Monday, June 30, 2014

व्हिज्युअल्स

 सूर्य मावळल्यानंतरचा काही काळ भवतालावर दाटून राहिलेला संधिप्रकाश आता हळुहळू विरत चाललाय. कंप्युटर शटडाऊन करताना रंग उडत जाणाऱ्या वॉलपेपरप्रमाणे आकाशाच्या कॅनव्हासने निळ्यावरून राखाडी आणि राखाडीवरून डार्कनेसच्या दिशेने प्रवास सुरू केलाय. ढगांच्या गडद झालेल्या आउटलाइन्स त्या डार्कनेसमध्ये हरवून जाण्याच्या तयारीत....आणि या डार्कनेसच्या बॅकड्रॉपखाली एक शहर आकार घेतंय. संपूर्णतः कृत्रिम प्रकाशांनी उजळून निघतंय...
प्रकाशाचे नानाविध स्रोत, इटेंन्सिटीज. रंगांच्या अगणित शेड्स, टेक्श्चर्स. एखाद्या उंच मनोऱ्यावरून पाहिल्यास म्यूट केलेल्या टी.व्ही.सारख्या दिसणाऱ्या प्रकाशमान मूक हालचाली... आणि त्या हालचालींना नेपथ्य पुरवणारी काही ठिकाणे.
रस्ते. प्रकाशाने गजबजलेले. स्ट्रीटलाइट्सच्या पिवळ्या, हायमास्टच्या पांढऱ्या, सिग्नल्सच्या तिरंगी, कार्सच्या भगभगीत आणि टू-व्हिलर्सच्या शोधक प्रकाशाने. अंधाऱ्या बसस्टॉपवर तिष्ठणारी अनोळखी गर्दी बसमध्ये कोंबल्याकोंबल्या ‘एक्सपोज’ करणारे दिवे. सामान्य दृष्टीच्या कितीतरी उंचावर लटकावूनही हवे तिथे नेमके लक्ष वेधणारे होर्डिंग्जचे हॅलोजन्स. दुकानांच्या पाट्यांवरील कोपऱ्यातल्या मराठी नावाला दुर्लक्षून विविधरंगी इंग्लिश अक्षरे झळकावणारे निऑन साइन्स. दिवे. टपऱ्यांवरील मिणमिणते, रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवाल्याचे भाजीपुरते आणि रस्त्यावरून हिंडणाऱ्या मोबाइल्सचे चेहेऱ्यापुरते. चौकात एका बाजूला अंग चोरून उभारलेल्या काळ्या पुतळ्यावरील पांढरे डाग अधोरेखित करणारे. फ्लायओव्हरला दिपवणारे. खोक्यातले कपडेही खपवणारे. रस्त्याच्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यातील प्रतिबिंबांमध्ये उमटणारे आभासी.

