केके जाऊन आज बरोबर आठवडा झाला. ऐन रखरखीत उन्हाळ्यात तापत ठेवून केके गेला, आणि तो दाह शांतावणाऱ्या सरी अजूनही बरसलेल्या नाहीत. एखादं अनोळखी गाणं प्रथमच कानी पडल्यावर हमखास त्याचा गायक ओळखता येईल, असा आणखी एक आवाज कमी झाला; आणि त्या आवाजाची अनोळखी गाणी यापुढे अशीच कानावर पडण्याची शक्यताही. केकेच्या जाण्याच्या बातमीच्या धक्क्याइतकाच त्या बातमीतील त्याच्या वयाचा उल्लेखही धक्कादायक होता. केकेचं वय 53 वर्षे होतं, हे पटूच शकत नाही. आपल्यासारख्या कित्येकांसाठी तो सदैव विशी-तिशीतलाच राहिला. किंबहुना, आजही स्वतःला तरुण समजण्यासाठी आपण मनात गिरवत असलेल्या मापदंडांमध्ये (पॅरामीटर्स) ‘केकेच्या गाण्यांची पडणारी भुरळ’ ही अढळस्थान पटकावून आहे.
गेल्या आठवड्याभरात केकेविषयी वाचत असताना एके ठिकाणी केकेच्या गायनात हिंदी चित्रपटसृष्टीतील अगोदरच्या कुठल्याही गायकाचे हिस्टॉरिकल ट्रेसेस सापडत नसल्याचे विधान होते. हे मान्य किंवा अमान्य करण्याइतका काही व्यासंग नाही. मात्र, हेच विधान जर थोडसं फिरवलं आपल्या वैयक्तिक हिस्ट्रीमध्ये केकेचे ट्रेसेस जागोजागी, अगदी चित्रपटगीतांपलीकडेही सापडतील. कधी तो ‘अपडी पोडे’ म्हणत आपल्या जल्लोषी नाचण्यात सहभागी झालेला असतो, तर कधी ‘जब घर की रौनक बढानी हो’ म्हणत आपल्याला नेरोलॅकची जाहिरात गुणगुणायला लावत असतो.
आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींसाठी तर केकेचा परिचय हा ‘तडप तडप’च्याही थोडा अगोदरचा आहे. 1999 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा त्यावेळचा प्रमुख प्रायोजक असलेल्या हिरो होंडाने केकेच्या आवाजात ‘जोश ऑफ इंडिया’ हे थीम साँग तयार केलं होतं. एकतर शाळेच्या उन्हाळी सुट्टीतला वर्ल्ड कप आणि त्यात त्याचं असं जोशपूर्ण थीम साँग वगैरे... ते गाणं तर तोंडपाठ होतंच, पण त्यातल्या कुठल्या पंक्तीला कुठला खेळाडू हातात भारताचा झेंडा धरून दिसणार आहे, हे आजही थोड्याफार फरकाने लक्षात आहे. त्या गाण्यामध्ये केकेचं पहिलं दर्शन, श्रवण झालं, तेव्हा अर्थातच एखाद्या गायकाचं गारूड होण्याचं वय नव्हतं. नंतरच्या काळातही केकेला कधी कवटाळून बसल्याचं आठवत नाही. ‘आवडता प्राणी’, ‘आवडते लेखक’च्या धर्तीवर ‘आवडता गायक’ हा निबंध अभ्यासक्रमात कधीच आला नसल्यामुळे सुदैवाने तो चॉइस करावा लागला नाही. पण, पसंतीच्या काही आघाडीच्या आवाजांमध्ये एक केकेचा नेहमीच होता, आहे. त्याच्या ‘बंदा ये बिन्दास है’चा अवखळपणा आहे, ‘कोई कहे, कहता रहे’चा उत्साही आत्मविश्वास आहे, ‘आवारापन’ची विमनस्कता आहे, ‘जिना क्या जीवन से हारके’चा निर्धार आहे, ‘ले चले’चा आधार आहे, ‘आशांए खिले दिल की’चा आशावाद आहे, 'आंखोमे तेरी'ची स्वप्नील तरलता आहे... आणखीही असं बरंच काही आहे.
