जन्माला येण्याबाबत आपल्या काही अपेक्षा असू शकतात का?
जोडीदारासंबंधीच्या आपल्या अपेक्षा नक्की कशा पद्धतीच्या आहेत?
आपण तत्वनिष्ठ आहोत का?
आपले भाषेचे आकलन नेमके कितपत आहे?
आपल्याला कसा मृत्यू यावा/नको असे आपल्याला वाटते?
जगण्याविषयीच्या खोलीचा विचार आपण आहे का?
जगण्या-वागण्यातील परस्परविरोध, विसंगती, दांभिकता वगैरे अधोरेखित करण्यास
पुरेसे ठरावेत असे हे व यांसारखे काही प्रश्न. त्यामुळे, आयुष्यात या मूलभूत
प्रश्नांची दडपणूक सगळ्यांनाच सोयीची असते. पण, श्याम मनोहर यांना आपल्या लेखनातून
हे प्रश्न उकरून काढायचेत, (न आवडणारे प्रश्न विचारण्याबद्दल तर मनोहरांच्या
लेखनाची ख्यातीच आहे. आठवा – ‘इतकी काय आपण स्वभावाला किंमत देतो?’ – यकृत (बहुतेक),
किंवा ‘मला भाषेतील किती शब्द येतात?’
- कळ) ते स्वतःला विचारायला भाग पाडायचेय, त्यावरच्या
उत्तरांची शहानिशा करायचीय आणि खोट्या उत्तरांना उघडे पाडून त्यांच्यावर उपरोधिक
हसायचेय. मग उत्तरे शोधताना होणारे कन्फ्युजन, स्वतःची उत्तरेच बरोबर ठरवण्यासाठी
सामाजिक घडामोडींचा आधार घेत केलेले फसवे समर्थन, सत्य नाकारण्याची धडपड, बेगडी
वर्तन हे सर्व ओघाने आलेच. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या नाट्यशाखेने सादर
केलेला श्याम मनोहर यांच्या ‘शंभर मी’
या कादंबरीतील निवडक भागांवर आधारीत याच नावाचा दीर्घांक म्हणजे अशाच काही
प्रश्नांचा लेखाजोखा आहे.
‘शंभर मी’ हा दीर्घांक म्हणजे कादंबरीतील
निवडक उताऱ्यांचे रंगमंचीकरण आहे. प्रत्येक प्रवेश स्वतंत्र असल्याने दीर्घांकाला
बांधीव रचना नाही. पात्रांना (अपवाद वगळता) व्यक्तिरेखांचे मुखवटे नाहीत. दीर्घांकाची
सुरुवात जन्माला येण्यापूर्वींच्या जीवांना पडलेल्या प्रश्नांच्या प्रवेशातून
होते. जीवांना प्रश्न पडण्याच्या फँटसीमधून मी कोणत्या धर्मात, देशात जन्माला
येईन, माझे करियर काय असेल, माझी कौंटुबिक पार्श्वभूमी, सामाजिक परिस्थिती काय
असेल, याबाबतची रिअॅलिटी मांडण्यात आली आहे. त्यानंतरच्या प्रवेशांमध्ये
जोडीदाराविषयी अपेक्षा ठेवताना केवळ बाह्यरूपाचा केलेला विचार, अनुरूप मुलगी शोधताना
देशोदेशीचा विचार करूनही संख्यात्मकदृष्ट्या समाधान न होणे, तत्त्व जपणाऱ्या माणसाचे
काल्पनिक होत जाणे, समाजाचा कंटाळा येण्याचे प्रसंग, समाज म्हणजे नक्की कोण हा
प्रश्न, भाषा अवगत नसल्याने आर्थिक श्रीमंती असूनही भाषेची चैन करण्यात येणाऱ्या
मर्यादा, मृत्यूची मीमांसा इत्यादी प्रश्नांचा तिरकस उलगडा होत जातो. दीर्घांकाचा
शेवट हा जगण्याविषयीची खोली तपासण्याच्या आवाहनातून होतो. मृत्यूच्या प्रवेशानंतर ‘खोली’च्या प्रवेशाच्या मांडणीतून दीर्घांकाचा शेवट
करण्यात दिग्दर्शकाने स्वतःचे स्टेटमेंट केले आहे.
श्याम मनोहरांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य हे
स्वयंसिद्ध असते. म्हणजे या वाक्यांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी पार्श्वभूमी, संदर्भ
वगैरेंची गरज भासत नाही. या वाक्यांमध्ये उपजत नाट्यगुण आहेत. त्याचप्रमाणे ही
वाक्ये कोणीही उच्चारू शकेल, इतक्या स्वाभाविक प्रवृत्तीतून जन्माला येतात. दीर्घांकाचा
विचार करताना दिग्दर्शकासाठी ही जमेची बाजू आहे. कारण ही वाक्ये जशीच्या तशी
रंगमंचावर सादर होऊ शकतात. त्याचे वेगळे नाट्यरूपांतर वगैरे करावे लागत नाही.