प्रार्थनास्थळे. दीपोत्कारी. रंगांची रेलचेल. दगडांपासून वैविध्य (किंवा भेदभाव?). शुभ्र संगमरवराचे वर्चस्व. देवळांच्या इंटेरियरमध्ये, मशिदींच्या इंटिरियर व एक्सटिरियरमध्ये. गुरुद्वाऱ्याच्या फ्लोअरिंगपासून तख्तापर्यंत. इटालियन मार्बलच्या कोंदणात ग्रामदैवते. त्याखालोखाल ग्रीन मार्बल. मग ग्रॅनाइट, काळा आणि लाल. त्याशिवाय लाल चिऱ्यांमधले सिनेगॉग. पिवळ्या लाइमस्टोनमधील नाजूक जैन मंदिरे. कभिन्न कातळात घडवलेली देवळे. मशिदीच्या भोवताली वेढलेला हिरवा. चर्चमधून डोकावणारा पिवळसर. अग्यारीचा शुभ्र. भगव्या उपरण्यांच्या काठांचा सोनेरी. ताम्हणांचा तांबूस, अंगाऱ्याचा राखाडी. एकाचवेळी लवणाऱ्या टोप्यांचा सफेद, वेढून टाकणाऱ्या धुपाऱ्यांचा धूरकट. मझारवर पांघरल्या जाणाऱ्या ‘चद्दरीं’च्या कडांचा गुलाबी. ख्रिस्तासमोरील बाकड्यांचा तपकिरी. मथ्था टेकणाऱ्या पगड्या, दुपट्ट्यांचे नानारंगी. रंग एकरूपतेत मिसळलेले. मिटलेल्या डोळ्यांचे, जोडलेल्या हातांचे, पुटपुटणाऱ्या ओठांचे, आर्जवी स्वरांचे, नतमस्तक भावाचे. दानपेटीत न टाकता वाचवलेल्या नोटा बाहेरील भिकाऱ्यांच्या वाडग्यात ठेवणाऱ्या दानतीचे.
बदनाम गल्ल्यांतला रंगेबिरंगी ‘शूकऽऽशूऽऽकाट’. ‘दिखता है वो बिकता है’च्या सूत्रावर आधारलेला रंगांचा बाजार. भडक ब्लाउज. मोठ्ठाल्या डिझाइन्सच्या साड्या. चेहेऱ्यावरचे डोळे आणि ओठ हे एलिमेंट ‘मेक-अप’नी हायलाइट केलेले. डल बॅकग्राउंड्स. मोडकळीस आलेल्या सायकली. भेसूर खोल्या. अंधाराची आस असणारा अपुरा, अपराधी प्रकाश. मळकट, मेणचट चादरी, अभ्रे. पोपडे उडालेल्या बेरंग भिंतींवर पानांच्या पिचकाऱ्यांचे सुकलेले शिंतोडे. रंग हरवलेले. सामुहिक हशांमधून, रोखठोक व्यवहारांमधून. तुटक संवादांमधून. रस्त्यांवर भेलकांडणाऱ्या अर्धवट पिकलेल्या दाढीच्या खुंटांमधून. एकमेव खुंटीला टांगलेल्या सर्व कपड्यांमधून. तांबरलेल्या खिडक्यांच्या गजांमधून. गिऱ्हाइक बसल्यावर उपड्या केल्या जाणाऱ्या देवांच्या फोटोंमधून. हासडल्या जाणाऱ्या शिव्यांमधून. दिल्या-घेतल्या जाणाऱ्या पैशांमधून. वाहणाऱ्या गटारांमधून, माड्यांवर कधीही किणकिणत फिरणाऱ्या चहाच्या ट्रेंमधून, प्रत्यक्ष क्रियेवेळीही टक्क उघड्या असणाऱ्या डोळ्यांमधून आणि बंद दारांच्या माथ्यावर कुंकवाप्रमाणे ठळकणाऱ्या लाल दिव्यांमधूनही!
पॉश मॉटेल्समधील चकचकीत ‘स्टुडिओ सूट’. हव्या त्या ‘माला’साठी बुकींग आवश्यक. ‘एस्कॉर्ट्स’ या उच्चभ्रू उपाधीला शोभेलसा डामडौल. जगभरातील वंश उपलब्ध. रंग चढवलेले. पोर्शमध्ये फवारणाऱ्या कारंजांवर. एस्केलेटर्स आणि पारदर्शक कॅप्सूल लिफ्ट्सवर. लॉबीतून पास होताना बघूनही न बघितल्यासारखे करणाऱ्या नजरांवर. इलेक्ट्रो-मॅग्नेटिक कार्ड इन्सर्ट केल्यानंतर उघडणाऱ्या दरवाजांवर. ग्लेझिंग बॅकलेस कॉर्सेटला मॅचिंग स्टिलेटोजवर. पर्समधून सतत काढल्या जाणाऱ्या मेक-अप किटवर. प्रयत्नपूर्वक उच्चारल्या जाणाऱ्या परदेशी अँक्सेंटच्या इंग्लिशवर. बर्फाने भरलेल्या बादलीत लपलेल्या शँपेनच्या बाटल्यांवर. स्वाइप केल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड्सवर. रिमोटने इंटेन्सिटी कंट्रोल करता येणाऱ्या सूदींग लाइट्सवर. बिछाना अपुरा पडेल इतक्या विविध आकाराच्या कुशन्सवर. शुभ्र टर्कीश बाथरोबवर. एसीच्या थंडगार हवेवर. वेळेचे बंधन नसल्याने सैलावलेल्या वातावरणावर आणि अख्ख्या काचेच्या भिंतीआडून दिसणाऱ्या चमचमत्या शहरावर.
उत्साहाला उधाण आलेल्या इमारती. डिस्कोथेक्स, मॉल्स, पब्ज, रेस्तराँ, लाउंजेस्. मॉल्सच्या बिलिंग काउंटरजवळ लागलेल्या रांगा. मूव्हेबल ट्रेमध्ये जागा पटकावण्यासाठी धडपडणाऱ्या एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या वस्तू. ऑफर्सची पॅम्प्लेट्स. बिलांच्या सुरनळ्या. माणसांना ‘कॉम्प्लेक्स’ देणारे शोरुमबाहेरील ‘स्टॅच्यू’.