केकेने गायलेल्या गाण्यांची हीच तर खासियत आहे. त्यातल्या अनेक गाण्यांची ना व्हिज्युअल्स माहीत आहेत, ना ती ज्यांच्यावर चित्रित झालीएत, ते नायक-नायिका. बरेचदा तर ते चित्रपटही पाहिलेले नाहीएत. त्या अर्थाने प्रसिद्ध होण्यासाठी कधीही दृक् माध्यमांचा टेकू घ्यावा न लागलेल्या मोजक्या गायकांपैकी केके हा एक होता. उलटपक्षी, त्याच्याच गायकीने इम्रान हाश्मीला करियरच्या पहिल्या दशकात बऱ्यापैकी हात दिलाय. (यात त्याच्यासोबत आतिफ अस्लम आणि काहीअंशी कुणाल गांजावालाही आहेत.) आपल्या मनात चिरंतन घर करून राहिलेत, ते केकेच्या गाण्यातले मूड्स. आणि ते इतके स्ट्राँग आहेत की आजही ते गाणं ऐकलं, तरी नकळत ते मूड्स आपला ताबा घेतात. पटत नसेल, तर आत्ताच्या आता हे वाचणं थांबवा आणि ‘याद आएंगे ये पल’ लावून बघा, सहा मिनिटे चार सेकंदांनी काय होतं ते.
नॉस्टॅल्जियासाठी मराठीमध्ये स्मरणरमणीयता आणि गतकातरता असे दोन प्रतिशब्द वापरता येतात. केकेच्या गायनात मात्र, या दोन्ही शब्दांचा अर्क ओतप्रोत उतरलाय. नव्वदच्या दशकामध्ये हिंदी चित्रपट संगीतात जे स्थान उदित नारायण आणि कुमार सानूचे होते, तेच स्थान 2000 च्या दशकामध्ये केके आणि शानने कमावले होते. अपवाद वगळता कोणताही चांगला अल्बम त्यांच्या गाण्याशिवाय पूर्ण व्हायचा नाही. केकेचा आवाज आणि त्या आवाजात गाणं म्हणणारा नायक हे दोन्ही शहरी आहेत. त्यांची हिंदी प्रमाण आहे आणि तिला असलीच तर थोडीशी इंग्रजीची झाक आहे. केकेचं एखादं पंजाबी धाटणीचं, ग्रामीण बाजाचं किंवा भोजपुरी, अवधी, हरियाणवी तत्सम कुठलाही लहेजा असणारं गाणं पटकन आठवतंय? तसेच, डोक्याला ताण देऊनही त्याचं इतिहासकालीन किंवा विद्रोही गाणंसुद्धा समोर येत नाही. याअर्थी, केकेचा आवाज culture-neutral होता; वर्तमानकालीन, पोस्टमॉडर्न होता; बॅगेजेस कॅरी न करणारा, मोकळा होता. आपल्याशी त्याचा सहजासहजी कनेक्ट जुळण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. मग, आता याला कोणी जर पलायनवादी, पठडीबाज वगैरे लेबलं लावत असेल, तर go ahead, who cares?
केके त्या काळाचं, त्या atmosphereचं प्रॉडक्ट आहे. त्याच्याकडे असं आयसोलेशनमध्ये नाही पाहता येत. म्हणजे, केकेची संपूर्ण कारकीर्द घडणे आणि त्यावेळी ऐकायला आपले कान उपलब्ध, आसुसलेले असणे, हा एकीकडे योगायोग असला, तरी it’s a part of the larger picture. ग्लोबलायझेशनच्या पहिल्या दशकामध्ये भारतात जे काही घडलं, त्याची फळं दुसऱ्या दशकात अलगद आपल्या झोळीत येऊन पडली. केकेही त्याचीच देन आहे. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये भारतात जी प्रायव्हेट टीव्ही चॅनेल्स वाढली, त्यामध्ये म्युझिक चॅनेल्सची संख्या लक्षणीय होती. त्यांचा टार्गेटेड ऑडिअन्स आणि त्यांना अॅड रेव्हेन्यू पुरवणाऱ्या जाहिरातदारांचा टार्गेटेड कंझ्युमर हा अर्थातच युवावर्ग होता. चित्रपट संगीताचा पुरवठा या चॅनेलची भूक भागवण्यास पुरा पडत नव्हता. दुसरीकडे कॅसेट्ससोबत ध्वनीमुद्रणविश्वात सीडी हे नवं प्रकरण दाखल झालं होतं आणि त्याच्या भविष्यातील व्यावसायिक शक्यता लक्षात घेता म्युझिक रेकॉर्डिंग कंपन्यांनाही विस्ताराची आस होतीच. याच दशकाच्या अखेरीस भारतात खासगी रेडिओ एफएम वाहिन्यांना परवानगी मिळाली. अवघ्या काही वर्षांमध्ये भारतीय पॉप संगीताची वेगाने भरभराट होण्यामागे ही सर्व पार्श्वभूमी होती. त्यानिमित्ताने, आशा भोसले, सुलतान खान, हरिहरन, शुभा मुदगल यांसारख्या प्रस्थापितांबरोबरच लेस्ले ल्युइस, शंकर-एहसान-लॉय, केके, मोहित चौहान, शान, सलीम-सुलेमान यांसारख्या उदयोन्मुख टॅलेंटना हे नवे अवकाश उपलब्ध झाले. त्यातले सकस होते, ते टिकले, कालांतराने त्यांचा प्रवेश हिंदी चित्रपट संगीतामध्येही झाला.
