Tuesday, December 11, 2018

आवडता साइडहिरो


काही गोष्टी सुरुवातीलाच मान्य करूया. लेट्स बी फ्रँक. गौतम गंभीर हा काही सर्वकालिक महान खेळाडूंच्या यादीतील फलंदाज नव्हे. त्याला कधीही कोणीफॅब्युलस फोर/फाइव्ह/अगणितसारख्या विशेषणांमध्ये गणले नाही. काही आत्यंतिक महत्त्वाचे सामने जिंकून देण्यात त्याचा वाटा असला, तरी संघाचा तारणहार म्हणून त्याच्याकडे कधीच पाहिले जात नव्हते. त्याच्या निवृत्तीची घोषणा ही केवळ एक औपचारिकता होती. तो भारतीय संघात परतणार नाही, हे २०१६ मध्येच कळून चुकले होते आणि मागच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या अपयशानंतर ज्याप्रकारे त्याने दिल्लीचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवून उर्वरित सामन्यांत खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावरून त्याच्या आयपीएल कारकिर्दीवरील पडदाही ठरलेला होता.
हां, आता इतके सगळे मान्य केल्यानंतरही गौतम गंभीरबद्दल सांगण्यासारखे काही उरते का? खचितच! कारण, सर्व मर्यादा जमेत धरूनही तो एक गुणवान फलंदाज होता. ही गुणवत्ता केवळ दोन वर्ल्ड कपचे अंतिम सामने जिंकून देण्यापपुरती मर्यादित नाही. हा लेख वृत्तपत्रासाठी नसल्याने येथे त्याची सरासरी (average), धावगती (strike rate) इत्यादी आकडेवारीमध्ये शक्यतो जाण्याचा प्रयत्न असेल. आणि तसेही, केवळ शतकांची संख्या, धावांचा चळत आणि विक्रमांच्या राशींकडे पाहून क्रिकेटपटूंची पारख करणाऱ्या चर्चेत गंभीरला अडकवूही नये. कारण, अशा चर्चेत खेळपट्टीवर टिकून राहणे, भागीदारी रचताना फॉर्ममध्ये असणाऱ्या भागीदाराला अधिकाधिक खेळू देणे, अगदी गोलंदाजांचा चांगला चेंडू सोडून देणे यांसारख्या, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टींना किंमत नसते. मग, फलंदाजीची शैली, फटक्यांमधील नजाकत वगैरे गोष्टी तर दूरच राहिल्या. नेमक्या याच गोष्टींमध्ये गंभीरची गुणवत्ता लपली आहे.
गंभीरने २००४ मध्ये भारतीय कसोटी संघाद्वारे पदार्पण केले, तोपर्यंत वीरेंद्र सेहवाग नावाचा घणाघात कसोटी सलामीवीर म्हणून प्रस्थापित झाला होता. मात्र, त्याचा साजेसा जोडीदार सापडत नव्हता. शिवसुंदर दासपासून आकाश चोप्रापर्यंत आणि संजय बांगरपासून वसिम जाफरपर्यंतचे पर्याय चाचपडून झाल्यानंतर काही सामने तर राहुल द्रविडला सलामीला येऊन ही उणीव भरून काढावी लागली होती. पुन्हा त्यामुळे मधली फळी उघड पडण्याचा संभाव्य धोका होताच. सचिनटेनिस एल्बोमुळे विश्रांती घेत असताना तर हा प्रश्न अधिकच गंभीर बनला.  सलामीवीराचा हा शोध शेवटी गंभीरवर येऊन थांबला. सौरव गांगुलीसारखा कर्णधार आणि जॉन राइटसारखा प्रशिक्षक असताना पदार्पण करण्याचे भाग्य गंभीरला लाभले आणि गंभीरने ही संधी वाया तर जाऊ दिली नाहीच, पण त्यापुढील सात-आठ वर्षे जबाबदारीने सांभाळली. एकीकडे सेहवागचा झंझावात सुरू असताना त्याच्यासोबत खेळपट्टीवर भक्कमपणे उभे राहणे, त्याला अधिकाधिक स्ट्राइक देण्याचे औदार्य दाखवणे, त्याच्याशी सातत्याने बोलून त्याला वाहावत जाऊ न देणे आणि दुसरीकडे सेहवाग कधीही बाद होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन डाव सावरण्याची तयारी ठेवणे, हे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. पण गंभीरने हे करून दाखवले. सांख्यिक पुरावाच हवा असेल, तर त्याने सेहवागसोबत ,४१२ धावा जोडल्या असून त्यामध्ये ११ शतकी २९ अर्धशतकी भागींचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावरील द्रविडबरोबरही त्याची ,५३० धावांची भागीदारी असून त्यामध्ये सात शतके अर्धशतके आहेत.