पब्जच्या एंट्री पॉइंटवर मनगटावर उमटवण्यात येणारे शिक्के. दोन विश्व वेगळी करणारे साउंडप्रुफ दरवाजे. काळ्या कपड्यातील निर्विकार बाउन्सर्स, थ्री-पिसमधील अदबशीर बार बॉइज. उलटे टांगलेले आरस्पानी ग्लास. उंच पायांच्या खुर्च्या. मॉकटेल्सवरची रंगेबिरंगी छत्री. लिंबाच्या चकत्या. कुठल्यातरी स्प्रेने ओतली जाणारी स्पिरिट्स. फेसाचा बुडबुडाही न येऊ देता शिताफीने ग्लासमध्ये उतरणारी बियर. पाय ठेवताच उजळणाऱ्या डान्स फ्लोअर्सच्या टाइल्स. क्षणात अंगावरून पास ऑन होणारे लेझर लाइट्स. अंधारात चमकणाऱ्या टी-शर्टच्या रेडियम प्रिंट्स. सी-थ्रू टॉप्समधून डोकावणाऱ्या स्ट्रिप्स. बिट्सवर एकाचवेळी उंचावणारे हात. न जमणाऱ्या स्टेप्स. अनावधानाने (?) घासणारी अनोळखी शरीरे. बेभान. बेफाम.
मेणबत्त्यांना शरण आंदोलने. फलकावर लिहिलेली मोठ्या आकारातील आक्रमक अक्षरे.  एकमेकांचे हात धरून तयार केलेल्या साखळ्या. बॅरेकेड्सना आव्हान देणारे डोळे. रोजचेच झालंय म्हणून दुर्लक्ष करणारे कोपऱ्यात उभे ‘गणवेश’. साचेबद्ध आयुष्य सुबक चौकटीत बंद करून टाकणाऱ्या रेसिडेन्सिशियल अपार्टमेंट्स. दिवसभर आयुष्याला बांधलेले घड्याळ रात्रीही उतरवू न देणाऱ्या प्लाझ्मा टीव्हीच्या फ्लॅट स्क्रीन्स. फ्रिज व मायक्रोव्हेव हे दोनच लाइट्स ओळखणारे कसलेकी ‘फ्रेंडली’ कूकवेअर. लहानमोठ्या खिडक्यांमधून चाललेली दिव्यांची सिंक्रोनाइज्ड उघडझाप. गॅलऱ्यांच्या कठड्यांवर वाळणाऱ्या कपड्यांसोबत वाफाळणारे कॉफीचे मग. बंद दाराच्या चौकटीवरील नाद विसरलेले विंडचाइम.
आकृत्या. परतीच्या रुळांच्या सळसळत जाणाऱ्या लोखंडी समांतर रेषा. घाई झालेल्या वाहनांच्या हेडलाइट्स, टेललाइट्सचे एकमेकांना छेदणारे लाल-पिवळे प्रकाशकिरण. अंधाराला चिरत जमिनीकडून आकाशाकडे झेपावणारे मेगा इव्हेंट्सचे दंडगोलाकृती बीमलाइट्स. पानांच्या ठेल्यांवरील लख्ख पितळी गोलाकार. झेब्रा क्रॉसिंगवर पडलेले ‘नो मार्केटिंग जॉब्स’च्या पत्रकांचे चौकोन. चण्या-फुटाण्याच्या सायकलींबरोबर घरी निघालेले कागदी शंकू. न खपलेल्या फुलांवरील चकमकीचे उतरत चाललेले चंदेरी बिंदू.
.
.
.
.
.
...मध्यरात्रीचा प्रवास आता उत्तररात्रीकडे सुरू झालाय. काही कॉर्पोरेट ऑफिसेसमधील डेस्कच्या जळत्या दिव्यांखाली अजूनही काम करणारी मने विझताहेत. कुठल्याशा हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर्सचे लाइट्स प्राणज्योतीसाठी झटताहेत. स्ट्रीटलाइटच्या आधाराने फुटपाथवर झोकांडत्या सावल्या. काही पोलिसांच्या गाडीवरील दिव्यापासून लपण्याइतक्या शुद्धीत, तर काही भरधाव गाड्यांखाली येण्याइतकेही भान न उरलेल्या बेफिकिर.
डिस्कोथेक्सच्या पार्किंगमधील कार्सच्या दिव्यांना बऱ्याच काळानंतर जाग येतेय. चौकातल्या टर्नवर फुटपाथवरील झोप हरवल्याने तारवटलेले डोळे क्षणभर उजळवून पुन्हा अंधारात ढकलले जाताहेत....
रस्त्याच्या खडबडीत टेक्श्चरवर आंदोलनाचे मऊसूद मेण वितळलेय...
नाट्यवर्तुळाच्या गरमागरम चर्चा आटोपून कट्टे नुकतेच थंडावलेत...
सिग्नलच्या शोधात उंचावलेल्या लुकलुकत्या मोबाइल टॉवर्सची चांदण्याशी स्पर्धा सुरू आहे...
संध्याकाळपासून बाहेर पडलेल्या प्रकाशाचा आता शहरावरील आसमंतामध्ये एक तवंग तयार झालाय...

तमाम प्रार्थनास्थळांच्या श्रद्धा विश्रांती घेत असताना कुठल्याशा खोपटातील एकलेसे निरांजन उद्याच्या सूर्योदयाचे तेजस्वी अंकुर निपजत तेवत राहिल्येय... अपूर्णत्वाचे पूर्णाकार शोधत... व्रतस्थ मंद ज्योतीने... तेवत राहिल्येय...

Sunday, December 15, 2013

जीभेवरील ‘हुकूमत’