भारतातील बाजारपेठेचाही विस्तार याला समांतर होता. उत्पादनं वाढत होती, तशीच उत्पादनांची जाहिरात करण्याची गरजही. अॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग या विभागांचे महत्त्व, बजेट वाढत होते आणि त्याची परिणती भारतामधील सर्वच माध्यमांतील जाहिरातींचा चेहेरामोहरा आमुलाग्र बदलण्यात झाली. भारतीय टीव्हीवरच्या त्या दशकाच्या सुरुवातीच्या आणि अखेरच्या जाहिराती पाहिल्यास निर्मितीमूल्यांमधील हा फरक ठळकपणे जाणवतो. ‘अॅड जिंगल्स’ हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक होता. टीव्हीवरसुद्धा सीरियल्स वाढत गेल्या, तसे त्यांचे टायटल ट्रॅक गाणारे गायक-गायिकाही. या सगळ्यात केके at the right time, at the right place होता, म्हणून बरं. तो तसा नसता तर आपल्याला ‘जस्ट मोहोब्बत’चं ‘चिन चिनाके बबला बू’ आणि ‘हिप हिप हुर्रे’चं शीर्षक गीत मिळाले नसते.
या सगळ्याचा एक पैलू तंत्रज्ञानाचाही आहे. रेकॉर्डिंग तंत्रज्ञानामध्ये अॅनालॉग टू डिजिटल, मॅन्युअल टू अॅटोमेटेड हे स्थित्यंतर घडले. त्याजोडीला, साउंड मिक्सिंग, इन्स्ट्रूमेंटेशन (पंचमदांनी ‘सत्ते पे सत्ता’मध्ये बॅकग्राउंड स्कोअरसाठी चक्क गुळण्यांचा आवाज वापरला होता किंवा ‘सामने ये कौन आया’मधील तालासाठी मडक्यावर चामडं घट्ट बांधलं होतं, तशाप्रकारच्या सगळ्या गरजा आता तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण होऊ शकणार होत्या), व्हॉइस फिल्टर्स (गायक नसणाऱ्या अभिनेत्यांनी गाणी म्हणण्याचा ट्रेंडही याच काळात वाढीस लागला) आदी अंगांबाबतही बरीच प्रगती झाली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम संगीताची ‘टोनॅलिटी’ बदलण्यावर झाला. नव्या सहस्रकाच्या अलीकडे-पलीकडे चित्रपटसृष्टीत दाखल झालेले इस्माइल दरबार, विशाल-शेखर, सलीम-सुलेमान, प्रीतम (पूर्वाश्रमीचे जीत-प्रीतम) आदी संगीतकार आणि नवे अल्बम्स, लाइव्ह परफॉर्म करणारे पॉप म्युझिक बँड (यात केके-लेस्लेचा ‘पल’ आलाच) यांचे संगीत हे या नव्या ‘टोनॅलिटी’चा परिपाक होते. मल्टिप्लेक्सच्या उदयासह आलेल्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आपल्या नव्या चित्रपटांसाठी या संगीतकारांना नवीन ‘साउंड’ निर्माण करण्याच्या सिच्युएशन्स दिल्या. प्रत्येक दशकात स्वतःला जणू ‘रिबूट’ करून अधिकच अद्ययावत होणाऱ्या गुलजार, जावेद अख्तर यांच्यासह इर्शाद कामिल, अन्विता दत्त, स्वानंद किरकिरे, कुमार यांनी त्यांना शब्द पुरवले आणि केकेसारख्या काहींनी स्वरसाज.