हा चिवटपणा गंभीरने पुढे कारकिर्दीत वेळोवेळी सिद्ध केला आणि तो मैदानाइतकाच मैदानाबाहेरही होता. चॅपेल काळाचा फटका इतर खेळाडूंप्रमाणेच गंभीरलाही बसला. २००६ २००७ या दोन वर्षांत मिळून तो केवळ एक कसोटी खेळला होता. मात्र, त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये त्याने ही उणीव भरून काढली. त्याच्या कारकिर्दीतील हीगोल्डन इयर्सम्हणता येतील. भारतीय कसोटी क्रिकेटच्या ८६ वर्षांच्या इतिहासात केवळ एकदाच दोन फलंदाजांना एकाच डावात द्विशतके झळकावता आली आहेत आणि त्यापैकी एक गंभीर आहे. (दुसरा व्हीव्हीएस लक्ष्मण. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००८ च्या दिल्ली कसोटीत गंभीरने २०६, तर लक्ष्मणने नाबाद २०० धावा केल्या आहेत.) ही लवचिकता वन-डेमध्ये सौरव गांगुली निवृत्त झाल्यानंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन दाखवली. वरकरणी हे त्यात काय एवढे? विधान वाटत असेल, तरसचिन किंवा सेहवाग बाद झाल्यानंतर त्याजागी फलंदाजी करायची’, असा विचार करून पाहावे. दोन वर्ल्ड कपचे विजेतेपद आणि कसोटी क्रमवारीतील भारताचे अग्रस्थान यामध्ये त्याचा सहभाग असणे, हा त्याच्या कारकिर्दीचा कळसाध्याय असला, तरी योगायोग निश्चितच नव्हता. 
या सर्व आलेखाची उतरती बाजू २०११ च्या उत्तरार्धापासून सुरू होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही दौऱ्यांवर आपण - असा सपाटून मार खाल्ला, त्यामध्ये गंभीरच्या अपयशाचाही वाटा होताच. इंग्लंड दौऱ्यात त्याला सहा डावांत मिळून १०२, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डावांत मिळून १८१ धावाच करता आल्या होत्या. हा भारतीय संघाच्या स्थित्यंतराचा आणि त्याहूनही जास्त उलथापालथीचा काळ होता. द्रविड, लक्ष्मण, सचिन यांसारखे खेळाडू निवृत्त होत होते. झहीर, हरभजन, सेहवाग, युवराज यांचे संघातील महत्त्व कमी होत होते किंवा केले जात होते. ज्या वरिष्ठ खेळाडूंचे कर्णधार धोनीसोबत पटत नसल्याची चर्चा आजही रंगते, त्यामध्ये हटकून गंभीरचेही नाव असायचे. त्याला कर्णधारपदाची महत्त्वाकांक्षा असल्याच्या वावड्याही उठत होत्या. एन. श्रीनिवासन या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्समध्येव्हाइस प्रेसिडेंटअसणारा धोनी हा या कंपनीकडेच मालकी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही कर्णधार होता. हळुहळू उपरोल्लेखित एक एक खेळाडू संघाबाहेर जाऊ लागला. अर्थात, त्यामुळे संघाच्या परदेशातील कामगिरीमध्ये फरक पडला नाहीच. २०१३ मध्ये गंभीर भारताकडून एकही कसोटी खेळला नव्हता. त्याने देशांतर्गत क्रिकेट आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणे मात्र सुरू ठेवले. दरम्यान, २०१२ २०१४ मध्ये आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्वही केले. परंतु, सुरेश रैना, अशोक डिंडा, मोहित शर्मा यांच्यासारख्यांच्या भारतीय संघातील समावेशासाठी बघितली जाणारी आयपीएल कामगिरी गंभीरच्या बाबतीत मात्रखासगी स्पर्धेतील कामगिरीहोती.