इथून डावीकडे वळायचे की उजवीकडे, या संभ्रमात मी डावीकडे वळतो. इथे आलं की नेहमी असं होतं. एकतर इथल्या गल्ल्या चिंचोळ्या, गर्दीने सदैव भरलेल्या. त्यात एकाही पाटीकडे बघून काही वाचता येत नसते. कोणी मराठी पाट्यांसाठी कितीही आरडाओरड, तोडफोड केली, तरी इथल्या मोहल्ल्यांना मराठीच काय, पण उर्दू वगळता अन्य कोणत्याही भाषेत पाट्या लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. ...आणि या अशा मोहल्ल्यामध्ये मी धड नावही वाचता न येणारे नेहमीचे हॉटेल शोधत हिंडत असतो.
गल्ल्यांतून फिरताना जिथे सेक्युलॅरिझमची पुसटशी खूणही जाणवत नसते, तिथे मी स्वतःला आपण सेक्युलर असल्याचे समजावत असतो. जवळपास प्रत्येक घरावर हिरवे झेंडे फडकताना पाहूनही ‘एरवी भगवे झेंडे फडकताना आपण कुठे पाहतो?, असली काहीतरी स्वतःची समजूत घालतो. ‘आज समजा दंगल वगैरेसारखा काही अनुचित प्रकार घडलाच, तर येथून बाहेर पडण्यासाठी कोणाला फोन...’ या असल्या भित्रट योजनाही काहीवेळा मनात येऊन जातात. तरीही मागे न फिरता शूरपणे मी त्या हॉटेलचा शोध सुरूच ठेवतो. कारण, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण तिथल्या बिर्याणीला मुकलो, हे प्राक्तन सहन होणारे नसते. जवळपास प्रत्येकवेळी याच क्रमाने हे घडूनही भीतीही थांबत नाही आणि माझे जाणेही!
मजल, दरमजल करत त्या हॉटेलात पोहोचतो. माझ्या येण्याची कोणीही दखल घेत नाही. माझ्या शौर्याचा सगळा आव वाया घालवत मोहल्ल्यापासून इथल्या खुर्च्यांपर्यंत कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलेले नसते. मी एखादे रिकामे टेबल शोधतो. वर्षानुवर्षे मिळणारे तेच पदार्थ आणि जवळपास त्याच किमती पाहण्यासाठी मेन्यूकार्ड मागण्यात काही अर्थच नसतो. ‘एक बिर्यानी’ असे सांगितल्यावर वर्षानुवर्षे न बदललेला वेटरही फक्त ‘छोटेका की बडेका’ एवढा एकच प्रश्न विचारतो. त्याला चारचारदा ‘छोटे का’, असे सांगूनही याने आता चुकून (किंवा मुद्दामहून) ‘बडे का’ आणली तर...असले विचार करण्यात मी पुरेसा वेळ घालवतो.
आजूबाजूची उर्दू आणि उर्दुमिश्रित हिंदी बडबड फारशी कळत नसतेच. म्युझिक प्लेअरवरच्या कर्कश्य कव्वाल्यांच्या आवाजामुळे समोरच्या टीव्हीवर नुसतीच मूक चित्रं हलताना दिसतात. आजुबाजूच्या टेबलांभोवतीच्या घोळक्यांमध्ये एकटाच आलेला बहुदा मी एकमेव असतो. सतत डोके खुपसण्यासारखा मोबाईलही माझ्याकडे नसल्याने मग पलीकडे सुग्रास वास येणाऱ्या रसोईखान्यामध्ये चाचा काय करत असतील, याचे आडाखे बांधू लागतो.
असाच एकटा बसलेला असताना एकदा मी या रसोईखान्यामध्ये डोकावलो होतो. हॉटेलचा एकूण अव्यवस्थितपणा आणि घाईगर्दी यांच्याशी संपूर्णतः विसंगत वाटणारा एक पांढरा गृहस्थ (पिकलेला, रंगाने नितळ गोरा, कपडे पांढरे, दाढीही पांढरी) शुभ्र पांढऱ्या कपड्यामध्ये तांदूळ गाळत होता. सोवळ्याच्या पुजाऱ्यासारखे दीप्तिमान भाव चेहऱ्यावर वागवत आसपासच्या भवतालाशी तिळमात्र संबंध नसल्यासारख्या त्याच्या हालचाली होत्या. त्याच्यावर कोणी काउंटरवरचा बॉस खेकसणार नव्हता, त्याच्यापुढे ऑर्डरचा तगादा लावून उभे असणारे वेटर नव्हते. त्याला ना दुसऱ्या हॉटेलमधून चांगली 'ऑफर' मिळवायची नव्हती, ना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चायनीज पदार्थ बनवायचे होते. एका मोठ्या पातेल्यामध्ये बदामफुले, दालचिनी, लवंगा, तमालपत्रे आदी अस्सल मसाल्याच्या पदार्थांची आहुती पडली होती. केशर, दूध पेरून तो ज्याप्रमाणे बिर्याणीचे थर लावत होता, की नुसते पाहूनही वर्षानुवर्षे चव जिभेवर तरळावी. काहीतरी दिव्य घडत असल्यासारखा माझी नजरबंदी झाली होती. माझ्या नजरेत निस्सिम आदराचे भाव उमटले असावेत. कारण एकाक्षणी त्याने माझ्याकडे पाहिले आणि एक-दोन क्षणांनंतर रसोईखान्यात डोकावण्याचा भोचकपणा केल्याबद्दल जळजळीत विखारी कटाक्ष टाकण्याऐवजी माझ्या आदराचा स्वीकार केल्याचे स्मितहास्य त्याच्या दाढीवर उमटले. मी स्वतःहूनच त्याचे चाचा हे नाव ठरवून टाकले. त्यानंतर हे चाचा कधी दिसले नाहीत. परंतु, आजही समोर जेव्हा ही साग्रसंगीत बिर्याणी येते, तेव्हा नजरेआड त्यासाठी झालेल्या विधीपूर्वक सोपस्कारांच्या विचाराने मान लवते.
...आणि त्यानंतर, पहिला घास घेतल्यावर जे होतं, त्याला 'अनुभूती' असे म्हणतात. ती फक्त भूक नसते. ती केवळ चव राहत नाही. एखादा अतिशय रुचकर पदार्थ खातोय या भावनेपलीकडे नेऊन एका पवित्र खाद्यपरंपरेचे पाईक होण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, या कृतज्ञतेपर्यंतचा तो प्रवास असतो. मनातल्या शंका, भीती, पोट भरत असल्याची जाणीव इत्यादी सर्व आपोआप विरत जाते आणि हा जगण्याचा परमोच्च बिंदू असून यापेक्षा आयुष्यात चांगले काही घडणे शक्य नाही, असे वाटून मी शक्य तितक्या सावकाशपणे जीभेवर ठेवताच विरघळणाऱ्या त्या बिर्याणीच्या अधीन होतो.
काही काळ या अवस्थेत जातो, त्याचवेळी माझ्या आनंदविलिनतेवर सूड उगवण्यासाठी भारतीय संघाला हॉकीत पाकिस्तानकडून हरायचे असते. एरवी ‘हॉकी माने?”, असे विचारणाऱ्या तेथील काही जणांना टीव्हीवर पाकिस्तान जिंकतोय, हे पाहून चेव चढत असतो.
“ये नापाक लोक हमारा मुकाबला नही कर सकते. हजार सालतक हुकूमत की है, हमने इनपे और इऩ्शाल्ला आगे भी करेंगे. आझादी क्या मिली, हम अपनेही मुल्क मे मायनॉरिटी हो गये...” यांसारखे चित्कार फुलत असतात.
‘बरं झालं, आपल्याला उर्दू येत नाही. नाहीतर, काय काय ऐकावं लागलं असतं’, असा विचार करून मी सोडून देतो. तेवढ्यात...
“हुकूमत तो हमारी आजभी है, मियाँ!”
राजेशाही थाटात मोठ्याने उच्चारलेले हे शब्द त्वेषाने पेटलेल्या नजरा वेधून घेतात. तो आवाज चाचांचा असतो. रसोईखान्याबाहेर ते कोणताही आचारी चारचौघांत दिसेल, इतके सामान्य दिसतात. कर्म केल्यानंतर अलिप्त झालेले कर्मयोगी असेच दिसत असावेत. त्यांच्या वाक्याचा अर्थ न समजून अचानक शांतता पसरते. त्यांना प्रत्युत्तर द्यावे, की प्रश्न विचारावा, या द्विधेत सापडलेल्या ठरावीक चेहेऱ्यांकडे नीट पाहत ते स्मितहास्यासहित जवळ येतात.
“आप जानते हैं किसी शख्स को, जिन्होने एकबार यहां की दावत कबूल की, और दोबारा आना भूलगयें?”
समोरचे मौनच अपेक्षित उत्तर देते. पुन्हा शांतता. निर्णयक वाक्यापूर्वी ‘पॉझ’ घेतल्यासारखी...
“जनाब, हुकूमत सिर्फ तख्तों पे बैठे नही की जाती!”
ज्याच्यावर कधीही येऊन कोणीही राज्य करून जावे, आणि कोण राज्य करतेय हेही कळू नये, असा हॉटेलमधील एक किरकोळ खानसामा क्षणात आपली सल्तनत दाखवतो. परिणामांचा विचार न करता स्वतःच्याही परवानगीशिवाय मला विजयी हसू फुटते. आसपासच्या दाद देणाऱ्या हास्यांमध्ये मिसळते. तेच स्मित कायम ठेवत आल्यापावली चाचा ‘हुकूमत’ गाजवण्यासाठी पुन्हा रसोईखान्याकडे रवाना होतात.
“ऐसे लोग हमे कभी जितने नही देंगे!” दबक्या आवाजात मान्य न होणारा 'पराभव' फुत्कारतो.
.
.
.
उर्दू शिकले पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळी इथे येताना एवढी शोधाशोध करावी लागणार नाही, हॉटेलबाहेर पडतापडता मला वाटून जाते.