तंत्रज्ञान हे काही फक्त निर्मितीच्याच स्तरावर बदललं नव्हतं. आमचं केकेशी नातं जुळलं, तेव्हा ‘लूपवर ऐकणं/बघणं’ ही संज्ञा प्रचलित व्हायची होती अजून. एखादं गाणं पुन्हा ऐकायचं असल्यास कॅसेट रिवाइंड करावी लागायची आणि बघायचं असल्यास टीव्हीवर ते पुन्हा लागेल, या अपेक्षेने मधला वेळ चॅनेल सर्फिंग करत टीव्ही पाहात बसावं लागायचं. अंगावरील सॅटिन शर्टच्या मॅचिंग रंगाचा बॅकग्राउंड आणि हातातून तोच रंग सोडत असलेल्या केकेच्या ‘यारों’सारख्या गाण्यांचे व्हिडिओ आम्ही असल्या ‘लूप’वर कितीवेळा बघितलेत, त्याचे केविलवाणे पुरावे आमच्या त्या त्या वर्षीच्या प्रगतिपुस्तकांत आजही दफन आहेत.
मग एपी-3, एमपी-5 आल्या आणि एकाचवेळी वीस-पंचवीस अल्बमची गाणी ऐकण्याची सोय झाली. उगाच ‘ए’ आणि ‘बी’ साइडला दोन वेगवेगळ्या चित्रपटांची निवडक गाणी असणाऱ्या कॅसेट्समधून आपल्याला हवं ते कॉम्बिनेशन शोधण्याची आणि त्यात हवी ती गाणी आहेत का, हे तपासण्याची गरज उरली नाही. मग आपापले लॅपटॉप आले. एक फोल्डर फक्त गाण्यांसाठी ठेवता यायला लागला. कानात इअरप्लग घालून मोबाइलवर जाता-येता रेडिओ ऐकता येऊ लागला. काही वर्षांनी तर, मेमरी कार्ड स्लॉटही आला. एव्हाना इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध झाली होती. मग, यू ट्युबवर हवे ते व्हिडिओही पाहिजे तेव्हा पाहताही येऊ लागले. स्मार्टफोन, फ्री डेटा आणि ‘गाना’, ‘सावन’, ‘स्पॉटिफाय’ इत्यादी अॅपनी तर या सगळ्याचीच गरज संपवली.
गेलं दशक मागणी-पुरवठ्याचा इम्बॅलन्सचं होतं. इतकं काही, इतक्या वेगाने कानावरून झपकन जात होतं की रवंथ करण्याची सवय मागे पडली. एखादं गाणं आवडलंय, पुढचे काही आठवडे तुमचंच होऊन राहिलंय, वास्तव आयुष्यात तसा काही अनुभव आला की आपसूक तेच गाणं तुमच्या ओठांवर-मनात येतंय, तुम्ही इतरांना ते ऐकण्याची शिफारस करताय, त्यांचे अभिप्राय विचारताय, असं झालंच नाही अलीकडे. गाणी बनवणारे संगीतकार, लिहिणारे गीतकार हे माहीतच नसतात. अरिजित, पॅपॉन, श्रेया, सुनिधीसारखे अपवाद वगळल्यास गायक-गायिकांची नावंही नाही ओळखता येत आणि त्याचा कमीपणा वाटणंही बंद झालंय. सचेत-परंपरा ही दोन वेगवेगळी माणसं आहेत आणि अर्को प्राव्हो मुखर्जी हे एकाच माणसाचं नाव आहे, हे मी अजून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
केकेची गाणी कमी होत जाणं हेसुद्धा याचाच एक भाग असावं, कदाचित. अचानक कधी तो ‘पिया आए ना’ किंवा ‘तू जो मिला’द्वारे भेटायचा, तेव्हा वाटायचं ‘अरे कुठे असतोस मित्रा हल्ली? किती दिवसांनी येतोयस? कसं चाललंय तुझं?’ त्यालाही काही वर्षं उलटून गेली, हे आता कळतंय. कधीतरी, अगोदरचा आठवडा धावपळीचा गेला असेल, मनासारखा गेला नसेल, तर ‘वीकली ऑफ’ला (आमच्या नोकरीत हॉलिडे नसायचा. आठवड्यातल्या ज्या दिवशी सुट्टी तो वीकली ऑफ) कुठलाही प्लॅन न ठरवता घरीच बसावं, विनॅम्प प्लेअरवर आपल्या आवडत्या गाण्यांची लांबलचक प्ले-लिस्ट सेट करावी, आलटून-पालटून चहा-कॉफीचे कप, मग संपवावेत आणि कपड्यांना घड्या घालणे, नखं कापण्यासारखी फुटकळ कामं सोडून दुसरं काही करू नये. अशा माहोलमध्ये जेव्हा बऱ्याच वेळाने ‘अलविदा’ किंवा ‘हम तो हारे, माहिया रे’ गाताना केकेचा सूर टिपेला पोहोचतो आणि तिथून पुन्हा समेवर येतो ना, तेव्हा काय होतं, ते असं सांगता नाही येत. तशी एक्स्प्रेशन फेसबुकच्या ‘हॅपिनेस इज...’ या डुडललाही नाही शोधता आलेली. इथून पुढे त्या तृप्तीला एक बोचरी किनार असेल मात्र.