(किंवहुना तसे ते करता येत नाही.) पण हे शस्त्र दुधारी आहे. त्यामुळे सोबत
येणाऱ्या काही मर्यादांचा विचारही दिग्दर्शकाला करावा लागतो. मुख्य म्हणजे ही
वाक्ये ही स्वतःच्या विचारातून आली असल्याने त्यांचे संवाद होऊ शकत नाहीत.
त्यामुळे रंगमंचावरील पात्रांना ती स्वगताच्या स्वरूपातच सादर करावी लागतात. दुसरे
म्हणजे रंगमंचावर वावरणारे प्रत्येक पात्र हे स्वगत बोलणार असल्याने सादरीकरणाच्या
शक्यतांना ही चौकट घालून घ्यावी लागते. त्यामुळे दीर्घांकाला विशिष्ट फॉर्म, रूढ चढ-उतार,
सुरुवात-मध्य-शेवट मिळत नाही.
दिग्दर्शक रोहित पाटील याने सादरीकरणाचे हे आव्हान बऱ्याचअंशी यशस्वीपणे पेलले
आहे. कादंबरीतील विविध उताऱ्यांची निवड करताना सादरीकरणामध्ये विशिष्ट लय साधली
जाईल, याचे भान बाळगण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रयोग काही लघुनाट्यांचे एकत्रित
सादरीकरण न वाटता दीर्घाकांचा अपेक्षित परिणाम साधण्यात यशस्वी होतो. यासाठी
दिग्दर्शकाने काही ठिकाणी रंगमंचीय अवकाशाबरोबरच प्रोजेक्शनचीही मदत घेतली आहे.
तथापि, केवळ विविध प्रवेशांची नावे झळकावण्याखेरीज प्रोजेक्शनचा फारसा वापर झालेला
दिसत नाही. किंबहुना प्रोजेक्शनच्या पडद्याने रंगमंचाचा बराचसा भाग व्यापल्यामुळे पात्रांच्या
काँपोझिशन्सवर मर्यादा येत असल्यासारखे वाटत होते.
अशाप्रकारच्या प्रयोगामध्ये कलाकारांवरील जबाबदारी वाढते. कारण, व्यक्तिरेखेचा
ग्राफ, इतर कलाकारांसोबत रंगणारा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ इत्यादींवर अवलंबून
राहता येत नाही आणि वाक्ये गोळीबंद असल्याने ‘पंच’ निसटणार नाही, याची सातत्याने काळजी
घ्यावी लागते. सहभागी सर्व कलाकारांनी उर्जा आणि आत्मविश्वासाने ही जबाबदारी सांभाळल्याचे
दिसत होते. विशेष उल्लेख करावा लागेल तो शरयू कुलकर्णी, केदार कुलकर्णी आणि नीरजा
अग्निहोत्री यांचा. या तिघांच्या वाट्याला आलेले प्रवेश त्यांनी एकहाती निभावून
नेले. (जन्म मिळण्यापूर्वीच्या जीवाच्या प्रसंगात अभिनेत्यांनी 'लाउड' न होण्याकडे
लक्ष देण्याची गरज आहे.)
प्रयोगासाठी वापरलेले नेपथ्य प्रतीकात्मक आहे आणि काही ठिकाणी साउंड
इफेक्ट्सद्वारे नेपथ्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. दीर्घांकाच्या जातकुळीला
हे नेपथ्य पूरक आहे. तीच बाब शीतल पाटील यांच्या वेशभूषेची. अखेरच्या प्रवेशात
समोरासमोर येताना ‘खोली’च्या वेशभूषेसाठी काळ्या आणि माणसाच्या वेशभूषेसाठी
पांढऱ्या रंगाचा त्यांनी केलेला वापर परिणामकारक आहे. प्रकाशयोजना आणि संगीताच्या
पातळीवर मात्र प्रयोग कमकुवत वाटतो. रंगमंचाच्या मागच्या भागातील पात्रांच्या
चेहऱ्यापुरताही प्रकाश अपुरा पडत असेल आणि पुढच्या भागातील पात्रांच्या 'आय शॅडो' दिसत असतील, तर त्याबाबत गांभीर्याने विचार होण्याची
गरज आहे. संगीताचा वापरही अधिक कल्पकतेने, वैविध्यपूर्ण आणि ठाशीवपणे करता येईल.
मनोहर
यांच्या नाटकांप्रमाणेच त्यांचे अन्य लेखनही रंगकर्मींना वारंवार खुणावत आले आहे. त्यांच्या
लेखनातील प्रयोगक्षमतेशी रंगमंचावर खेळून पाहण्याचा प्रयत्न देवल क्लबने यापूर्वी ‘कळ’ कादंबरीवर आधारीत ‘अंधारात
मठ्ठ काळा बैल’ या दीर्घांकामधून केला होता. ‘शंभर मी’ हा याच वाटेवरील पुढचा टप्पा ठरू पाहतोय.(फोटो सौजन्य - केदार कुलकर्णी)