Monday, April 25, 2011

गंध-बंध!


तुला विसरलोच होतो असे नाही, पण आज सहज एक नवीन पुस्तक उघडताना तुझी आठवण मनाला गंधून गेली. गंधांमध्येही आपल्याला कुठल्याकुठे वाहून नेण्याची क्षमता असते नाही? त्या नव्या पुस्तकाच्या वासाने एका क्षणात मला आठ वर्षापूर्वीच्या त्या कॉलेजमधल्या लायब्ररीत नेऊन उभे केले.
वर्षाच्या सुरुवातीला लायब्ररीतल्या त्या टेबलावर पुस्तकांचा श्वास भरून वास घेताना तुला पहिल्यांदा पहिले होते. पुस्तकांचे बाईंडिंग करताना लावलेल्या खळाचा वास पुस्तकाला येतो, हा माझा शास्त्रीय समज तुझ्याकडे पाहून खोटा वाटत होता. जणू तुझ्यासामोरच्या पुस्तकांचा वासही त्यांच्या आशय-विषयानुसार बदलत असावा! पुढे तुझ्याशी ओळख वाढल्यानंतर तुझ्या गंधांच्या विश्वात नकळत मलाही प्रवेश मिळाला आणि त्यावेळी उलगडत गेलेल्या गांधावृत्तींनी आजपर्यंत माझ्या नॉस्टेल्जियाला नवा,ताजा,प्रफुल्लित गंध बहाल केलाय!!!
पावसाळ्यात भिजणाऱ्या मातीपासून ते तळणाऱ्या भजीपर्यंतचे वास तोपर्यंत परिचयाचे होते. पण कुडकुडत्या थंडीत दव-शिंपडल्या पहाटे जळणाऱ्या उबदार शेकोटीचा आणि रखरखीत उन्हात वाऱ्यासोबत भिरभिरत्या दिशाहीन पाचोळ्याचा वास मी तुझ्यासोबत पहिल्यांदा घेतला. टिपिकल प्रेमवीरासारखा तुझ्या केसांच्या वासात हरवून जाण्याइतका तुझ्याजवळ कधी आलोच नाही मी. तुझा स्पर्शही रंध्र विसरलीयेत आता. पण तुझ्याशी शेअर केलेला प्रत्येक गंध मात्र मी आजही घेऊ शकतो. अगदी ती वस्तू जवळ नसतानाही. इतका तो आठवणींच्या कुपीत ताजा आहे.
त्यातले काही किस्से तर आज अगदी विकृत वाटतायत. फिनेलचा ताजा वास घेण्यासाठी आपण दोघे एकदा ठरवून सकाळी हॉस्पिटलमधून फिरलो होतो, आणि पेट्रोलचा वास घेण्यासाठी ते उडून जात असतानाही गाडीची टाकी उघडी ठेवून बसलो होतो....हं... crazy!
पण त्यातली उत्कटता मात्र अस्सल खरी होती. उदबत्ती पेटवून ती अख्खी जळेपर्यंत तिच्यासमोर आपल्याला भक्तिभावाने वास घेत बसलेलं पाहून देव त्या उदबत्तीपेक्षाही जास्त जळाला असेल. चित्रकलेचे प्रगाढ पांडित्य माहित असूनही केवळ रंगांचा वास घेण्यासाठी कॅनव्हासवर उभे-आडवे, तिरपे कसेही फटकारे मारणारे आपण, रंगांनाही नवा अनुभव देऊन गेलो असू, खात्री आहे मला...आपल्या लहानपणी मिळणारी सेंटेड पेन्स ठरावीक सुवासांऐवजी आपल्याला हव्या त्या वासांमध्ये मिळाली असती तर...अशी मजेशीर कल्पनाही केलेली आठवत्येय!
...आणि या तर सर्व भौतिकदृष्ट्या गंधमय गोष्टी! पण सकृतदर्शनी वासांशी थेट संबंध नसलेल्या गोष्टींमधील गंधांचे अस्तित्व अनुभवायलाही मी तुझ्यासोबत शिकत गेलो. आजही कोल्हापूरची आठवण झाली, की वास येऊ लागतो मला त्या शहराचा! तिथला कोणताही गंध एकेरी ओळखता येऊ नये, इतका सर्व-गंधमिश्रित!तुला तुझ्या घराजवळच्या दमट समुद्राचा, अंधाऱ्या झोपडीत कौलांतील झरोक्यातून झिरपणाऱ्या प्रकाशाचा, दिवसातून दोनदाच गावाला येणाऱ्या एसटीचा यायचा तसाच! बाबा आठवलेच कधी, तर त्यांच्या हातातल्या सिगरेटसोबतच आठवतात. ...आणि त्या सिगरेटचा उग्र वास तिच्या धुरासकट मला त्या आठवणींत गुरफटून टाकतो. तुझी कुठली दूरची कुठली आज्जी तुला तिच्या जपमाळेच्या वासासाहित आठवायची नं!!
............................................................................................
.............................................
"गंधांनाही स्वभाव असतात!" तुझं आवडतं वाक्य! काही गंध कालपरत्वे विरळ होत उडून जातात, काही मंद दरवळत राहतात...तशी अत्तर, सेंट, डीओसारख्या मटेरीएलिस्टिक गोष्टींची देवाणघेवाण कधी केली नाही आपण. कधी गरज किंवा उणीवच नाही भासली. अख्ख्या कॉलेजने चिडवूनही कधी गुलाब नाही द्यावासा वाटला तुला. हां, पण काही सुवासित फुले द्यायची होती शेवटच्या भेटीवेळी...तू जपून ठेवली असतीस ती...सुकून गेल्यानंतरही...त्यांच्या सुवासांसह....मी जपलेल्या या गंधांच्या आठवणींसारखी...आणि मला नव्या पुस्तकांत सापडतेस, तसा कधी जुन्या वहीत ठेवलेल्या त्या शुष्क फुलांमध्ये सापडलोही असतो तुला मी...
....पण तेवढी द्यायची राहून गेली!!
एखाद्या गोष्टीचा गंध नसणे म्हणजे काय, हे आत्ता कळतंय मला....