केकेबाबत आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे केकेविषयी त्याच्या गायकीपलीकडे निदान मला तरी काहीही माहीत नव्हतं. सुरुवातीच्या काळातील कॅसेटच्या रॅपरवर त्याचा उल्लेख कृष्णकुमार असा होता आणि मी केके हे याच नावाचे संक्षिप्त रूप मानलं होतं. त्याचं आडनाव कुन्नथ असल्याचं मला थेट आता समजतंय. पण, ते कपूर, कनोजिया किंवा कांत आहे, असं समजलं असतं, तरी त्याचं आश्चर्य वाटलं नसतं, इतका केके गायनापलीकडील व्यक्ती म्हणून अपरिचित होता. त्याच्याविषयी कधी कुठले वाद झाले नाहीत, त्याने अवॉर्ड फंक्शनबद्दल नापसंती व्यक्त केली नाही, नेपोटिझम, ग्रुपिझमबद्दल मतं मांडली नाहीत, वादग्रस्त ट्विट केली नाहीत की मजेशीर रील्स केली नाहीत. त्याचा ना एअरपोर्ट लूक प्रसिद्ध झाला, ना त्याने अभिनय केला, ना नृत्य. ना तो बिग बॉससारख्या शोमध्ये कधी कंटेस्टंट बनला, ना नंतर फक्त मीम्स म्हणूनच वापर होण्यासारख्या एक्स्प्रेशन देणारा ‘रिअलिटी शो’मधला जज. आजकालच्या प्रसिद्धीलोलूप वातावरणात आणि या वातावरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या इंडस्ट्रीमध्ये वावरतानाही त्याने ही प्रसिद्धीपराङमुखता कशी जमवली असेल, तोच जाणे. आपल्यासाठी केके फक्त त्याच गोष्टीमुळे आठवणीत राहणार आहे, ज्यासाठी त्याला आठवणीत ठेवलं जायला हवं – त्याचा आवाज. उद्या जगलो वाचलो, तर आपण त्रेपन्न वर्षांचे होऊ तेव्हाही आपल्या मनातल्या विशी-तिशीत केके तितक्याच तारुण्यासह गात असेल.
शेवटी, ‘दिल चाहता है’मध्ये सिद्धार्थ दीपाला सांगतो, ते तत्त्वज्ञान मान्य करावंच लागतं. कितीही गच्च मूठ आवळली, तरी बोटांच्या मधून रेती निसटून जाणारच असते. केकेबाबत तर ती मूठ कधी कोणी आवळलेलीही नव्हती. उघड्या तळव्यावर शिल्लक राहिलेल्या वाळूत आम्ही समाधान मानून घेत होतो. त्यामुळे ती आपसूक निसटून गेली नसतीच कधी. पण, ती जणू हातावर फट्कन मारून खाली पाडण्यात आली, भणाणत्या वाऱ्याने उडवून लावण्यात आली, क्षणार्धात नाहीशी करण्यात आली. आणि आता ना ती मूठ आवळण्याची संधी राहिली, ना नव्याने रेती वेचण्याची मुभा. केकेची जुनीच गाणी पुनःपुन्हा ऐकताना ही खंत कायम पोखरत राहील, एवढंच फक्त.
(छायाचित्र सौजन्य - वृत्तसंस्था)