यायला, तिची टाळाटाळ सुरू होती. याच मैत्रिणीने आम आदमी पार्टी सुरू झाल्यानंतर आपल्या फेसबुक अकाउंटच्या पॉलिटिकल व्ह्यूजमध्ये स्पष्टपणे या पक्षाचा उल्लेख केला होता. राजकारणापासून लांब राहू इच्छिणाऱ्या सामान्य माणसावरआपने काय गारुड केलं होतं, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण. ...आणि हे उदाहरण अपवादात्मक निश्चितच नव्हतं, याची साक्ष अॅन इनसिग्निफिकंट मॅन हा माहितीपट पटवतो. आपच्या जन्मकथेपासून पहिल्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा या माहितीपटाचा विषय.
सचिन - बिलियन ड्रीम्सनंतर व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित झालेला या वर्षातील हा दुसरा माहितीपट. अर्थात, एवढे एक साम्य सोडले, तर दोन्ही माहितीपटांच्या व्यावसायिक गणितांमध्ये कायच्याकाय फरक आहे. ‘सचिनया माहितीपटामागे चि तें डु या आठ अक्षरांभोवती फिरणाऱ्या बाजारपेठेचे भक्कम पाठबळ होते. त्याचा प्रभाव त्या माहितीपटाची निर्मितीमूल्ये, प्रसिद्धी, वितरण आदी गोष्टी ठरवण्यावर होता. दुसरीकडेअॅन इनसिग्निफिकंट मॅनहा क्राउड फंडिंगवर बनवण्यात आला असून तब्बल ७८२ जणांनी त्यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. त्यामुळे निर्मितीमूल्ये समाधानकारक असली, तरी प्रसिद्धी वितरणावर मर्यादा येणे उघड आहे. सहाजिकच नोव्हेंबरमध्ये काही तुरळक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा माहितीपट फारसा गाजावाजा होताच लुप्त झाला. त्यानंतर महिन्याभराने तो आता यू ट्यूबवर उपलब्ध झाला आहे.
म्हटलं तर ही आपल्या डोळ्यांसमोर घडलेली कथा. नाट्यमय घटनांनी भरलेली. ‘मोदीलाटवगैरे येण्यापूर्वीच्या दोन-एक वर्षांचा काळ हा भ्रष्टाचारविरोध-लोकपाल-इंडिया अगेन्स्ट करप्शन-आम आदमी पार्टी या गोष्टींनी व्यापला होता. या गोष्टींच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांच्या प्रत्येक हालचालींवर मुद्रित-इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आदींचे डोळे लागले होते. अरविंद केजरीवाल यांची वाटचाल तर झपाट्याने 'Love him or hate him, but can't ignore him' ही उक्ती सार्थ ठरवण्याकडे होत होती. नेमका हाच या चित्रपटाचा आरंभबिंदू आहे. २०१३ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या एका भूमी अधिकाऱ्याला राजकीय माफियाने गाडीखाली चिरडून मारले आहे. केजरीवाल त्यांच्या कुटुंबीयांना, संबंधित अधिकाऱ्यांना भेटता, तसे ही हत्या सर्वांसमोर होऊनही कायद्याच्या चौकटीत त्याबद्दल काहीही करता येणार नाही, हे स्पष्ट होत जाते
कट टू २०११. जंतरमंतरवर उपोषणादरम्यान पहुडलेले अण्णा हजारे, पोलिसांच्या फवाऱ्यामध्ये नखशिखांत भिजलेले केजरीवाल, टीव्हीवरील चर्चांमध्ये या मंडळींना राजकारणात येण्याचे उघड आव्हान देणारे दिग्विजय सिंह, संसदेमध्ये लोकपालला नकार देत विधेयकाचे कागद भिरकावणारे खासदार, केजरीवालांनी ठिकठिकाणी दिलेल्या भाषणांचे बाइट्स आदी पार्श्वभूमी स्पष्ट करणाऱ्या संदर्भबिंदूंचे (reference points) मोंताज पहिल्या तीन-चार मिनिटांमध्ये दाखवून हा माहितीपट मुख्य कथाभागावर लक्ष केंद्रित करतो. ‘आम आदमी पार्टीहा पक्ष स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयापासून ते केजरीवाल यांच्या शपथविधीपर्यंतचा घटनाक्रम हाच आपल्या माहितीपटाचा मुख्य कथाभाग असल्याबाबत खुशबू रांका आणि विनय शुक्ला या दिग्दर्शकद्वयीला स्पष्टता आहे. त्यामुळे यादरम्यानची प्रत्येक घटना विलक्षण बारकाव्यांसह मांडण्यात आली आहे. अगदी 'आप'च्या कार्यकर्त्यांनीसत्याग्रहचित्रपट पाहण्यापासून ते आपापसांत एकमेकांची थट्टामस्करी करण्यापर्यंतच्या चित्रणातून हा माहितीपट डोळ्यांसमोरच्या कथेतील दृष्टीआडची सृष्टी दाखवू लागतो.