Tuesday, August 17, 2010

स्पर्शब्रह्म

उन्हाळा. वैतागवाणा. त्यात एक मृत्युवार्ता. मित्राच्या आजोबांची. त्याच्या घराबाहेर गर्दी. टळटळीत उन्हात ताटकळत जो-तो शववाहिकेच्या प्रतीक्षेत. शववाहिका येताच गडबड सुरु. शववाहिकेसोबत आम्हीही स्मशानभूमीकडे रवाना.
तिथे पोहोचताच संबंधित लोक कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतलेले. पार्थिव सोपवून शववाहिका मार्गस्थ. पुन्हा प्रतीक्षा. थांबलेल्या सर्वांच्या चेहेऱ्यावर साधारणतः ' कधी एकदा मोकळे होतोय?', असे भाव. काही अंतरावरून चितेच्या जळण्याचा आवाज. एकूण भवतालावर शोकमय गांभीर्य पसरलेले.
एकाएकी वातावरणात अनपेक्षित बदल. अंधारून. सोसाट्याचा वारा,गडगडाट, मातीचा दरवळ इत्यादी पूर्वसूचना एखाद-दीड मिनिटात आटपून पाऊस बरसण्याच्या बेतात. तारांबळ. पार्थिवाजवळ असणारे आम्ही चौघे-पाचजण पार्थिवासाठी आडोशाची जागा शोधण्यास प्रयत्नशील. तरीही पहिला थेंब वाटेत गाठतोच! मागोमाग दुसरा-तिसरा... त्यांचा स्पर्श हवाहवासा. स्थळ-काळ विसरून चिंब भिजावेसे वाटायला लावणारा. धुंद. पण कर्तव्यदक्षता आडवी! अनुचित चुटपूट, हुरहूर, हिरमोड इत्यादी! अखेर पार्थिवासह आम्ही आडोशाला. पार्थिवावरील विस्कटलेले कापड व्यवस्थित करताना अभावितपणे नजर त्या थंड देहाच्या कपाळावरील पावसाच्या काही थेंबांवर. त्यांच्या स्पर्शाची कोणतीच अनुभूती त्या अचेतन देहावर उमटलेली नाही. आपण जिवंत असल्याची जाणीव माझ्या कपाळावरून ओघळत्या थेंबासोबत तीव्रतेने स्पर्शून जाणारी. स्पृश्यतेच्या आकलनास नवा अर्थ प्राप्त.
सरतेशेवटी मर्तिकास सुरुवात. आता बाहेर पाऊस आडवा-तिडवा कोसळतोय आणि समोर चितेवर देह जळतोय. त्या अग्नीची धग स्पर्शावाटे जाणवत्येय. पावसामुळे गारठलेल्या शरीराला उबेने लपेटू पाहत्येय...चेतनामय...

