Wednesday, July 8, 2015

वय झालं!!

बादल सरकारांच्या कुठल्याशा नाटकामधला एक डायलॉग आहे, सातच्या पाढ्यातील वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं आयुष्य एका निर्णायक अवस्थेवर येऊन पोहोचतं. त्यामुळे सात या अंकाला आपल्या वयाच्या लेखी फार महत्त्व आहे.अर्थात, या वाक्याला त्या नाटकात विशिष्ट संदर्भ, पार्श्वभूमी वगैरे असणार. पण, स्वतःचा अठ्ठाविसावा (सातचा पाढा मला पाठ आहे.) वाढदिवस सरताना मला प्रकर्षाने या वाक्याची आठवण झाली.
वय हे वाढतच असतं. त्यात नकारात्मक, निराशावादी किंवा नाकारण्यासारखं काहीच नाही. पण, मराठीत ज्याला ‘वयात येणं’ आणि ‘वय होणं’ म्हणतात, या दोन्ही मोठ्या गमतीशीर भानगडी आहेत. कारण, त्या नेमक्या कुठल्या वेळी झालेल्या योग्य आणि कुठल्या वेळी अयोग्य, या विषयी कोणतीच स्पष्टता नाही. किंबहुना दुसऱ्यांनी केलेल्या शेरेबाजीमुळेच या दोन्ही गोष्टींकडे आपले लक्ष जाते.  पण हे आपलं आपल्यालाच समजत जाणंही तितकंच एंजॉयेबल आहे, निदान वय होण्याच्या बाबतीत तरी. याचा प्रत्यय मला या वाढदिवसाच्या निमित्ताने आला. 
म्हणजे, रात्री बाराच्या ठोक्याला येणारे मेसेज हळुहळू घटत जातात. (मध्यरात्री केक घेऊन दरवाजा ठोठावणाऱ्यांची पिढी तर आपण केव्हाच ओलांडलेली असते.) मग दुसऱ्या दिवशी अनेकजण आवर्जून फोन करतात, फेसबुकवर शुभेच्छा देतात, चॅट करतात. यातल्या कित्येकांशी आपण कित्येक दिवसांत (खरंतर मागच्या वाढदिवसानंतर) बोललेलोही नसतो. पण, त्याविषयी कोणीही तक्रारीचा सूर काढत नाही. एरवी वर्षभर  तिरकसपणात बुद्धिबळातल्या उंटाशी स्पर्धा करणारे या दिवशी मात्र सरळसोट शुभेच्छा देऊन मोकळे होतात. प्रत्येकजण जणू आपल्याला बरं वाटावं, म्हणून आपल्यापरीनं धडपडत असतो आणि आपल्यालाही एका दिवसापुरतं तरी जगाने आपल्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे”, हा अटिट्यूडऐवजी या सगळ्यांविषयी कृतज्ञता वाटायला लागते. 
बहुदा कोणीही पार्टी मागत नाही आणि मागणाऱ्यांना ती नंतर कधीतरी दिली, तरी चालणार असतं. काय आजचा प्लॅन, असं विचारणाऱ्यांना काही विशेष नाही”, या उत्तराची चिंता वाटणं बंद होतं. थोडक्यात, हे असंच चालायचं हे सगळ्यांनी मनोमन स्वीकारलेलं असावं. काहीच प्लॅन नसल्याने सुट्टी घेण्यात काहीच अर्थ नसतो. मग, नेहमीचाच रुटिन दिवस येतो, आपापली कामं आटोपतो आणि जाता जाता आपल्याला एका वर्षाने मोठं करून निघून जातो. जग  आपापल्या धांदलीत असतं, प्रत्यक्ष भेटण्यासाठी लोकांकडे वेळ, आवश्यक उत्साह असेलच असं नाही, या समजुती पटू लागतात. अचानक काहीही घडणार नाही हे सहजपणे मान्य होतं. व्यक्तिमत्वातील एक्सटेंपोरची जागा एकप्रकारचा ठेहराव घेतो. तरुण असण्याचा अट्टहास प्रयत्न न करता सुटतो.

सांगायचा मुद्दा हा की कित्येक वर्षांनी, या वाढदिवशी मी कोल्हापुरात होतो. नॉस्टेल्जियाला खतपाणी घालणारे वातावरण. त्यात अनायसे सुट्टी. या इतक्या योगायोगांनंतरही ढोबळपणे ज्याला एक्सायटिंगम्हणतात, असं दिवसभरात काहीही घडलं नाही, आणि तरीही हिरमोड नाही झाला. प्लॅन काही नव्हताच, कोणी भेटण्याचीही शक्यता नव्हती. त्यामुळे वेळच वेळ. मग, पुस्तकं वाचून झाली, आठवलेली गाणी ऐकून झाली, कविता म्हणून झाल्या, आलटून-पालटून चहा-कॉफी पिऊन झाली, चॅटही केलं काही वेळ...आणि अक्षरशः मजेत गेला दिवस. इतके दिवस वाढदिवशी बोअरिंग म्हणून हिणवलेल्या सगळ्या गोष्टी स्वतः करताना मात्र आनंद देऊन गेल्या. कदाचित हे असं वर्षभर हळुहळू घडतच असावं. पण, वाढदिवसाच्या औचित्यामुळे ठळकपणे जाणवलं इतकंच. लंच बॉक्समध्ये कसं इरफानला एका क्षणात आपण आजोबांच्या वयाचे झाल्यासारखं वाटतं, तस्सं. आता पुढचा वाढदिवस किंवा फॉर दॅट मॅटर कोणताही दिवस असाच असेल, असं काही सांगता येत नाही. पण, असाच असला तरी काही हरकत नाही. आता बदलांना मन चटावलेलं नाही. झाले तर ठीक, नाही झाले तरी ठीक. ही स्वीकारार्हता म्हणजेच वय झाल्याची एक सन्मानपूर्वक भेट असावी. या भेटीसह या टप्प्यावर येणाऱ्या अनुभवांसाठी मी उत्सुक आहे.

 

No comments:

Post a Comment