साधारणतः माहितीपटांची रचना (form) ही घडलेल्या घडामोडींचे प्रत्यक्ष चित्रण (real time footage) आणि त्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींनी त्यावर केलेले भाष्य, यांद्वारे आशयापर्यंत (content) पोहोचण्याची असते. यातील गाळलेल्या जागा भरण्यासाठी सहसा पार्श्वभूमीवर निवेदनाचा आधार घेण्यात येतो. इनसिग्निफिकंटमध्ये ही रचना नाकारून पूर्णपणे प्रत्यक्ष चित्रणावर अवलंबण्याचे धाडस दिग्दर्शकद्वयीने दाखवले आहे. माहितीपटाने कोणतीही विशिष्ठ बाजू घेण्याच्या जवळपास अर्ध्या शक्यता केवळ या रचनेमुळेच गळून पडतात. जर संहितेतच कोणाला बाजू मांडण्याची संधी मिळणार नसेल, तर माहितीपटाने बाजू घेण्याचा प्रश्न उरतोच कुठे? त्या अर्थाने इनसिग्निफिकंट हा प्रसिद्ध अमेरिकन माहितीपट दिग्दर्शक मायकेल मूर यांच्या माहितीपटांची जातकुळी जपणारा आहे.
आता दुसरी शक्यता उरते, ती आपल्याला हव्या तशा चित्रफिती जोडून संबंधित विषयाच्या धर्जिणा किंवा विरोधी आशय मांडण्याची. प्रसारमाध्यमांवर वरचेवर असे आरोप केले जातात. याबाबतीत मात्र, दिग्दर्शकद्वयीला प्रामाणिकपणाचे श्रेय दिले पाहिजे. या माहितीपटाने संपूर्ण कालावधी स्वतःची त्रयस्थ आणि तटस्थ नजर टिकवून ठेवली आहे. अरविंद केजरीवाल हे या माहितीपटातील एक पात्र म्हणून समोर येतात, नायक म्हणून नाही. (पोस्टरवरून सूचित होते, त्याप्रमाणेअॅन इनसिग्निफिकंट मॅनहे नाव म्हणजे त्यांच्यासाठी वापरलेले विशेषण नसून तोआम आदमीचाइंग्रजी भावानुवादआहे.) इतर लोकांबाबतही हा नियम कसोशीने पाळण्यात आला आहेत्यामुळेच माहितीपटात भर पत्रकार परिषदेमध्ये शाई फेकण्यात आलेले केजरीवाल दिसतात, तसे वेळोवेळी पक्षातील कार्यकर्त्यांना, माध्यम प्रतिनिधींना स्पष्टीकरण देताना हतबल झालेले योगेंद्र यादवही दिसतात आणि शाझिया इल्मींची वादग्रस्त टेप प्रसिद्ध झाल्यानंतर आपला उघडपणे शिव्या घालणारे सामान्यजनही. 