Monday, March 8, 2010

साउंड इफेक्ट

भरून वाहणारा रस्ता एका भरगच्च चौकात येऊन मिळतो. सिग्नलच्या दिव्यांची उघडझाप. समोरचा दिवा पिवळा असेपर्यंत वाहनांची सिग्नल ओलांडण्याची धडपड सुरु. दिवा लाल झाल्यानंतर काही करकचून मारलेल्या ब्रेक्सचा आवाज. आता एकामागोमाग एक गाड्यांच्या रांगा लागण्यास सुरुवात. त्यांच्यामधील चिंचोळ्या जागेतून अस्ताव्यस्तपणे घुसण्यासाठी दुचाकींचे कसोशीचे प्रयत्न. लाल दिव्यावरच्या टायमरमध्ये एकशे पन्नास सेकंदांचा उलटप्रवास. त्याचवेळी डावीकडील सिग्नल सुटल्याचे संकेत. मी डोळे बंद करून घेतो आणि कानावर पडणारे आवाज लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो.
सर्वप्रथम डावीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज कानात भरतो. इतर काहीच ऐकू येऊ नये एवढा कर्कश्श! अपवाद फक्त त्यासोबत ऐकू येणाऱ्या विविध वाहनांच्या स्टार्टर्सचा. (यापैकी कुठला हॉर्न कोणत्या वाहनाचा आहे हे ओळखण्याचाही प्रयत्न केला पण त्याविषयीचे वर्णन येथे अप्रस्तुत.) प्रत्येक हॉर्नमध्ये एकप्रकारचा उग्र, आक्रमक सूर.काही सेकंद हा आवाज तसाच ऐकू येतो. मग हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाते. आता त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर इतर आवाज ऐकू येतात. गाडीवर सिग्नलवरील मुले मारत असलेल्या थपडा, फळविक्रेत्यांच्या आरोळ्या, शेजारच्या बाईकवर बसलेल्या मुलामुलींचे खिदळणे(केवळ खिदळण्यावरून मी त्यांच्यातील नातेसंबंध नाही सांगू शकणार!). काही अर्धवट वाक्ये...
"साब, दो रुपया साब."
"फक्त तीस रुपये किलो, फक्त..."
" तीन दिनसे कुछ नही खाया साब."
"टपोरी द्राक्षे, ताजी गोड द्राक्षे फक्त..."
मग काही सेकंदात हॉर्न्सच्या आवाजाची पार्श्वभूमी गायब होते. केवळ एखादी मोटारसायकल सुसाट जात असल्याचा आवाज. मग पुन्हा करकचून ब्रेक. पोलिसांची शिट्टी. एखाददुसरा क्षण निरव शांतता. मग पुन्हा हॉर्न्सचा आवाज भवतालावर वरचढ. पुन्हा त्याचे काही सेकंदांनी निवळणे, पुन्हा आधीचीच अर्धवट वाक्ये. त्यात काही नवीन वाक्यांची भर.
" तरी तुला मी सांगत होते,ती ब्ल्यू केप्रीच चांगली होती."
"ए***, अरे डावीकडे वळ ना! उगाच जागा का अडवतोय??"
आरोळ्यामध्येही एकमेकांशी स्पर्धा. वाढत जाणारे आवाज. पुन्हा शिट्टी. मात्र यावेळी क्षणभरही निरव शांतता नाही. आधीच्या हॉर्न्समध्येच उजवीकडून येणाऱ्या हॉर्न्सचा आवाज मिसळतो. पुन्हा तेच आवर्तन! आता माझ्या आजूबाजूलाही अस्वस्थता वाढलेली. गाड्यांचे स्टार्टर्स मारल्याचे आणि बाईक 'रेज' केल्याचे आवाज. त्यातच आरोळ्याचे,खिदळण्याचे, थपडांचे, भिकेचे आवाज मिसळतात. वेगाने वाढत जातात. गोंगाट!! एका ठरावीक क्षणी केवळ आवाज कानावर पडत राहतात परंतु त्यातून अर्थबोध होत नाही. मेंदूच्या enconding-decoding क्षमतेपलीकडे ध्वनीचा वेग व तीव्रता पोहोचते. बधिरता!!!
मी शांतपणे डोळे उघडतो. गाडीच्या काचा बंद करून घेतो. येणारे आवाज आता खूप दुरून येत असल्यासारखे वाटतात. रेडिओ सुरु करतो. आर.जे. च्या आवाजातील उत्साह ओसंडून वाहणारा! पाठोपाठ एक मंद सुरावट ऐकू येते. सर्वकाही विसरायला लावणारी. बाहेरच्या जगापासून अलिप्त, अधांतरी असल्याचा भास होतो. बरे वाटते. टायमरवर शेवटचे काही सेकंद दिसू लागतात. मी गिअर टाकून सरसावून स्टेअरिंग पकडतो.तयार राहतो. पाच...चार...तीन...दोन...एक...

Tuesday, February 16, 2010

काही सांगावेसे...