भारताच्या २०१३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी शिखर धवन फॉर्मात, तर मुरली विजय चेन्नई सुपर किंग्जमध्ये होता. सहाजिकच या दोघांच्या समावेशानंतर गंभीर भारतीय संघाबाहेर राहिला. या दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतसंघातील तिसरा सलामीवीर कोण?’ या प्रश्नावर धोनीने क्षणार्धातगौतम गंभीरहे दुर्मिळपॉलिटिकली इनकरेक्टउत्तर दिले होते. धोनीच्या या अप्रत्यक्ष सूचनेची दखल घेत निवड समितीने २०१४ इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीरचा समावेश केला खरा; परंतु हा दौराही गंभीरसाठी विस्मरणीयच होता. भारताने -ने गमावलेल्या या कसोटी मालिकेत चार डावांमध्ये मिळून २५ धावा करणाऱ्या गंभीरला आता बाहेरचा रस्ता दाखवणे सुकर बनले होते. स्वतः कर्णधार धोनीनेच त्यापुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या ऐन मध्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आपण पाचदिवसीय क्रिकेटबाबत किती गंभीर आहोत, हे सिद्ध केले होते. डंकन फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपत आला होता आणि कामगिरी संचालक (performance director) रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णधार विराट कोहलीच्या संघाचा प्रवास सुरू झाला होता. देशी खेळपट्ट्यांवर टँकरनी धावा ओतणाऱ्या करुण नायर व जयंत यादवसारखा प्रत्येकजणच या संघात नायक होता. ३८ कसोटींमध्ये एकदाही संघ कायम न ठेवणाऱ्या कॅप्टन कोहलीच्या या संघात गंभीरसारख्या मुरब्बी सहनायकासाठी आता स्थान नव्हते. ज्येष्ठांच्या निवृत्तीनंतर गंभीरने नायक बनण्याची गमावलेली संधी पुन्हा वळून त्याच्याकडे आलीच नाही. जितक्या शांततेत तो आला, तितक्याच शांततेत निघूनही गेला.
क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्याच्या नादात आयसीसीने मागच्या दशकभरात बदलेले नियम लक्षात घेतले, तर क्रिकेट अधिकाधिक फलंदाजीकेंद्री बनल्याचे लक्षात येईल. फक्त टी-२० किंवा वन-डे मध्येच नाही, तर कसोटीमध्येही याचे पडसाद जाणवतात. वेस्ट इंडिज, पाकिस्तान यांसारख्या भेदक गोलंदाजीवर अवलंबून असलेल्या संघांची आजची अवस्था पाहिली, तर हा मुद्दा पटेल. क्लासिकल क्रिकेटची प्रेक्षणीयता संपवणे हा या बदलांच्या सर्वांत विपरित साइड इफेक्ट्सपैकी एक आहे. क्रिकेट पाहण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही हे वाक्य केवळ इतिहास उगाळणारे नसून त्याला या धावांच्या बाजारातील धुपाटण्याच्या झोडपणीसमान फलंदाजीचीही किनार आहे. क्रिकेटशी संबंधित संपूर्ण अर्थकारणामध्ये अगदी लहानसा वाटा असणारे हे प्रेक्षक या बदलत्या परिस्थितीत कालबाह्य ठरतात. त्यांना कोणाचा विक्रम कोण आधी मोडतो, यात स्वारस्य नसते. चेतेश्वर पुजारा, केन विल्यमसनसारख्या एकट्या-दुकट्या फलंदाजांवर डोळे लावून बसलेले हे लोक लहर आली की यू-ट्यूबवर जुन्या सामन्यांचे व्हिडिओ बघून नॉस्टॅल्जिया आळवतात. या व्हिडिओंमध्ये गंभीरची नेपियर, वेलिंग्टनमधली शतके असतात आणि इतरांच्या शतकांवेळीही साथ द्यायला गंभीर असतोच.    
व्यक्तिशः मला आणि माझ्या एका जवळच्या मित्राला सहनायकांबाबत विशेष सॉफ्ट कॉर्नर’ आहे. चित्रपटात नायकासाठी सगळं काही करून बाजूला राहिलेली ही माणसे आवडून जातात. क्रिकेटमध्ये ही भूमिका गौतम गंभीरने कसोशीने निभावली. मैदानावर कितीही आक्रमक असला, तरी मैदानाबाहेर संपूर्ण कारकिर्दीत गंभीरने सभ्यता जपली होती. भारतीय संघातील वादाच्या नवनव्या बातम्या दररोज बाहेर येत असताना गंभीरने त्याविषयी अवाक्षरही उच्चारले नाही. अन्याय झाल्याच्या मुलाखती दिल्या नाहीत. ट्विटरवरची लोकप्रियता संघातील जुने गौप्यस्फोट करण्यासाठी वापरली नाही. शेन वॉटसन, शाहीद आफ्रिदी यांसारख्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी झालेला वादही त्याने मैदानावरच सोडला. आयपीएलमधील विराट वाद ज्या वेगाने व्हायरल झाला, तितका श्रीलंकेविरुद्धच्या २००९ च्या सामन्याचा प्रेझेंटेशन व्हिडिओ झाला नाही. गंभीरने नाबाद १५० धावा फटकावलेल्या या सामन्यात विराटने आपले पहिलेवहिले शतक झळकावताना १०७ धावा केल्या होत्या. या व्हिडिओमध्ये सामनावीर म्हणून गंभीरचे नाव घेतले जाते, तेव्हा व्यासपीठावरून गंभीर हा पुरस्कार कोहलीला देण्याची विनंती करतो. हिरोची कामगिरी करूनही आपणहून साइडहिरोची भूमिका पत्करणारा हा माणूस कोणाला का आवडू नये?