चित्रपट रसास्वाद शिकताना एक चमकदार वाक्य कानावर पडले होते, ‘Director is god in feature film, while god is the director for documentary.माहितीपट दिग्दर्शकांचे परावलंबित्व अधोरेखित करणारी ही टिप्पणी. केवळ प्रत्यक्ष चित्रणाला स्थान देण्याचे ठरवल्यानंतर दिग्दर्शकांना आवश्यक ते फुटेज मिळवण्यासाठी आणि इतके तुकडे जोडून त्यातून एक निश्चित अर्थ साकारण्यासाठी काय सव्यापसव्ये करावी लागली असेल, याची प्रचिती हा माहितीपट पाहून येऊ शकते. आपपलीकडे या माहितीपटाचा परिघ विस्तारला आहे, तो याचमुळे. दिल्ली’ हे इन्सिग्निफिकंट’मधील एक महत्त्वाचे पात्र आहे. तिचे गल्ली-बोळ, नाले, यमुना, ट्रॅफिक जाम, विजेच्या तारांचे जाळे, मेट्रो, थंडी, पहाटेचे दाट धुके आणि या सर्वांना जिवंत करणारी दिल्लीची जनता. अगोदरच राजकारण नसांनसांत भिनलेल्या या शहरावर चढलेला निवडणुकीचा रंग इनसिग्निफिकंटमधून खूप raw स्वरूपात समोर येतो. मेगा इव्हेंट म्हणून असलेले निवडणुकीचे अस्तित्त्व, तिचे करमणूकमूल्य (entertainment value), प्रचारादरम्यान परस्परांना आजमावणारे नेते आणि नागरीक, मोठमोठी आश्वासने, मोहल्ला सभांपासून ते रोड शोपर्यंत जमणारी गर्दी, शक्तिप्रदर्शन, पैशांची उधळपट्टी, मंदिरांमध्ये घेतले जाणारे दर्शन, जुंपलेले कार्यकर्ते, वॉर रूम, चिंतन बैठका, निवडणूक घेणारी प्रशासकीय व्यवस्था, पोलिस आदी गोष्टींबरोबरच भिन्न पक्षांचे नेते समोरासमोर आल्यावर काय बोलतात, एकमेकांमागे काय बोलतात, बँक-एंड टीममधला संवाद काय असतो, मतभिन्नतेवरचा तोडगा काय असतो, याची चुणूकही या माहितीपटात दिसते.
तीच गोष्ट मीडियाची. माहितीपटात मीडिया निवेदकाच्या भूमिकेत आहे. एकीकडे आपची वाटचाल सुरू असताना समांतरपणे काय घडत होते, हे मीडियाच्या नजरेतून समोर ठेवण्यात येते. बातम्या, चर्चात्मक कार्यक्रम (discussion panel program), वन-टू-वन आदींमधून आपच्या वाटचालीला मीडियाचा प्रतिसाद किंवा त्यावर मीडियामध्ये उमटणारे पडसाद दिसतात, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी विविध मुलाखतींमधून केजरीवालांच्या भूमिकेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह, आपसारख्या आउडसायडरला रोखण्यासाठी चक्क भाजपची प्रमुख विरोधी पक्ष म्हणून घेतलेली दखल इथपासून ते सरकारस्थापनेसाठी आपला बिनशर्त पाठिंबा देण्याची दाखवलेली तयारी आदी गोष्टी मीडिया कव्हरेजमुळे ऑन रेकॉर्ड आल्या आहेत. 

 रामलीला मैदानात झालेला केजरीवालांचा शपथविधी सोहळा हा माहितीपटातील अखेरचा प्रसंग आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यावेळी कॅमेरा टिपतो समोर पसरलेल्या अथांग गर्दीमध्ये उभ्या योगेंद्र यादवांना आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या निश्चयी आशावादाला. केजरीवाल उपस्थितांना देत असलेली शपथ उच्चारताना, त्यांचाही आवाज गर्दीत मिसळतो, तेव्हा नेता कोणताही असला, तरी या आशावादी गर्दीवरच लोकशाही तगली असल्याची खूणगाठ पटते. त्यापुढच्या चार वर्षांत आपमध्ये काय घडले, हे माहितीपटाच्या अखेरीस केवळ स्क्रोलमधून सांगण्यात आले आहे. याबाबतीत मात्र हा माहितीपट प्रेक्षकांची निराशा करतो. पुढच्या प्रत्येक टप्प्यावर पहिल्या वर्षाइतकेच, किंबहुना त्याहून किंचित अधिक नाट्य भरलेल्या या काळाचे स्क्रोलऐवजी सेल्युलॉइड किंवा डिजिटल स्वरूपातील दस्तावेजीकरण पाहणे, हे निश्चितच अनुभाव्य असेल. तसे झाल्यास अॅन इनसिग्निफिकंट मॅनच्या सिक्वेलची वाट पाहणाऱ्यांमध्ये मीही असेन.

2 comments:

  1. On your recommendation I watched this documentary, knowing it was underrated and realizing that it was different. Deciphering it would have been impossible without this review. 'Significane of an informed analysis' 😊👍

    ReplyDelete