नमस्कार. खरेतर ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी १४ तारखेलाच प्रसिद्ध करायची होती.( 'व्हेलेन्ताईन डे'चे औचित्य साधून नव्हे!) परंतु पुण्यात १३ तारखेला झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मन थोडे विचलित होते.( काय करणार? इतक्या दहशतवादी घटनांनंतरही आम्ही अजून सराईत झालेलो नाही. अजूनही मन विचलित होते. लवकर उपाय शोधला पाहिजे!) म्हणून लेखनास विलंब होतोय.
१४ तारखेला ब्लॉग सुरु करून २ महिने झाले. बऱ्याच काळानंतर लेखन केले. त्यातून माध्यम नवीन! त्यामुळे सुरुवातीला मी निश्चिंत नक्कीच नव्हतो. ३ पोस्ट प्रसिद्ध केल्या. काही ड्राफ्ट म्हणून तशाच पडून आहेत. काही प्रयोग करून पहिले. ( क्रियापदाविना लेखन) काही नव्या गोष्टीही लक्षात येत गेल्या.( मनात साचलेल्या प्रत्येक गोष्टीला वाट मोकळी करून देण्यासाठी ब्लॉग हे माध्यम नाही इ.) याकाळात खूप जणांनी ब्लॉग वाचला असल्याचे सांगितले. काही परिचित- अपरिचितांनी आवर्जून प्रतिक्रिया नोंदवल्या, सूचना केल्या. त्यासार्वांचे मनःपूर्वक आभार. त्यामुळेच एक आत्मविश्वास जाणवतोय, एक नवीन प्रयोग करण्यासाठी!
वर्षभरापूर्वी एका मैत्रिणीने विचारले होते, "आयुष्यात sensibility महत्वाची sensitivity?" मी नेहमीप्रमाणेच त्याहीवेळी काहीतरी nonsense उत्तर दिले पण त्या गोष्टीचा मी तेंव्हापासून विचार करू लागलो. काही काळापूर्वी माझ्या लक्षात आले की आपण विचार तर खूप करतोय (माझ्यापरीने खूप हं!) पण मुलभूत सेन्सेस जे आपल्याला सांगू पाहताहेत ते अर्धवटच लक्षात घेतोय. म्हणजे एखादी गोष्ट सवयीची झाली म्हणजे त्यातील मानसिक गुंतवणूक कमी होत जाते किंवा एका प्रकारची गणिते सोडवता येऊ लागली की ती तितक्या दक्षपणे सोडविली जात नाहीत तसे! हे लक्षात आल्यावर मी अनेक गोष्टींचा विचार या सेन्सेसच्या अंगाने करून पहिला आणि मला फार वेगळी अनुभूती मिळाली. अशाच पाच मुलभूत सेन्सेसनी जाणवलेल्या आणि त्यासंदर्भाने विचार करून लिहिलेल्या लेखांची मालिका पुढील पोस्टपासून सुरु करण्याचा प्रयोग करत आहे. भेटू.
( टीप- १. प्रयोग असल्याने तो फसण्याची शक्यता अधिक.
२. या लेखंचे वातावरण आणि स्वरूप मुक्त असल्याने भाषिक भ्रष्टाचार होऊ शकतो.)

Tuesday, January 5, 2010

नवी निरक्षरता

(कसे अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या अग्रलेखाचे शीर्षक वाटतेय ना!)
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या पोलीस उपायुक्तांशी भेट झाली. ( तुरुंगात नव्हे,सदिच्छा भेट!) त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे चालली असताना एकीकडे टिपणे घेणेही सुरु होते. माझ्याशेजारी बसलेली अमेरिकन सहकारीही त्यांच्याशी संवाद साधत होती, परंतु नोट्स मत्र घेत नव्हती. तेथून बाहेर पडताना मला म्हणाली, "तुझ्या नोट्स नंतर मला दे." 'उपायुक्त इंग्लिशमध्ये बोलत असूनही हिने नोट्स का बरे घेतल्या नसतील?' नंतर मी दिलेल्या नोट्स तिने भराभर कॉम्प्युटरवर टाईप करून घेतल्या तेंव्हा मात्र मला हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवेना.
"Actully, मला लिहायला थोडे अवघड जाते. मी लिहायला 4th मध्ये असतानाच शिकले. पण मी चार वर्षांची असल्यापासून कॉम्पुटर वापरते. त्यामुळे मला सगळे लिखाण कॉम्पुटरवरच करणे सोयीचे आहे." -तिचे उत्तर. (Actullyला समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही.) माझ्या डोक्यात विचार सुरु झाला.
मी पहिल्यांदा पाचवीत असताना कॉम्प्युटर हाताळला आणि इतक्या वर्षांनी माझे कॉम्प्युटरचे ज्ञान पाहता मी सध्या सहावीत शिकत असल्याचा अनेकांचा समज होईल. आपल्या देशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या चार टक्क्यांमध्ये माझा समावेश होत असेल तर इतर ९६% मुलांचे काय?
मला वाटले, हा एक चांगल्या लेखाचा विषय आहे. मी त्यादृष्टीने अभ्यास सुरु केला. पुढील काही दिवसात अमेरिकेतील शिक्षणपद्धती,त्या पद्धतीमधील संगणकाचा वापर, त्यासंदर्भात आपली शिक्षणव्यवस्था, साक्षरता अभियान, आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये संगणकज्ञानाचा वापर यांविषयी माहिती जमविली.
भारतात २०१५ पर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्माण होतील. हे रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संगणकज्ञान व कौशल्य असलेल्यांची संख्या, मनुष्याचा कौशल्यास्तर(human skill index)वाढवण्यातील संगणकाची उपयुक्तता व गरज, काय काय गोष्टी पडताळल्या!
साक्षरता अभियानाचा संपूर्ण डोलारा हा अजूनही अपवाद वगळता खडू, फळा इत्यादी साधनांवर अवलंबून आहे आणि देशाच्या राष्ट्रीय ठोक उत्पन्नातील(GDP) सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा असून त्यामध्ये संगणकाशी संबंधित सेवा आघाडीवर आहेत. हे सर्व विचारात घेता 'देश साक्षर बनवण्याच्या प्रयत्नात आपण एक नवी निरक्षरता निर्माण करत आहोत', अशा निष्कर्षाप्रत आलो.
परवा कॉलेजच्या कॉम्पुटर रूममध्ये मराठी टायपिंगशी झगडत बसलो होतो. तेंव्हा पूर्ण शिक्षण महानगरात झालेली शेजारील मैत्रीण वेगाने इंग्रजी टायपिंग करताना म्हणाली, "मला हल्ली कागदावर लिहिताना काही सुचतच नाही. कॉम्पुटरवर टाईप करून नंतर कागदावर उतरवावे लागते!" (महाविद्यालयातील संगणककक्षात टंकलेखन वगैरे लिहिवेना.)
अरेरे! उगाचच अमेरिकेतून माहिती मिळवण्यासाठी एवढा धडपडलो! लेख लिहिण्याचा मनसुबाही त्याक्षणी बारगळला!